Skip to main content
x

चिरमुले, शरच्चंद्र वासुदेव

     रच्चंद्र चिरमुले हे प्रभाकर श्रीपत शेणोलीकर यांचे चिरंजीव. वडिलांचे मामा वासुदेव गणेश उर्फ अण्णासाहेब चिरमुले यांना ते दत्तक गेले. शिक्षण एम.ए.पर्यंत झाले. पुण्याच्या गरवारे ऑफ कॉमर्समध्ये ते अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. नंतर त्यांनी प्राचार्यपदही भूषविले.

     चिरमुले मराठी कथासाहित्यात साठोत्तरी कथाकारांमधील एक लक्षणीय कथाकार होत. जी.ए.कुलकर्णी, चि.त्र्यं.खानोलकर, विद्याधर पुंडलिक, आनंद विनायक जातेगावकर हे चिरमुले यांचे समकालीन कथाकार होत.

     मोजकेच पण गांभीर्याने कथालेखन करणार्‍या चिरमुले यांचे १९६६ ते १९९२ या काळात पाच कथासंग्रह प्रसिद्ध झाले- ‘श्री शिल्लक’ (१९६७), ‘कॉग्ज’ (१९७३), ‘एका जन्मातल्या गाठी’ (१९८५), ‘पूल’ (१९९०), ‘पार्थिवाचे रंग’ (१९९१).

     त्यांच्या कथा लेखनाचा कालखंड १९६६ ते १९९२ असा असला, तरी उमेदवारीचा कालखंड १९४९पासूनच सुरू झालेला दिसतो. ‘कामरूपचा कलावंत’ ही  पहिली कथा ‘वाङ्मयशोभा’मध्ये (१९४९) प्रसिद्ध झाली. ही कथा र.वा.दिघे यांच्या वाङ्मयीन प्रभावातून व बरीचशी अनुकरणातून लिहिली गेल्यामुळे १९६७ साली प्रकाशित झालेली, स्वतःचा सूर गवसलेली ‘श्री शिल्लक’ ही त्यांची पहिली महत्त्वाची कथा ठरली.

     कवी गिरीश हे चिरमुले यांचे मामा असल्यामुळे बालवयातच त्यांच्यावर कवित्वाचे संस्कार घडले. मामांमुळे घरी येणार्‍या साहित्यिकांच्या गप्पांतून, काव्यवाचनातून, वाङ्मयीन वातावरणातून कवितेचा छंद जडला. ‘अभिरुची’ मासिकातून काही कविता प्रकाशितही झाल्या. याच काळात त्यांना शरच्चंद्र चतर्जींच्या साहित्याने झपाटून टाकले आणि कविता लेखनापेक्षा आपला लेखनपिंड कथेला अधिक अनुकूल आहे या जाणिवेने ते कथा लेखनाकडे वळले.

     ‘श्री शिल्लक’ ते ‘पार्थिवाचे रंग’ या पाच कथासंग्रहांव्यतिरिक्त त्यांनी आत्मवृत्तात्मक (‘वास्तुपुरुष’ - १९८६) आणि ललित निबंध लेखन (‘जीवितधागे’ - १९९२) केले.

     चिरमुले यांचे लौकिक व्यक्तिमत्त्वही समृद्ध होते. कवी गिरीश यांचा सहवास, नंतरच्या आयुष्यात कुमार गंधर्वांसारखे सुहृद लाभले. चिरमुले हार्मोनिअम उत्तम वाजवीत. पत्नी शुभदा; कुमारांच्या शिष्या असल्यामुळे घरात संगीत साधना सदैव होत असे. लौकिक जीवनातील साहित्य, संगीत व निसर्गसान्निध्य यांची आवड हे घटक त्यांच्या लेखनकृतीत ठळकपणे प्रत्ययास येतात. ‘वास्तुपुरुष’ या ललित लेखन संग्रहातील निम्मे लेख संगीतकारांवर आहेत.

     चिरमुले यांचे कथागत अनुभवक्षेत्र प्रामुख्याने नागर जीवनाशी निगडित होते. त्यामुळे ग्रामीण अनुभव ‘पारध’सारख्या कथेतून क्वचितच डोकावताना दिसतो. त्यांच्या प्रारंभीच्या कथा पात्रांच्या व्यक्तिगत सुखदुखाःचा पट मांडता-मांडता हळूहळू सामाजिक विषयांकडे प्रवास करतात. मध्यमवर्गीय कौटुंबिक वातावरणाच्या परिघात त्यांची कथा वावरते. अनाकलनीय वाटणारा माणूस व त्याचा मानसिक पातळीवरून घेतलेला शोध, ही त्यांच्या लेखनाची प्रबळ प्रेरणा होय.

     माणसाचे मन, त्याचे एकाकीपण, मृत्यू, मानवी जीवनातील रहस्यतत्त्व अशा आशयसूत्रांतून गंभीरपणे पाहणारे चिरमुले जीवनाकडे मिस्कीलपणेही जीवनाकडे पाहतात आणि त्यातून निखळ शुद्ध विनोदाचे दर्शन घडविणार्‍या विनोदी कथांचे दालन उघडले जाते. अर्थात अशा विनोदी कथा मोजक्याच पण दर्जेदार आहेत. ‘पोलोनिअसचे पिशाच’ ही त्यांची पहिली विनोदी कथा १९८६ मध्ये लिहिली गेली. ‘पुनरुत्थान आणीबाणीचे’, ‘सत्तावीस नक्षत्रांचे देणे’ इत्यादी कथा चिं. वि.जोशी यांच्या विनोदी परंपरेशी नाते सांगणार्‍या आहेत.

     थोडक्यात चिरमुले यांनी कथालेखनाची वेगळी व स्वतंत्र पायवाट निर्माण केली. नवकथेतून कथालेखनाला बळ घेतले, पण अंधानुकरण केले नाही. फार मोठी प्रायोगिकता आणली नसली, तरी कथाप्रवाहावर स्वतःच्या कथालेखनाचा स्वतंत्र ठसा उमटवला. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले यांच्या कथाजाणिवेशी त्यांचे जवळचे नाते आहे. कलावाद-जीवनवाद या वादचर्चेच्या अधीन न जाता व कथाविषयक कलात्मक जाणिवेचे भान गांभीर्याने ठेवून चिरमुले यांच्या कथेने मराठी कथेला वैविध्यपूर्ण आणि समृद्ध बनविले आहे.

     त्यांना ‘श्री शिल्लक’ या कथासंग्रहासाठी १९६८ साली ललित पारितोषिक मिळाले तर ‘कॉग्ज’ या कथासंग्रहासाठी १९७४-७५ साली महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. ‘एका जन्मातल्या गाठी’ ह्या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार १९८६ साली तर ‘वास्तुपुरुष’ लेखसंग्रहासाठी कै.प्रा.वि.ह. कुलकर्णी पारितोषिक १९८८ साली त्यांना मिळाले.

     - प्रा. रेखा मैड

चिरमुले, शरच्चंद्र वासुदेव