Skip to main content
x

चावडा, श्यावक्ष धनजीभॉय

          प्रवाही व परिणामकारक रेषांद्वारे वादक, नर्तक व भारतीय जनजीवन यांचे प्रभावी चित्रण करणारे चित्रकार श्यावक्ष धनजीभॉय चावडा यांचा जन्म गुजरातमधील नवसारी येथे, मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव आलामाई होते. त्यांचे वडील व्यापार करीत असत. चावडा यांचे शालेय शिक्षण नवसारी येथेच झाले.

          त्यांनी १९३० मध्ये मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला व १९३५ मध्ये ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तमरीत्या उत्तीर्ण झाल्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्यांना सर रतन टाटा शिष्यवृत्ती मिळाली व ते लंडन येथील प्रसिद्ध ‘स्लेड स्कूल’मध्ये दाखल झाले. रॅण्डॉल्फ श्‍वाब, व्लादिमीर पोलुनिन यांच्यासारख्या प्रख्यात शिक्षकांचे मार्गदर्शन व स्वत: मेहनतपूर्वक केलेला अभ्यास यांमुळे त्यांनी तेथील तीन वर्षांचा अभ्यासक्रम दोन वर्षांतच पूर्ण केला. या काळातील त्यांची प्रत्यक्ष मॉडेलवरून केलेली अभ्यासचित्रे त्यांच्या यथार्थदर्शी अचूक रेखनाची व शरीरशास्त्राच्या परिश्रमपूर्वक केलेल्या अभ्यासाची साक्ष देतात. नंतर काही महिने त्यांनी पॅरिस येथील ‘अकॅडमी द ला ग्रंद्रे कॉमिअ’ येथेही प्रशिक्षण घेतले.

          युरोपातील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी भित्तिचित्रे (म्युरल्स), लिथोग्रफी, दुरावस्थेतील चित्रांचे पूर्ववतीकरण (पेंटिंग रिस्टोरेशन), तसेच रंगमंचीय नेपथ्य यांचे तंत्र आत्मसात केले. त्यांनी १९३९ मध्ये भारतात परतल्यानंतर भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला व अभिजात भारतीय नृत्यकलेचे प्राथमिक शिक्षण घेतले.

          सुरुवातीस ते व्हिक्टोरिअन वास्तवदर्शी शैलीत चित्रे रंगवीत असत. याच सुमारास त्यांनी भारतभर प्रवास केला व विविध ठिकाणांचे ग्रमीण व आदिवासी जनजीवन, प्राणी, तसेच अजिंठा-वेरूळ, खजुराहो, सांची इत्यादी ठिकाणांचे वास्तुवैभव व त्यावरील शिल्पकाम यांचा अभ्यास केला व असंख्य रेखाटने व पेन-शाई माध्यमातील रेखाचित्रे काढली. जावा-सुमात्रा, बाली इत्यादी पौर्वात्य देशातील लोककला, लोकनृत्य व वास्तुवैभव यांचाही त्यांनी रेखाटन - रेखाचित्रांद्वारे अभ्यास केला व त्यातून त्यांची स्वत:ची शैली विकसित झाली. प्राणिसंग्रहालयात जाऊन ते विविध प्राणी, त्यांच्या हालचाली व डौल यांची रेखाटने करीत असत. कोंबडा या विषयावरही त्यांनी बरीच रेखाटने व रंगीत चित्रे साकारली. आसाम सरकारने आसाममधील आदिवासी जीवनाच्या वैविध्यतेचे चित्रण करण्यासाठी त्यांना निमंत्रित केले होते.

          त्यांचा १९४७ मध्ये विवाह झाला. त्यांची पत्नी खुर्शीद ही भारतीय नृत्यकलेत निपुण होती. चावडांनी भरतनाट्यम्, ओडिसी इत्यादी भारतीय नृत्यप्रकार व तसेच युरोपातील बॅले नृत्यप्रकारावर आधारित रंगीत चित्रे व रेखाटने केली.

          नित्यकर्मात व्यग्र असलेल्या व्यक्ती, व्यक्तिसमूह, तसेच विविध नृत्यप्रकारांत नर्तक, वादक यांच्या होणाऱ्या सुंदर हालचाली, त्यांतील चैतन्य, डौल, गती व लय यांकडे ते नेहमीच आकृष्ट होत असत. चित्रफलकावर इम्पॅस्टो पद्धतीने रंगलेपन करीत व प्रसंगी पेंटिंग नाइफने रंग लावत. त्यातून कधी रंग खरवडून काढलेली, तर कधी रंगवलेली आत्मविश्‍वासपूर्वक फिरणारी लयदार रेषा ही श्यावक्ष चावडांची खासियत होती. चित्रविषयाची जलद रेखाटने करून ते त्यातील गती, लय व लयबद्ध हालचाली कौशल्याने टिपत असत. रंगीत चित्रांमध्येदेखील रेखाटनाचे प्राबल्य राखून तजेलदार रंगांद्वारे ते चित्रात चैतन्य निर्माण करीत.

          रेषा, आकार, लय इत्यादी चित्रकलेच्या मूलभूत घटकांच्या मांडणीतून चित्रविषयातील सौंदर्य चावडांनी सादर केले. पुढे पुढे त्यांच्या चित्रात थोडीफार भावनिकता आली, तसेच त्यांनी चित्रविषयांचे अमूर्त शैलीतही चित्रण केले; परंतु विशेष करून ते चित्रविषयाच्या बाह्यरंगातच रमत असत. काही वेळा त्यांनी तांत्रिक आर्टमधील ‘यंत्रां’च्या प्रतिमा व प्रतीके वापरून चित्रनिर्मिती केली.

          त्यांचे पहिले एकल प्रदर्शन १९४५ मध्ये ताजमहाल हॉटेलच्या प्रिन्सेस रूममध्ये झाले. त्यानंतर त्यांची बरीच प्रदर्शने देशात व परदेशांत भरली. आज अनेक देशी-विदेशी संग्रहक, वस्तुसंग्रहालये व कलादालने यांच्या संग्रहात त्यांची चित्रे आहेत.

          मुंबईतील एअर इंडिया, बर्माशेल, रिलायन्स या उद्योगांची कार्यालये व पीपल्स इन्श्युअरन्स कंपनी, नॅशनल थिएटर फॉर परफॉर्मिंग आटर्स (एन.सी.पी.ए.) यांच्या वास्तूंसाठी त्यांनी उत्तम भित्तिचित्रे साकारली. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक शासकीय व खासगी संस्थांसाठी व्यावसायिक व्यक्तिचित्रेही रंगविली. बॉम्बे आर्ट सोसायटीतही ते काही काळ हेब्बर यांच्या सोबत कार्यरत होते व बॉम्बे आर्ट सोसायटीतील जुनाट विचारसरणी बदलून त्यात आधुनिक दृष्टिकोन आणण्यासाठी ते प्रयत्नशील असत. अतिशय सौम्य स्वभाव व शांत वृत्ती असणारे श्यावक्ष चावडा हे हृदयविकार होऊ नये म्हणून उठल्याबरोबर काहीही घेण्यापूर्वी लसणाची पाकळी चावून खात व तसे करण्यास इतरांनाही आवर्जून सांगत.

          वयाच्या शाहत्तराव्या वर्षी त्यांचे मुंबई येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांची मुलगी जेरू ऊर्फ ज्योती नृत्यनिपुण आहे व मुलगा परवेझ स्थापत्यविशारद आहे.

- डॉ. गोपाळ नेने

चावडा, श्यावक्ष धनजीभॉय