Skip to main content
x

चेंदवणकर, प्रल्हाद नामदेव

     प्रल्हाद चेंदवणकर यांचा जन्म माझगाव येथे झाला. वडील नामदेव व आई जनाबाई होय. चेंदवणकरांचे मूळ गाव नागेवाडी (जिल्हा सातारा), प्राथमिक शिक्षण माझगाव जुना बाजार शाळेत, माध्यमिक शिक्षण युनिअन हायस्कूल खेतवाडी येथे झाले. शालान्त परीक्षा १९५७ साली, बी. कॉम. १९६७ साली, एल.एल. बी. २००० साली, माझगाव डॉक या आस्थापनेतून संयुक्त वित्त प्रबंधक पदावरून निवृत्त (१९९५). 

     प्रल्हाद चेंदवणकर यांचे लेखन ‘चित्रा’ या साप्ताहिकातून सुरू  झाले. ‘ऑडिट’ (१९७६), ‘ऑर्डर... ऑर्डर’ (१९८४), ‘ऑगस्ट’ (१९९२), हे तीन कवितासंग्रह व ‘टांच’ हे आत्मकथन १९९४ साली प्रकाशित झाले. प्रकाशनापूर्वी  या आत्मकथनाचे अभिवाचन बावन्न भागांत आकाशवाणीवरून झाले.

     दलित पँथर चळवळीत चेंदवणकर सक्रिय होते. त्या काळात त्यांनी लिहिलेल्या कवितांचा ‘ऑडिट’ हा कवितासंग्रह होय. चळवळ चालू असताना चळवळीसाठी लिहिलेल्या कविता, हे या कवितेचे वैशिष्ट्य असून ती साधी सोपी व आवेशपूर्ण आहे. चेंदवणकर हे सामाजिक बांधीलकी मानणारे कवी आहेत. त्यांच्या कवितांतून या विचारांचे प्रकटीकरण होताना दिसते. दलितांच्या वाट्याला परंपरेने येत राहिलेल्या दुःखाची झळ व त्यातून निर्माण झालेल्या विद्रोहाला चेंदवणकरांनी शब्दरूप दिले.

     १९७६ साली प्रकाशित झालेल्या ‘ऑडिट’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा १९७६-१९७७ चे प्रथम प्रकाशन उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे १९७६-१९७७ चे कवी स. रा. गोखले पारितोषिक, माझगाव डॉक लिमिटेडच्या वतीने विशेष पुरस्कार प्राप्त झाले.

     ‘ऑर्डर ऑर्डर’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा १९८४-१९८५ सालचा कवी केशवसुत पुरस्कार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘ऑगस्ट’ या कविता संग्रहास माझगाव डॉकचा पुरस्कार. १९९९ साली औरंगाबाद येथे झालेल्या दुसर्‍या समरसता साहित्य संमेलनाचे निमंत्रक म्हणून प्रल्हाद चेंदवणकर यांनी काम पाहिले. सामाजिक समरसता मंचातर्फे दिला जाणारा संतसेवायोगी गाडगेमहाराज समरसता पुरस्कार मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

     दलित साहित्यातील व चळवळीतील मधल्या पिढीचे एक महत्त्वाचे कवी व कार्यकर्ते म्हणून चेंदवणकर यांचे स्थान महत्त्वाचे आहे.

- रवींद्र गोळे

चेंदवणकर, प्रल्हाद नामदेव