Skip to main content
x

चिमोटे, मनोहर

नोहर चिमोटे यांचा जन्म संगीताची रुची असणाऱ्या कुटुंबात नागपूर येथे झाला. त्यांना पं. भीष्मदेव वेदींचे मार्गदर्शन अगदी थोडा काळ मिळाले; मात्र त्यांनी आपल्या आकलनशक्तीद्वारे ‘संवादिनी’ या वाद्यावर पकड मिळवली. कुँवरश्याम परंपरेतील गायक लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडेही ते शिकले. चिमोटे हे काही काळ गायनास साथ करत असत. त्यांनी बडे गुलाम अली खाँ, आमीर खाँ, सलामत नझाकत अली खाँ, सिद्धेश्वरी देवी अशा नामवंत कलाकारांना साथ केली होती. मात्र संवादिनीवादकास त्या काळी मिळणारी दुय्यम वागणूक त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाला अपमानास्पद वाटू लागली. पुढे त्यांनी साथीदार ही भूमिका सोडून दिली व संवादिनीच्या एकलवादनासाठी प्रयत्न केले.
भीष्मदेव वेदींनी संवादिनीला तारांची जोड देऊन ‘सूरदर्पण’ हे वाद्य तयार केले होते. चिमोटे यांनी १९७० साली या ‘सूरदर्पण’मध्ये अजून काही सुधारणा करून
  तिला ‘सूरमनोहर’ असे नाव दिले. मात्र पुढे १९७२ साली हार्मोनिअमला स्वरमंडलची जोड देऊन त्यांनी जी हार्मोनिअम बनवली, तिला ‘संवादिनी’ असे नाव देऊन त्यांनी प्रसिद्ध केले. आज हार्मोनिअमसाठी ‘संवादिनी’ हा शब्द सरसकटपणे वापरला जातो, त्याचे श्रेय चिमोटे यांना जाते.
त्यांनी संवादिनीवादनासाठी ख्याल गायकीचा साचा अंगीकारला व गायनाच्या जवळ जाणारे वादन केले. त्यांच्या वादनावर उ. आमीर खाँ यांच्या गायकीचा मोठा परिणाम झाला. त्यांनी ख्यालाप्रमाणे बढत करून तंत अंगाने ‘झाला’ वाजवण्याचे तंत्र आत्मसात केले. पुण्याचा सवाई गंधर्व महोत्सव (१९६९), मुंबईचा सुरेशबाबू-हिराबाई समारोह (१९९४), गांधर्व महाविद्यालय, पुणे (१९९५), कोलकाता येथील संगीत रिसर्च अकादमी, मुंबई, बेळगाव इ. ठिकाणची संवादिनी संमेलने, ‘स्पीक मॅके’ अशा मंचांवरून त्यांनी एकल संवादिनीवादनाचे कार्यक्रम केले. श्रीधर पार्सेकर (व्हायोलिन), गोविंदराव पटवर्धन (संवादिनी), शाहिद परवेझ (सतार) व रोणू मुजुमदार (बासरी) अशा वादकांबरोबर त्यांनी जुगलबंदीचेही कार्यक्रम केले.
विरार येथे स्थायिक झाल्यावर त्यांनी आपले संगीत शिक्षण वर्ग मुंबईत गोरेगाव येथे सुरू केले व संवादिनीबरोबरच ते गायन, तबला व सतारही शिकवू लागले. त्यांच्या शिष्यांत प्रमोद मराठे, राजेंद्र वैशंपायन, जितेंद्र गोरे, भानू जोशी, संजय गहलोत, शारंगधर साठे, अमित दिवाडकर हे मुख्य आहेत. तसेच साधना सरगम, वैशाली सामंत, माधुरी करमरकर, माया माटेगावकर या त्यांच्या गायनातील विद्यार्थिनी होत. त्यांच्या शिष्यांनी ‘संवादिनी फाउण्डेशन’तर्फे या वाद्याचा प्रसार करण्याचे कार्य चालवले .
मुंबईच्या सुरसिंगार संसदतर्फे ‘सुरमणि’ हा किताब, गांधर्व महाविद्यालयाचा ‘आदर्श संगीत शिक्षक’ पुरस्कार (१९९५), ‘महाराष्ट्र राज्य सरकार गौरव’ पुरस्कार, ‘वर्तक अवॉर्ड’, गानवर्धनतर्फे ‘स्व. लीलाबाई जळगावकर’ पुरस्कार (२००९) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले . वयाच्या ८३व्या वर्षी मुंबईत त्यांचे निधन झाले.

          चैतन्य कुंटे

चिमोटे, मनोहर