Skip to main content
x

चंदावरकर, प्रकाश सत्येंद्र

          प्रकाश सत्येंद्र चंदावरकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबईच्याच प्रसिद्ध सेंट अॅण्ड्रयू  विद्यालयामध्ये झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर चंदावरकर दि. १ जुलै १९७८ रोजी भारतीय नौसेनेत रुजू झाले. लिबरेशन टायगर ऑफ तामीळ ईलम (एलटीटीई) च्या दहशतवाद्यांविरुद्धलढा देण्यासाठी भारतीय सैन्य १९८७ मध्ये श्रीलंकेत गेले होते. त्या वेळी दि. १६ नोव्हेंबर १९८७ रोजी या ऑपरेशन पलटणीत चंदावरकर सहभागी झाले. त्याच दिवशी जाफना बेटाजवळ एलटीटीईचे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर संघटित होत असल्याची माहिती गुप्तचरांनी दिली. या दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त करणे हे अत्यावश्यक काम होते. कारण, या तळावरून दहशतवाद्यांना शस्त्रे व दारुगोळा पुरविण्यात येत असे. या तळाभोवती दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटके पेरली होती. त्यामुळे या भागात कारवाईसाठी प्रवेश करणेदेखील अतिशय जोखमीचे होते.
       १७ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे, चारच्या सुमारास काळोखात, नौदलाच्या जहाजावरून चंदावरकर छोट्या बोटीतून गस्तीसाठी खोल समुद्रातउतरले. याच वेळी त्यांना एलटीटीईच्या दहशतवाद्यांच्या स्पीड बोटीचा सामना करावा लागला. या वेळी जोरदार धुमश्चक्री झाली.  बोट बुडत असताना एलटीटीईचे चार दहशतवादी समुद्रात काहीतरी वस्तू  बुडवत असल्याचे चंदावरकर यांच्या चाणाक्ष नजरेने टिपले. या दहशतवाद्यांना पकडल्यानंतर चंदावरकर यांनी थेट खोल समुद्रातच सूर मारला. या वेळी त्यांना खोल समुद्रात दहशतवाद्यांनी सोडलेला एक मोठा पेटारा सापडला. यामध्ये दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटकेव डिटोनेटर्स लपविलेली होती.
       चंदावरकर यांनी स्फोटकांचा पेटारा तब्बल दोन दिवस समुद्राखाली ठेवला. त्यानंतर सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यातील स्फोटकेनिकामी केली. यामुळे दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी जोना किनारपट्टी, तसेच खाडी मोकळी झाली. जिवावर उदार होऊन बजावलेल्या या कामगिरीबद्दल लेफ्टनंट कमांडर प्रकाश चंदावरकर यांना दि. १४ एप्रिल १९८८ रोजी ‘वीरचक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.
-संपादित

चंदावरकर, प्रकाश सत्येंद्र