दानवे, जयशंकर ज्ञानेश्वर
जयशंकर ज्ञानेश्वर दानवे मूळचे पुण्याचे. त्यांचा जन्म झाला, त्याच वर्षी पुण्यात प्लेग आला आणि दानवेंचे मातृपितृछत्र हरवले. त्यांच्या काकांनी त्यांचा सांभाळ केला. काकांनी त्यांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातले. पण दानवेंना अभिनयाची आवड असल्यामुळे, नकला करायच्या या उद्देशाने ११ व्या वर्षी घर सोडून सोहराब मोदींचा भाऊ रुस्तम मोदी यांच्या आर्य सुबोध नाटक मंडळीत ते दाखल झाले. तेथे भालजी पेंढारकर व्यवस्थापक होते. कंपनीचे दिग्दर्शक बेंजामिन हे दानवेंचे नाट्यगुरू. १९३१-३२ साली चित्रपट बोलका झाल्यावर नाटक मंडळी मोडकळीस आली. अनेकांनी त्यांना चित्रपटात जाण्याचा सल्ला दिला. तेव्हा दानवे कोल्हापुरात आले व वणकुद्रे बंधूंच्या सम्राट सिनेटोनमध्ये नायक म्हणून रु. पंचाहत्तर महिना पगारावर नोकरीला राहिले. पण ‘स्वर्ग’ हा कंपनीचा चित्रपट पूर्ण झालाच नाही.
दानवे शालिनी सिनेटोनमध्ये बाबूराव पेंटरांकडे आले. तेथे पेंटर यांच्या ‘उषा’, ‘सावकारी पाश’, ‘प्रतिभा’ इ. चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. शालिनी सिनेटोनसाठी भालजी पेंढारकरांनी ‘संत कान्होपात्रा’ दिग्दर्शित केला. त्यात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली. नंतर अनेक चित्रपटांतून ते खलनायक झाले.
‘शालिनी’ बंद पडताच भालजींनी त्यांना पुण्याला दादासाहेब तोरणेंच्या सरस्वती सिनेटोनमध्ये पाठवले. सरस्वतीमध्ये त्यांनी ‘राजा गोपीचंद’, ‘ये सच है’ (हिंदी), ‘माझी लाडकी’, ‘नवरदेव’, ‘देवयानी’ इ. चित्रपटांत भूमिका केल्या. १९४२ च्या आसपास सरस्वती सिनेटोन बंद पडली. त्याच वेळी भालजींनी कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओ सुरू केला होता. त्यांनी दानवेंना तार करून बोलावून घेतले. बेंजामिन हे दानवेंचे नाट्यगुरू, तर भालजी हे चित्रपटगुरू. तेथे अभिनयाबरोबरच भालजींचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून दानवे काम करू लागले. दानवे अखेरपर्यंत भालजींकडे राहिले. त्यांनी भालजींबरोबर ‘बहिर्जी नाईक’, ‘मीठभाकर’, ‘छत्रपती शिवाजी’ इ. महत्त्वाचे चित्रपट केले. नंतर भालजींनी त्यांना ‘जय भवानी’ हा चित्रपट दिग्दर्शित करायला दिला. दानवेंनी त्याखेरीज ‘फुलपाखरू’ व ‘ईश्वर’ हे चित्रपटही दिग्दर्शित केले. ‘गाठ पडली ठका ठका’, ‘नायकिणीचा सज्जा’, ‘जावई माझा भला’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘आम्ही जातो अमुच्या गावा’ इ. ६० मराठी चित्रपटांतून दानवेंनी भूमिका केल्या. प्रभाकर पेंढारकर दिग्दर्शित ‘प्रीत तुझी माझी’ (१९७५) हा दानवेंचा शेवटचा मराठी चित्रपट. याचबरोबर यांनी १२५ नाटकांतून भूमिका केल्या आणि त्यातली बरीच नाटके दिग्दर्शित केली. कोल्हापूर नगरपालिकेने त्यांचा सत्कारही केला. दानवे यांच्या मृत्यूनंतर ‘हिरवी चादर रुपेरी पडदा’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले.
- सुधीर नांदगांवकर