Skip to main content
x

चिपळूणकर,विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री

     विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावचे. परंतु त्यांचे आजोबा हरिपंत चिपळूणकर हे पेशव्यांच्या नोकरीत असल्याने, १८व्या शतकाच्या अखेरीस हे घराणे पुण्यात स्थायिक झाले. हरिपंतांचे थोरले चिरंजीव कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे थोरले चिरंजीव म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर. त्यांचा जन्म पुण्यात झाला. पुणे ही परंपरेने महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. हा सांस्कृतिक वारसा, पुण्याने ज्या मौलिक परंपरेने कायम केला, त्यात ऐतिहासिक महत्त्वाच्या विविध भौतिक संपदांचा आणि राजकीय व सामाजिक घटनांचा लौकिक अर्थाने समावेश होतो. त्यांच्या बालमनावर झालेले परिस्थितीजन्य घरंदाज संस्कार व पुण्याच्या ऐतिहासिक बाबींचे अध्ययन करण्याच्या त्यांच्या विजिगीषू वृत्तीमुळे त्यांचे सामाजिक व राजकीय विचारप्रवण चारित्र्य घडले. आज २०व्या शतकातही त्यांचे वाङ्मयीन भाषासौंदर्य व त्यांचे सामाजिक व राजकीय विचार, भलेही कालौघात विभावितदृष्ट्या विपर्यस्त वाटत असले; तरी चिंतन, मनन व संशोधन या संदर्भात विचारप्रवर्तक वाटतात.

     विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या व्यक्तिमत्त्वाची पुण्यातील ज्या भौतिक व अभौतिक उपलब्धींमुळे जडणघडण झाली, त्यात त्यांचे वास्तव्य असलेला कर्वेवाडा व पेशवाईचे वतनवाडी वैभव सांगणारा नाना फडणविसांचा वाडा आणि विविध ऐतिहासिक खलबतांचे केंद्र ठरलेला शनिवारवाडा इत्यादी वास्तुशिल्पांचे त्यांनी तत्कालीन श्रेष्ठींकडून ज्ञात केलेले माहात्म्य, तसेच आजोबांचे संस्कार इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. याशिवाय त्यांची वेदाभ्यासातील रुची, त्यांचे तीर्थरूप कृष्णशास्त्री यांच्याकडून त्यांनी गिरविलेले साक्षेपी तथा समीक्षणात्मक संस्कृत व इंग्रजी साहित्याचे पाठ आणि हरिशास्त्री पंडित या संस्कृत विद्वानाकडून त्यांनी ऐकलेला मराठ्यांचा इतिहास व मनोगम्य शौर्यकथा इत्यादींमुळे ज्ञानलालसा, प्रखर राष्ट्राभिमान, जाज्वल्य राष्ट्रभक्ती, आणि स्वसंकृतीचे रक्षण या शाश्वत राष्ट्रीय गुणांची त्यांच्या मनात अत्यल्प वयातच रुजवण झाली. परिणामी, स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वराज्यवट व स्वराजधर्म या स्वत्त्वगुणांचे अग्रगामी अभियाचक म्हणून महाविद्यालयीन प्रवेशापूर्वीच ते अनेकांना ज्ञात झाले. 

     पुणे हायस्कूलमधून १८६५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य इंग्लंडमधील प्रसिद्ध कवी वर्डस्वर्थ यांचे नातू विल्यम वर्डस्वर्थ हे होते, जे स्वतः साहित्य व इतिहास शिकवीत. या प्राचार्यांच्या व प्रा.फांझ किलहर्न यांच्या स्वदेशाभिमानी आचरणाचा विष्णुशास्त्र्यांवर प्रचंड प्रभाव होता. त्यांच्या सल्ल्यामुळेच त्यांना अभ्यासक्रमाच्या नेमस्त पुस्तकांव्यतिरिक्त अन्य पुस्तके वाचण्याचा छंद जडला. पाच वर्षे महाविद्यालयात राहूनही, त्यांना बी.ए.ची पदवी खासगीरीत्या प्राप्त करावी लागली असली, तरी महाविद्यालयातील शिक्षणकाळात त्यांनी तेथील ग्रंथालयातील बहुतेक सर्व पुस्तके वाचून काढली. परिणामी, प्रदीर्घ वाचन व त्यायोगे जिगरी भिनणार्‍या जालीम लिखाण-कौशल्यासाठी अभिप्रेत असलेल्या असामान्य प्रतिभेचा संचार त्यांच्यात झाला. त्यांच्या या असामान्य प्रतिभेच्या आविष्काराची अनुभूती, १८६८ ते १८७५ या काळात त्यांनी प्रकाशित केलेल्या सरकारी ‘शालापत्रक’ या मासिकातून जाणवली. ‘शालापत्रक’ या मासिकातून त्यांची भवभूती, कालिदास या प्राचीन संस्कृत कवींच्या काव्यात राज्य व धर्म या बाबींचे कोटकल्याणार्थ पथदर्शी हितगुज असल्याचे समीक्षण केले. त्याची वाङ्मयीन जाण पुढे जहाल तेजस्वी रूप धारण करू लागली. त्यांच्या या लिखाण-कौशल्याची प्रचिती खर्‍या अर्थी त्यांच्या निबंधमालेतून आली; कारण निबंधमालेतील प्रत्येक लेखाचे विश्लेषण करणे म्हणजे वाचकांची कसोटीच होती.

   विष्णुशास्त्र्यांची ‘निबंधमाला’ ही विशिष्ट काळातील त्यांची अनुभूतिसापेक्ष वैचारिक अभिव्यक्ती म्हणता येईल. त्यांच्या निबंधमालेचा पहिला अंक २५जानेवारी, १८७४ रोजी प्रकाशित झाला. या निबंधमालेत जे लेख त्यांनी लिहिले, त्यात सतत चर्चेत राहिलेले लेख कोणते? ही क्रमवारी लावणे त्यातील विचारांच्या दृष्टीने अशक्यच आहे. तथापि ‘डॉ.जॉन्सन’, ‘लोकहितवादी’, ‘फुले’, ‘लोकभ्रम’, ‘दयानंदांवरील टीका’ व ‘आमच्या देशाची स्थिती’ हे लेख लक्षवेधी ठरले; कारण या लेखांत त्यांनी विशिष्टांना विशिष्ट पद्धतीने लक्ष्य केल्याचे जाणवते.

     निबंधमालेच्या आरंभापूर्वी महाराष्ट्रातील अनेक विचारवंत ब्रिटिश राजवटीचे स्तुतिपाठक असल्याचे दिसत होते; कारण त्यांचे लक्ष्य राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणांकडे अधिक होते असे त्यांच्या विचारप्रबोधनातून जाणवते. परंतु निबंधमालेच्या आरंभाने ‘राजकीय स्वातंत्र्य आधी की समाजसुधारणा आधी?’ अशी दोन विचारप्रवर्तने सुरू झाली. विष्णुशास्त्री या विचारद्वंद्वात राजकीय स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या निबंधमालेमुळे १९व्या शतकात महाराष्ट्रात नवीन विचारयुग सुरू झाले. निबंधमालेच्या माध्यमातून विष्णुशास्त्र्यांनी भारतातील धर्म, संस्कृती, भाषा, परंपरा तथा रूढी यांची तरफदारी केली. एवढेच नव्हे, तर आपली सामाजिक व धार्मिक व्यवस्था उत्तम असल्याने, तत्कालीन स्थितीत त्यात परिवर्तन आणण्याचे प्रयोजन नाही; आपले प्रमुख लक्ष्य राजकीय स्वातंत्र्य मिळवणे हेच असले पाहिजे; स्वातंत्र्योत्तर काळनिहाय सामाजिक सुधारणा क्रमाक्रमाने घडून येतील, हा त्यांचा युक्तिवाद होता.

    परिणामस्वरूप, आपल्या देशात सुशिक्षितांमध्ये रुजलेल्या व्यसनप्रवण अशा पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणास आळा घालणे व आपल्या मूल्यव्यवस्थेचे रक्षण करणे आणि देशाच्या अधोगतीला कारण ठरलेली ब्रिटिशांची जुलमी राजवट झुगारून देणे; ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी विष्णुशास्त्र्यांनी सामाजिक परंपरावाद व राजकीय जहालवाद पुरस्कृत केला. लेखन व भाषण स्वातंत्र्याच्या प्रतिबंधात्मक काळात, त्यांनी जोखीम पत्करून ‘निबंधमाला’ व ‘केसरी’ यांमध्ये केलेले जालीम व मार्मिक लिखाण म्हणजे संबंधितांसाठी शाब्दिक घायाळपर्वच ठरले. त्यांच्या परंपरावादी विचारांवर पाश्‍चात्त्य विचारवंत एडमंड बर्क यांच्या राजकीय व सामाजिक समन्वयात्मक परंपरावादातील विचारपरिवर्तनाचा प्रभाव जाणवतो. त्यांनी आत्मसात केलेल्या जहाल व प्रबुद्ध विचारशैलीवर व विद्वत्ताप्रचुर भाषाशैलीवर हटवादी राष्ट्राभिमानी व इंग्रजी भाषेचे विकासप्रवर्तक सॅम्युअल जॉन्सन, पाश्‍चात्त्य लेखकद्वय जुनिअस व अ‍ॅडिसन आणि इतिहासकार मेकॉले ह्यांचा प्रभाव असल्याचे लक्षात येते.

     विष्णुशास्त्र्यांनी निबंधमालेत लिहिलेल्या ८४ लेखांतून व केसरीतील विपुल लिखाणातून स्वातंत्र्याच्या मार्गात येणार्‍या कृती व प्रवृत्ती यांवर शाब्दिक शरसंधान साधणे आणि स्वातंत्र्यासाठी जनजागृती करण्यापोटी जनप्रक्षोभ तीव्र करणे ही दोन्ही कामे एकाच वेळी केली. त्यांच्या जहाल विचारांचा  प्रभाव लोकमान्य टिळकांवरही पडल्याचे स्पष्ट दिसते, कारण ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य’ हे घोषवाक्य त्यांनी विष्णुशास्त्र्यांच्या प्रेरणेतूनच स्वीकारल्याचे जाणवते. ‘काळ’कर्ते शि.म.परांजपे यांचे अंतर्मुख करणारे जहाल लिखाणदेखील प्रत्यक्षाप्रत्यक्ष विष्णुशास्त्र्यांच्या त्यांच्यावरील प्रभावाचा परिणाम म्हणता येईल. ‘केसरी’ व ‘निबंधमाला’ वगळता, त्यांचे इतर लिखाण मराठी वाङ्मयातील प्रतिभा व प्रतिमा यांना अप्रतिम भाषासौंदर्याने सालंकृत करणारे आहे.

     असा हा प्रतिभासंपन्न भाषाप्रभू, सामाजिक परंपरावादाचा व जहालवादाचा जनक, जनतेला स्वातंत्र्याचा प्रक्षोभी मूलमंत्र देऊन १७ मार्च, १८८२ रोजी अनंतात विलीन झाला.

     काही विचारवंतांनी त्यांचा गौरवोल्लेख केला तो असा पु.पा.गोखले यांनी विष्णुशास्त्र्यांची निबंधमाला म्हणजे ‘राष्ट्रवादी जहाल पक्षाचा जाहीरनामा होय’ असे विधान केले, तर वि.मो.महाजनी यांनी त्यांना ‘महाराष्ट्राचे राष्ट्रगुरू’ संबोधले. गो.ग.आगरकरांनी त्यांना ‘फ्रान्समधील क्रांतिकारक वाल्टेअर’ म्हटल्याचा उल्लेख माडखोलकरांनी केला आहे.

     चिपळूणकरांनी त्यांच्या साहित्यातून राष्ट्रवाद जागृत केला आणि मराठी भाषेविषयी स्वाभिमान जागृत केला त्यामुळे मराठी वाङ्मयाच्या इतिहासात त्यांचा गौरव 'मराठी भाषेचा शिवाजी' असा केला जातो.

- प्रा. सुधाकर दे. देशपांडे

चिपळूणकर,विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री