चव्हाण, विजय कृष्णकुमार
‘मोरूची मावशी’ या नाटकातील मावशीच्या भूमिकेमुळे जनमानसात लोकप्रिय झालेल्या विजय कृष्णकुमार चव्हाण यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झाले, तर पुढील शिक्षण रुपारेल महाविद्यालयात झाले. तेथूनच त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सादर होणाऱ्या नाटकामधील नायक आजारी पडल्यामुळे विजय चव्हाण यांना नाटकात काम करण्याची संधी मिळाली. नाटकातील त्यांच्या कामाची खूप प्रशंसा झाली, पण या क्षेत्रात जाण्याचा त्यांचा निर्णय झाला नव्हता. पुढे महाविद्यालयाच्या यूथ फेस्टिवलमध्ये एक एकांकिका सादर केली व त्यात त्यांना अनेक बक्षिसे मिळाल्यामुळे त्यांनी या माध्यमाकडे वळण्याचा निर्णय घेतला. मध्यम-कनिष्ठवर्गात वाढताना घर चालवण्यासाठी श्रमाशिवाय काहीच पर्याय नाही, याचे बाळकडू त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांनी मराठी नाटक-चित्रपट-मालिका या तिन्ही माध्यमातून भूमिका साकारताना तब्बल पंचवीस वर्षे आपली गिरणीतील नोकरी कायम ठेवली. पुढे विजय कदम व त्यांनी मिळून एक ‘रंगतरंग’ नावाची नाट्यसंस्था स्थापन केली. त्यादरम्यान त्यांची लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी ओळख झाली व त्यांना पुरुषोतम बेर्डे यांच्या ‘टुरटुर’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांना गिरीश कर्नाड यांच्या ‘हयवदन’ या नाटकात काम करायला मिळाले. याच काळात सुधीर भट ‘मोरूची मावशी’ हे नाटक घेऊन लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याकडे गेले होते, तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मावशीच्या भूमिकेसाठी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले आणि हे नाटक विजय यांना मिळाले.
‘मोरूची मावशी’ हे विजय चव्हाण यांचे सर्वाधिक लोकप्रिय व त्यांना नाव मिळवून देणारे लोकप्रिय नाटक. त्यात त्यांनी साडी नेसून मावशीची भूमिका केली. त्यातील ‘टांग टिंग टिंगा....’ या गाण्यावरचे त्याचे नृत्य प्रचंड लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांना ‘असे पाहुणे येती’ ही दूरदर्शनवरील मालिका मिळाली, तर ‘घोळात घोळ’, ‘आली लहर केला कहर’ यांसारखे चित्रपट मिळाले. ‘लाईफ मेंबर’, ‘रानफूल’ यांसार‘या कार्यक‘मांमधून ते लोकप्रिय ठरले. याशिवाय ‘हयवदन’, ‘शाकुंतल’, ‘तसे आम्ही सज्जन’, ‘कशात काय न् लफड्यात पाय’, ‘कशी मी राहू तशीच’, ‘कार्टी प्रेमात पडली’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’, ‘लहानपण देगा देवा’, ‘डोळे मिटून उघड उघड’, ‘येता का खंडाळ्याला’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘तू सुखकर्ता’, ‘जळू बाई हळू’, ‘तू तू मै मै’, ‘बाबांची गर्लफ्रेंड’ इत्यादी नाटकांतूनही त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या.
मराठी चित्रपटातील त्यांची वाटचालही खूप मोठी आहे. ‘आली लहर केला कहर’ हा विजय चव्हाण यांचा पहिला मराठी चित्रपट. ‘माहेरची साडी’, ‘येऊ का घरात’, ‘बलिदान’, ‘जिगर’, ‘झपाटलेला’, ‘पछाडलेला’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘जबरदस्त’, ‘गोल गोल डब्यातला’ इ. अनेक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.
‘अशी असावी सासू’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना १९९६ मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. १९९७ मध्ये त्यांना ‘वहिनीची माया’ या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट विनोदी अभिनेत्यासाठी दिला जाणारा दामूअण्णा मालवणकर पुरस्कार देण्यात आला होता. १९९८ साली ‘कमाल माझ्या बायकोची’ या चित्रपटातील भूमिकेसाठीही उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला. तर प्रतिष्ठेचा मानला जाणारा राजीव गांधी पुरस्कारही त्यांना २००३ मध्ये मिळाला होता. २००९ मध्ये त्यांना महाराष्ट्र राज्याचा विशेष अभिनेत्याचा डॉ. काशिनाथ घाणेकर पुरस्कार ‘ती’ या चित्रपटासाठी मिळाला होता.
चव्हाण यांचे शुक्रवार दिनांक २४ ऑगस्ट २०१८ रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.