चिमुलकर, रघुवीर गोविंद
रघुवीर गोविंद चिमुलकर हे गोव्यात जन्मलेले व १९३० च्या दरम्यान नावारूपाला येऊ लागलेले ‘बॉम्बे रिव्हायव्ह-लिस्ट स्कूल’ या कलाचळवळीतील एक महत्त्वाचे चित्रकार होते. लयबद्ध व तरल रेषा आणि विलक्षण आकार व जलरंगाच्या हळुवार वापरातून काव्यात्म व गूढभाव निर्माण करणारी वॉश टेक्निकमधील चित्रशैली ही त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये होती. अवघ्या त्रेचाळीस वर्षांचे जीवन जगलेला हा चित्रकार, शेवटची आठ वर्षे वेड लागलेल्या अवस्थेत, भ्रमिष्टासारखे जीवन जगला. अखेरीस ठाण्याच्या मनोरुग्णालयामध्ये त्यांचे अकाली निधन झाले. अतिशय प्रतिभावंत, भावनाशील पण यातनामय आयुष्य जगलेल्या या चित्रकाराचे जीवन म्हणजे नियतीचा विलक्षण खेळच!
चिमुलकरांचे मूळ गाव गोव्यातील वड्डे कांदोळी-बारदेस हे होय. त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी, पोंबुर्बा-बारदेस येथे झाला. घरची परिस्थिती साधारणच होती. त्यातच रघुवीर सात वर्षांचा असताना वडील गोविंदबाब यांचे निधन झाले. तीन मुले पदरात असलेली रघुवीरची आई मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून मुंबईस आली आणि तिची थोरली बहीण व तिचे यजमान दांडे मास्तर यांच्या आधाराने राहू लागली. मोठा भाऊ अनंतबाब याने सारस्वत संस्थेत शिपायाची नोकरी स्वीकारली व नऊ वर्षांचा रघुवीर घरोघरी वृत्तपत्रे टाकून अर्थार्जन करू लागला.
अशी दोन वर्षे उलटली व काहीतरी आजाराचे निमित्त होऊन आईचेही निधन झाले व ही तीनही मुले अनाथ झाली. आता सतरा वर्षांचे मोठे बंधू अनंतबाब यांनी आपल्या भावंडांची जबाबदारी घेतली. पुढील आयुष्यातही अखेरपर्यंत त्यांनी आपल्या या कलावंत भावाचा प्रतिकूल परिस्थितीतही सांभाळ केला व मृत्यूनंतरही त्याची चित्रे व स्मृती जपल्या.
रघुवीर लहानपणापासून बुद्धिमान असल्यामुळे सर्वजण त्याच्याकडे विशेष लक्ष देत. आता त्याचे शिक्षण मावशीचे यजमान शिकवत असलेल्या गिरगावातील चिकित्सक समूहाच्या शाळेत सुरू झाले. १९२०च्या दरम्यान गांधीजींची असहकाराची चळवळ सुरू झाली. त्यात रघुवीरसारखा बुद्धिमान व भावनाप्रधान तरुण मुलगा सहभागी झाला व त्याच्या पुढाकाराने असहकार चळवळीला प्रतिसाद म्हणून शाळा बंद पाडली गेली.
रघुवीरसारख्या अनाथ, होतकरू व हुशार मुलाने हा उद्योग करावा हे मुख्याध्यापक नेरूरकर यांना आवडले नाही. त्यांनी रघुवीरला समजावून सांगितले; पण तो ऐकेना. शेवटी हा मुलगा वाया जाऊ नये या हेतूने, त्याला शिक्षा म्हणून इंग्रजी पाचवीच्या वर्गातच बसविण्याचे ठरविले. यामुळे रघुवीर संतापला व त्याने शाळेत जाईन तर सहावीच्याच वर्गात, असा हट्ट धरला. इतर विद्यार्थ्यांनीही त्याला साथ दिली. शेवटी नेरूरकरांनी हे प्रकरण अधिक न ताणता शिक्षा मागे घेऊन त्याला इंग्रजी सहावीत बसण्यास परवानगी दिली.
पण मनस्वी स्वभावाच्या रघुवीरचे मन शालेय शिक्षणावरून उडाले आणि शाळेत न जाता तो जवळच राहणाऱ्या गोमंतकीय चित्रकार अनंत वामन घोटिंग यांच्याकडे जाऊ लागला. त्याला चित्रकलेतच जास्त गोडी वाटू लागली. हे बघून मावशीचे यजमान दांडे मास्तर त्याला सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील शिक्षक ए.ए. भोंसुले यांच्याकडे घेऊन गेले व त्यांच्या मदतीने १९२४ पासून चिमुलकरांचे सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील शिक्षण सुरू झाले.
त्या काळी जे.जे.मधील शिक्षण ब्रिटिश अकॅडमिक पद्धतीचे होते. पण त्या सोबतच कलेतील भारतीयत्व जपणारी भारतीय पुनरुज्जीवनवादी कलाचळवळीची ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ची सुरुवात झाली होती. भारतीय स्वातंत्र्यलढा व असहकाराची पार्श्वभूमीही त्याला अप्रत्यक्षपणे लाभली होती. या शैलीकडे चिमुलकर आकर्षित झाले व या शैलीत काम करणार्या गुणवंत हणमंत नगरकर या त्यांच्या शिक्षकांपासून त्यांनी प्रेरणा घेतली. अल्पावधीतच ‘वॉश टेक्निक’ या प्रकारची चित्रे रंगविण्याच्या तंत्रात त्यांनी प्रावीण्य मिळविले.
वॉश टेक्निकमधील चित्र काढण्यापूर्वी कागद बोर्डावर ताठ राहील असा चिकटवला जात असे. त्या कागदावर लयदार रेषेत नियोजित विषयाचे रेखांकन करून त्यावर पारदर्शक जलरंगांचा रंगलेप (वॉश) दिला जाई. अशा प्रकारे संपूर्ण चित्र जलरंगाच्या विविध छटांनी भरल्यावर त्या चित्राला चक्क पाण्याने अंघोळ घालत. काही वेळा ब्रशच्या साहाय्याने, तर काही वेळा चक्क नळाखाली धरून! पण अशा प्रकारे चित्र धुतल्यानंतरही काही रंग कागदाशी एकरूप होऊन त्यांचे अस्तित्व दिसत राही. ही प्रक्रिया चित्रकाराला अपेक्षित परिणाम व विविध रंगछटा प्राप्त होईपर्यंत सुरूच राही.
काही वेळा आठवडाभरासाठी, तर काही वेळा महिनाभर अशी चित्रे सुरू राहत. शेवटी अपेक्षित गहिरेपणा प्राप्त झाला की ही प्रक्रिया थांबवून लयबद्ध व नाजूक रेषांनी रेखांकन केले जाई. आवश्यक वाटल्यास डोळे, दागिने, कपडे अशा मोजक्याच ठिकाणी पांढरा रंग वापरत. एवढ्या उद्योगानंतर या प्रकारची चित्रे पूर्ण होत. परंतु ही प्रक्रिया केल्यामुळे ही चित्रे अत्यंत तरल, संवेदनाक्षम दिसत व आजही अशी चित्रे पाहणाऱ्याची दृष्टी गुंग करून टाकतात.
चिमुलकरांच्या चित्रातील आकार, रचना, रंगसंगती, रेषेचे लालित्य व त्यातून निर्माण होणारा भावोत्कट आविष्कार यांतून त्यांची स्वत:ची अशी शैली विकसित झाली. लवकरच ही शैली ‘चिमुलकरी शैली’ म्हणून ओळखली जाऊ लागली. चिमुलकरांची चित्रे बघून जे.जे. स्कूलचे संचालक सॉलोमन यांनी अभिप्राय व्यक्त केला की, ‘रोजच्या परिचित वस्तूंमधून हा माणूस कसा काय इतक्या विचित्र आणि गूढार्थाने भरलेल्या प्रतिमा आणि आकारांची कल्पना करू शकतो?’
चिमुलकर १९२९ मध्ये पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले. याच वर्षी दिल्ली येथे नव्याने बांधल्या गेलेल्या इंपीरिअल सेक्रेटरीएट या इमारतीचे प्रतिष्ठेचे काम जे.जे. स्कूलला मिळाले. या कामात चिमुलकर सहभागी झाले. शिवाय त्यांना फिगर कॉम्पोझिशनसाठी असणारे ‘वॅडिग्टन’ प्राइझही मिळाले. त्यांनी १९३०-३१ या वर्षात म्यूरल डेकोरेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला व प्रतिष्ठेचा, ‘डॉली कर्सेटजी मेमोरिअल कॉम्पिटिशन’चा प्रथम पुरस्कारही मिळवला.
त्यांना १९३२ मध्ये जे.जे.मधील शिक्षणक्रमात सातत्याने सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या विद्यार्थ्याला देण्यात येणारे ‘मेयो पदक’ देण्यात आले. त्यांची १९३३-३४ व १९३६-३७ या दोन वर्षी जे.जे.त ‘फेलो’ म्हणून नेमणूक करण्यात आली.
त्यांच्या चित्रांमधून १९३१पासून एक वेगळेच वैशिष्ट्य प्रकट होऊ लागले. १९३१ ते १९४० ही वर्षे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील अत्यंत यशस्वी कालखंड होता. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात त्यांना ताम्रपदक (१९३१), रौप्यपदक (१९३३) व उत्कृष्ट फिगर कॉम्पोझिशनचे पारितोषिक १९३४ व १९४० या वर्षी मिळाले. याशिवाय त्यांना पूना एक्झिबिशन, म्हैसूर दसरा एक्झिबिशन, सिमला फाइन आर्ट सोसायटीचे मानाचे पुरस्कारही प्राप्त झाले. त्यांची चित्रे १९३४मध्ये लंडन येथील बर्लिंग्टन आर्ट गॅलरीत प्रदर्शित झाली.
१९३७मध्ये रॉयल इन्स्टिट्यूट गॅलरीज लंडन येथे भरलेल्या आर्टिस्ट्स ऑफ द ब्रिटिश एम्पायर ओव्हरसीज एक्झिबिशन या प्रदर्शनात त्यांची चित्रे प्रदर्शित झाली व त्यांतील वेगळ्या व हळुवार भावोत्कट आविष्कारामुळे ती नावाजली गेली. याच काळात हॉलिवुडच्या मेट्रो गोल्डविन मेयर कंपनीने मेट्रो सिनेमागृह बांधले. तेथील काही भित्तिचित्रांचे काम रघुवीर चिमुलकरांनी केले होते.
जेमतेम पाच फूट उंचीची लहानशी मूर्ती, किरकोळ देह, बसके गाल, सावळा वर्ण व ओठांवर मिशी असे रघुवीर चिमुलकर सदरा, कोट, डोक्यावर टोपी, धोतराचा काचा व पायात वहाणा या वेषात वावरत. ते जलद गतीने चालत. त्यांना व्यसने फक्त दोनच. विडी ओढण्याचे आणि भारतीय शैलीत अद्भुत आकार असलेली चित्रे काढण्याचे. ते फारसे बोलत नसत. रिकामे असताना उशीला टेकून विडीचा झुरका मारण्यात दंग होत. पेंटिंग करायला बसले की ते तासन्तास तल्लीन होत. त्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत आणि साहित्य, कला, संस्कृतीबद्दल ओढ असणारे होते. त्यांच्या खोलीवर कवी बा.भ. बोरकर, साहित्यिक बा.द. सातोस्कर, नाट्यक्षेत्रातील व संगीत क्षेत्रातील गायक-वादक मंडळी जमत. एरवी अबोल असणारे चिमुलकर अशा मंडळींसोबत खुलत. पण ते सामान्यपणे जीवनाकडे तटस्थ व निरिच्छ वृत्तीनेच पाहत. १९३५ मध्ये र.ज. सामंत यांनी काढलेल्या ‘पारिजात’ नावाच्या मासिकात व १९४० मध्ये ‘ज्योत्स्ना’ मासिकात चिमुलकरांनी लिहिलेले चित्रकलाविषयक लेख प्रसिद्ध झाले होते.
अशा प्रकारे कलावंताचे यशस्वी जीवन जगत असतानाच चिमुलकरांच्या जीवनाला विलक्षण करुण कलाटणी मिळाली आणि त्यांनी १९३९ मध्ये सुरू केलेला ‘चिमुलकर्स कॉम्पोझिशन क्लास’ त्याला कारण ठरला. गिरगावातील पाववाला मार्गावरील गायकवाड इमारतीमधील या क्लासचे उद्घाटन २७ ऑगस्ट १९३९ या दिवशी कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांच्या हस्ते झाले. भारतीय शैलीच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू झालेल्या या क्लासला, स्वदेशीच्या मंत्राने भारलेल्या असहकाराच्या चळवळीच्या काळात चांगलाच प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या वाढू लागली.
या विद्यार्थिनींमधील एका सुस्वरूप विद्यार्थिनीबद्दल चिमुलकरांना आकर्षण वाटू लागले. पण हे प्रेम आर्थिक विषमता व तत्कालीन सामाजिक परिस्थितीमुळे अव्यक्तच राहिले. चिमुलकरांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होऊन ते झुरू लागले व १९४०च्या उत्तरार्धात भ्रमिष्टासारखे वागू लागले. तत्पूर्वीच्या आयुष्यात राधा-कृष्णाचा शृंगार किंवा नल-दमयंतीचे अथवा दुष्यंत-शकुंतलेचे प्रेम उत्कटतेने रंगविणाऱ्या चिमुलकरांना स्त्रियांसंदर्भात प्रत्यक्षात तारुण्यसुलभ आसक्तीही नव्हती. पण आता या कलावंताच्या अंतर्मनात काहीतरी प्रचंड खदखदू लागले आणि त्याचे प्रत्यंतर त्यांच्या चित्रांमधून येऊ लागले.
अशोकवनातील सीता, महाकवी कालिदास व प्रेयसी किंवा स्वर्ग-नरक अशा चित्रांतील त्यांच्या आकारांतून भयप्रद जाणिवा व्यक्त होऊ लागल्या. आधुनिक चित्रकलेतील अतिवास्तववादी चित्रकार साल्वादोर दाली यांच्या चित्रांतून दिसणारी भयावह स्वप्नसृष्टी व कल्पनेची झेप याच्याशी त्यांची काहीशी तुलना होऊ शकेल. पण या कलाविष्काराचे महत्त्व ना त्यांच्या कुटुंबाने ओळखले, ना त्यांच्या तत्कालीन कलावंतांनी त्याची दखल घेतली. सर्व जण म्हणत, ‘काय हे भयानक आकार!’
हळूहळू त्यांचा भ्रमिष्टपणा वाढतच होता. अंघोळ नाही, दाढी नाही, विड्या ओढणे व चहा पिणे सतत सुरू असे. काही वेळा ताठ व भकास डोळ्यांनी ते चालत सुटत. कधीतरी ओळख दाखवत व दाखवलीच तर डोळे वटारून त्याच्याशी बोलत. खिशात पैसे नसले तर हक्काने मागत. भ्रमिष्टावस्थेतही लहर आली की तासन्तास चित्र रंगवीत बसत. त्यात अतृप्त इच्छा, आकांक्षास्वरूप शरीरे व नग्न स्त्रिया किंवा मानवाकृती असत. तंत्र तेच असे. तसेच लयपूर्ण पण विरूपीकरणाकडे झुकणारे आकार व गुंगवून टाकणारे रंगांचे वॉश भ्रमिष्टावस्थेतही कागदावर उमटत. त्यातील काही चित्रे अपूर्ण राहिली. पूर्वीच्या चित्रांतून स्त्री-पुरुषांच्या शरीरांतून मानवी शरीराचे सौंदर्य, प्रमाणबद्धता व आकारवर्तनाचा मनोहर खेळ पाहावयास मिळे. चित्रांचे विषयही भारतीय पुराणे, इतिहास आणि शृंगार, करुण, वीर असे विविध रस व्यक्त करणारे असत. आवश्यकता असेल तरच त्यांत भयावह आकार अवतरत. पण प्रेमभंगानंतरच्या त्यांच्या चित्रांतून अतृप्ती, निराशा, लालसा, वासना आणि त्यांच्या पूर्ततेसाठी चालणारी धडपड दिसू लागली.
खरे तर, अशा प्रकारे कोणत्याही आकाराला कशाही प्रकारे अभिव्यक्तीसाठी वळवणे, वाकविणे व आवेगाने व्यक्त करणे ही कलेतील पुढची पायरीच होती. पण काळाच्या पुढे जाऊन अभिव्यक्तीच्या वाटा शोधणाऱ्या अशा कलाकृती दुर्दैवाने उपेक्षितच राहिल्या व त्यांतील भयावहतेमुळे बऱ्याचशा नष्ट झाल्या.
चिमुलकर १९४८ च्या दरम्यान प्रक्षुब्ध मनोवस्थेत हिंसक बनू लागले. शेवटी त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात हलवले व तेथेच त्यांचे निधन झाले. आजूबाजूचे जग व कलावंत त्यांना विसरलेच होते; पण अकाली निधन झालेल्या चिमुलकरांना त्यांची प्रेयसी ‘कमला’ मात्र विसरली नाही. त्यांना मोठे बंधू अनंतबाब व कमला अखेरपर्यंत भेटायला येत. कमला आयुष्यभर अविवाहित राहिली.
आज चिमुलकरांच्या उपलब्ध चित्रांची संख्या अत्यंत कमी आहे; पण या मोजक्याच चित्रांतून त्यांचे उत्तम आरेखन, वॉश टेक्निकमधील चित्रे रंगविण्याचे प्रभुत्व व अजोड कल्पनाशक्तीचा संगम आढळून येतो. जगप्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉग व चिमुलकर यांच्या जीवनात विलक्षण साम्य आढळते. विलक्षण जीवन जगलेले चिमुलकर व त्यांची चित्रनिर्मिती १९४८ मध्ये झालेल्या त्यांच्या मृत्यूनंतर दुर्दैवाने अद्यापिही अज्ञात व उपेक्षितच राहिली आहे.
- सुहास बहुळकर