Skip to main content
x

चिपळूणकर, कृष्णशास्त्री हरी

     अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या पूर्वतयारीच्या कालखंडात, मराठी भाषेला आपल्या भाषांतर प्रभुत्वामुळे डौलदार वळण प्रदान करणारे तसेच मराठी भाषा, व्याकरण, निबंध यांविषयी मौलिक विवेचन करून; मराठी भाषेच्या जडणघडणीस दिशा देणारे भाषाप्रभू म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांचा जन्म पुण्यात झाला. पुणे पाठशाळा व पूना कॉलेजमध्ये त्यांचे अध्ययन झाले. अलंकार, न्याय, धर्म, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, या विषयांच्या सखोल अध्ययनाबरोबरच मराठी, इंग्रजी, संस्कृत या तीनही भाषांचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. त्यामुळेच पुणे पाठशाळेचे उपप्राध्यापक, ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य, दक्षिणा प्राईज कमिटीचे चिटणीस अशी महत्त्वाची पदे त्यांच्याकडे चालत आली व ती त्यांनी आपल्या अजोड कार्यशैलीमुळे झळाळून टाकली.

     मराठी ‘शालापत्रक’ व ‘विचारलहरी’ या नियतकालिकांचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. मात्र तत्कालीन परिस्थितीच्या रेट्यामुळे अंगी क्षमता असूनही स्वतंत्र ग्रंथलेखन त्यांच्या हातून घडले नाही. परंतु त्यांच्यातला भाषांतरकार, रसिक पंडित, तत्त्वचिंतक, समाजधुरीण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे वयाच्या २८व्या वर्षी म्हणजे १८५२ मध्ये त्यांनी ‘विचारलहरी’ नावाचे पाक्षिक काढून त्याद्वारे आपल्या धर्मविषयक चिंतनाला प्रथम वाट करून दिली. तत्कालीन मिशनर्‍यांच्या ख्रिस्ती धर्मप्रचाराच्या चळवळीला त्यामुळे शह बसला.

     विदेशी साहित्य अनुवाद-

     त्यांनी १८५२ मध्येच प्रख्यात ग्रीक विचारवंत सॉक्रेटिस याच्या चरित्राचा अनुवाद मराठीत केला. पुढे तीनच वर्षांनी जॉन स्टुअर्ट मिलच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या इंग्रजी ग्रंथाचेही भाषांतर त्यांनी मराठीत केले व ‘अर्थशास्त्र परिभाषा प्रकरण पहिले’ या नावाने काही भाग प्रसिद्ध केला. त्यांच्या या प्रयत्नामुळे अर्थशास्त्रासारख्या महत्त्वाच्या विषयाची परिभाषा त्या काळात समाजापर्यंत पोचली. पण इंग्रजी ग्रंथांच्या परिचयामुळे तत्कालीन सुशिक्षित वर्गाची ज्ञानभूक वाढत होती आणि आपल्या मातृभाषेत इंग्रजी भाषेतील ग्रंथांप्रमाणे ग्रंथ असावेत असे वाटू लागले होते. त्यातूनच चिपळूणकरांनी अनेक इंग्रजी ग्रंथांचा आधार घेऊन १८६१ मध्ये ‘अनेकविद्यामूलक तत्त्वसंग्रह’ हा पदार्थविज्ञान, गणित, ज्योतिष, साहित्य, कला, नीती, अशा विविध विषयांची सहज, सोप्या शब्दांत माहिती करून देणारा ग्रंथ प्रकाशित केला व अशा विषयांवर मराठीत लेखन करता येऊ शकते, हे सर्वांना दाखवून दिले.

     याच वर्षी त्यांनी अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टींचे मराठीत भाषांतर करून, लोकांची मनोरंजनाची भूक भागविली. या ग्रंथामधून आलेले अद्भुत घटनांचे व प्रसंगांचे वर्णन वाचले म्हणजे चिपळूणकरांची भाषाशैली प्रसंगाला अनुसरून कसे चपखल रूप धारण करते व मनाचा ठाव घेते, याचा प्रत्यय येतो.

     संस्कृत साहित्य अनुवाद-

     संस्कृत काव्य नाटकांचे मराठी भाषांतर करण्यात तर त्यांचा हातखंडा होता. १८६५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘पद्यरत्नावली’मध्ये त्यांनी केलेले मेघदूताचे भाषांतर समाविष्ट आहे. त्याचे परिशीलन केले म्हणजे त्यांची काव्यरचनाही किती रेखीव, रसाळ व रमणीय आहे, याचे प्रत्यंतर येते. कालिदासाचे मेघदूत करुण अशा ‘मंदाक्रांता’ वृत्तात आहे. पण भाषांतर करताना चिपळूणकरांनी साकीसारखा प्राकृत छंद वापरूनही मूळच्या कारुण्याला व सौंदर्याला अजिबात धक्का लागू दिला नाही. जगन्नाथ पंडिताच्या भामिनीविलासाच्या आधाराने ‘विरहिविलाप’ या काव्याची त्यांनी केलेली रचना मूळ काव्यापेक्षाही अधिक सुंदर झाली आहे. ‘अन्योक्तिकलाप’ या नावाने त्यांनी कालिदास, भवभूती, बिल्हण, श्रीहर्ष इत्यादी संस्कृत कवींच्या काव्याचा मराठीत करून दिलेला परिचयही असाच रसाळ आहे. संस्कृत भाषेप्रमाणे इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व असल्याने डॉ. जॉन्सनच्या ‘रासलेस’ या तात्त्विक कादंबरीचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद तेवढाच परिणामकारक व सकस आहे. ते केवळ भाषांतरातच गढून गेले नाहीत तर मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार्‍या विषयांकडे त्यांनी मोठ्या बारकाईने लक्ष घातले. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिलेल्या व्याकरणाची नुसती प्रशंसा करून ते थांबले नाहीत तर ‘पुणे पाठशाळा पत्रक’ (१९६४) या मासिकामध्ये त्यांनी या ग्रंथावर पंचवीस निबंध खंडशः प्रकाशित केले व नवीन परिभाषा योजून व्याकरणविषयक विचारात मौलिक भर घातली. संस्कृत पुस्तकांचे मराठीत भाषांतर का करायचे, याविषयीचा त्यांचा दृष्टीकोनही असाच वेगळा होता. संस्कृत नाटकांमध्ये बालभाषा असते. तिच्या सखोल अभ्यासातून मराठी, गुजराती वगैरे भाषा कशा निर्माण झाल्या हे कळू शकते. तसेच ज्ञानेश्वरीसारखे जुने ग्रंथ व जुने लेखही समजून घेता येऊ शकतात. असे मर्मग्राही प्रतिपादन त्यांनी केले. पुणे पाठशाळा पत्रकातून ‘व्यसनाविषयी’, ‘वाचनाविषयी’, ‘कलेविषयी’, ‘मराठी भाषेविषयी’ अशा विविध विषयांवर त्यांनी स्फुट निबंध लिहून मराठी निबंधाला शास्त्रीय व लालित्यपूर्ण रूप प्रदान केले. अप्रस्तुत प्रशंसेसाठी ‘अन्योक्ती’ हा काव्यप्रकार त्यांनीच मराठीत रूढ केला.

     ज्ञानेश्वरांची ओवी, तुकारामांचा अभंग, मोरोपंतांची आर्या, वामनाचा श्लोक हे सारे जसे प्रसिद्ध आहे, तशीच शास्त्रीबुवांची साकी प्रसिद्ध आहे. अव्वल इंग्रजी कालखंडात कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेविषयी केलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. ते कधीही विस्मृतीत जाऊ शकत नाही.

     - डॉ. संजय देशमुख

चिपळूणकर, कृष्णशास्त्री हरी