Skip to main content
x

भोकरे, लक्ष्मण बळीराम

भाऊसाहेब भोकरे

क्ष्मण बळीराम भोकरे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील देवरी या गावी शेतकरी कुटुंबात झाला. भाऊसाहेबांचे मराठी दुसरी पर्यंतचे शिक्षण टाकरखेडा शंभू येथे झाले. त्यांची कुशाग्र बुद्धी पाहून त्यांचे पुढील शिक्षण दादासाहेब सबनीस यांनी केले. त्यांनी विद्यार्थी दशेत असतानाच स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. कोलकता काँग्रेसच्या अधिवेशनानंतर सहकार चळवळीला चेतना देण्यासाठी अमरावती येथील जोग चौकात विद्यार्थ्यांसाठी जाहीर सभा भरली होती. त्यासभेत त्यांनी मॅट्रिकची परीक्षा जवळ आली असताना सुद्धा शाळा सोडण्याचे जाहीर केलेे. एस.एस.सी पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी चित्रकला शिक्षक म्हणून शिक्षकी पेशा स्वीकारला. शिक्षक असतानाच शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून होणारी पिळवणूक पाहणे त्यांना अशक्य झाले आणि शेतकर्‍यांची फसवणूक थांबविण्याचा ध्यास त्यांनी घेतला व त्यासाठी त्यांनी 1925 मध्ये नोकरी सोडली. तेव्हापासून ते भाऊसाहेब या नावाने परिचित झाले. भाऊसाहेबांचे 1927 च्या सुमारास सहकारी चळवळीत पदार्पण झाले. त्यांनी करंजगाव येथे उत्कर्ष सहकारी सोसायटीची स्थापना केली. त्यांनी या संस्थेद्वारे शेतकर्‍यांचा उत्कर्ष साधला. याकाळात त्यांनी सहकारी चळवळीला नवी दिशा, नवा विचार दिला व संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सहकारी चळवळीला गती दिली. त्यांचा मूळ पिंड हा शिक्षकाचा असल्यामुळे सहकारी चळवळीत सुद्धा ते भोकरे गुरुजी म्हणून ओळखले जात. ते 1927 मध्ये अचलपूर सेंट्रल को-ऑप. बँकेचे संचालक व नंतर अध्यक्ष झाले. पुढे याच तालुका बँकांचे विलीनीकरण होऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली. शेतकर्‍यांना केवळ कर्जपुरवठा करून भागणार नाही तर त्यांच्या कृषी उत्पादनास चांगली किंमत मिळाल्याशिवाय तरणोपाय नाही अशी भाऊसाहेबांची ठाम भूमिका होती. यासाठी सहकारी खरेदी विक्री संस्था उपयुक्त कार्य करू शकतात म्हणून त्यांनी अमरावती सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीची जबाबदारी स्वीकारली. आज या संस्थेला असणार्‍या आर्थिक स्थैयाचे श्रेय भाऊसाहेबांना द्यावे लागेल. सहकारी शिक्षणाचे कार्य हे पवित्र कार्य असून ते मिशनरी वृत्तीने केले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. सहकारी कार्यावर त्यांची परमनिष्ठा होती. त्यासाठी लागणारा उत्साह व आत्मविश्वास त्यांच्या ठायी होता. केवळ विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना सहकारमहर्षी म्हणून गौरविले. भाऊसाहेब 1961 मध्ये विदर्भ को-ऑप मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष झाले. त्यांनी या सोसायटीद्वारे शेतकर्‍यांच्या हितासाठी मोलाचे कार्य केले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करून त्यांचा कार्यभार सांभाळला. त्यांच्याच कारकीर्दीत सहकारी शिक्षण प्रशिक्षणाकरिता नागपूर येथे धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रशिक्षण महाविद्यालयाची स्थापना झाली. भाऊसाहेबांनी विदर्भ को-ऑप मार्केटिंग सोसायटीच्या माध्यमातून जिनिंग प्रेसिंग युनिट, तेलबिया प्रक्रिया उद्योग सुरू करून कृषी औद्योगिक व्यवस्थेची पाया भरणी केली व त्याचा फायदा शेतकर्‍यांना मिळवून दिला. अमरावती येथील विदर्भ सहकारी मुद्रणालय व सहकारी सुतगिरणी स्थापनेत व उभारणीत भाऊसाहेबांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने पुुणे येथे मुख्य कार्यालयासाठी जागा खरेदी केली. ते 1965 ते 1969 पर्यंत महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष तर ते 1969 मध्ये अध्यक्ष होते. याच काळात ते महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे अध्यक्ष होते. ते 1947 ते 1972 पर्यंत विदर्भ विभागीय सहकारी बोर्डाचे मानद सचिव होते. ते महाराष्ट्र राज्य सहकारी बाजार समितीचे 10 वर्षे संचालक होते. याशिवाय महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, विभागीय कार्यालय नागपूर व कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती यांचे अध्यक्ष होते. भाऊसाहेब यांचा अमरावती सहकार प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेत मोलाचा वाटा आहे. या केंद्रासाठी विभागीय सहकारी बोर्डाच्या इमारतीत जागा असावी. केंद्रातील व्यवस्थेसाठी विभागीय सहकारी बोर्डाचे सातत्याने मार्गदर्शन मिळावे यासर्व बाबींची निकड लक्षात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाने या बाबी पूर्ण झाल्या. राज्य सहकारी संघामार्फत सहकारी शिक्षण, प्रशिक्षण, प्रचार, प्रसिद्धी व संशोधन हे कार्य निश्चित गरजेचे आहे. ते कार्य अधिक प्रभावी होण्यासाठी राज्य सहकारी संघाचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने या केंद्रास भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र असे नामकरण करून भाऊसाहेबांच्या कार्याचा गौरव केला. कापूस हा भाऊसाहेबांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी कापूस पिकविला, कापसाची अडत केली, कापूस बाजाराचे अध्यक्षपद भूषविले आणि बाजारात शेतकर्‍याची व्यापार्‍यांकडून होत असलेली लूट बघून ते अस्वस्थ झाले. त्यांनी स्थापन केलेल्या विदर्भ शेतकरी सभेच्या माध्यमातून मुख्यत्वेकरून कापूस शेतकर्‍याच्याच अडचणीचा ऊहापोह केला. ते विदर्भाच्या शेतकरी आंदोलनाचे सुद्धा जनक होते. त्यांनी बॅ. रामराव ऊर्फ अण्णासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ शेतकरी सभा ही संघटना स्थापना करून तिच्याद्वारे शेतकर्‍याचे प्रश्न दिल्ली दरबारी पोहोचविले. सहकारी चळवळीत शिक्षण प्रशिक्षण व्यवस्था सांभाळणार्‍या विदर्भ विभागीय सहकारी बोर्ड या संस्थेकडे भाऊसाहेबांचा सर्वाधिक कल होता. ते या संस्थेचे सतत 25 वर्षे अनुक्रमे उपाध्यक्ष व मानद सचिव होते. भाऊसाहेबांनी जबाबदारी स्वीकारलेल्या सहकारी संस्था यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यांनी सहकारी चळवळीचा विकास हे आपल्या जीवनाचे कार्यक्षेत्र ठरविले व त्यांच्या या कार्यक्षेत्राचा केंद्रबिंदू म्हणजे शेतकरी होय. संपूर्ण जीवन शेतकर्‍यांच्या हितासाठी समर्पित करून सहकारी चळवळीच्या माध्यमातून सतत 50 वर्षे सहकारी क्षेत्रात नि:स्वार्थी कार्य केले.

- ज्ञानेश्वर माधव गुहे

भोकरे, लक्ष्मण बळीराम