Skip to main content
x

चौधरी, श्रीराम देवीदास

           ज्वारी संशोधनामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण  करणार्‍या श्रीराम देवीदास चौधरी यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पाथरी येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण परभणी येथील मराठवाडा विद्यापीठात झाले. त्यांनी १९६२मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली आणि १९८२मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेस-बंगलोर येथून ‘वनस्पतींचे शरीरशास्त्र’ या विषयात पीएच.डी. संपादन केली.  त्यांनी १९७२ पासून १९९४ (निवृत्ती) पर्यंत मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे वनस्पतिशास्त्र या विषयांतर्गत ज्वारी संशोधन केंद्रामध्ये सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्य केले. हुरड्यासाठी गोड ज्वारीच्या वाणांच्या निर्मितीमध्येही त्यांनी यश संपादन केले. उदा. एस.जी.एस. ८/४,  तर लाहीच्या ज्वारीकरिता  पीएसपी/१ आणि रब्बी हंगामात थंडीमध्ये उत्तम येणारी सीआर ४ ही जात विकसित केली.

           डॉ. चौधरी यांचे १२८ नैमित्तिक लेख देश-परदेशामधील नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी एम.एस्सी. या पदवीसाठी ३ विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केेले. कृषिक्षेत्रामधील लेखनाबरोबर त्यांचे संगीत क्षेत्र व धार्मिक क्षेत्रामधील लेखनसुद्धा विशेष लोकप्रिय झाले आहे. २००५चा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. त्यांनी संगीत क्षेत्रामधील ‘तबला प्रभाकर’ ही मानाची पदवी १९६४मध्ये अलाहाबाद येथील प्रयाग संगीत संस्थेतून संपादन केली.

- मिलिंद कृष्णाजी देवल

चौधरी, श्रीराम देवीदास