Skip to main content
x

दाते, शंकर गणेश

शंकर गणेश दाते यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. मुंबई येथे बी.ए.पर्यंत त्यांचे शिक्षण झाले. मराठीत लोककथा, लोकगीते, लोकभ्रम, म्हणी, बाळखेळ इत्यादी लोकवाङ्मय शास्त्रीय पद्धतीने संपादून पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यास त्यांनीच प्रथम सुरुवात केली व १९२९-३० मध्ये त्याचे दोन स्वतंत्र भाग प्रसिद्ध केले. यानंतर त्यांनी मराठी ग्रंथसूची तयार करण्यास सुरुवात केली. त्यांच्यापूर्वी डॉ. श्री.व्यं. केतकर यांनी  य.रा. दाते व रा.त्र्यं. देशमुख यांच्याकडून महाराष्ट्रीय वाङ्मयसूचीकरवून महाराष्ट्रीय ज्ञानकोशमंडळ लि.तर्फे १९१९मध्ये प्रसिद्ध केली होती. त्यानंतर १९४४ साली यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. यांच्या ग्रंथात स. १८००-१९३७ या कालावधीमध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांचा समावेश आहेत. या सूचीच्या प्रथम खंडात दशांश वर्गीकरण पद्धतीने ग्रंथ विषयवार लावून प्रत्येक पुस्तकाची माहिती, ग्रंथकार, ग्रंथनाम, आवृत्ती, प्रकाशनस्थळ, प्रकाशक, मुद्रणालय, मुद्रणस्थळ, प्रकाशनकाल, पृष्ठे, आकार, चित्रे, मालाक्रमांक, मूल्य व टिप्पणी या क्रमाने दिली आहे. द्वितीय खंडात ग्रंथकार, ग्रंथनामे, विषय, अप्रत्यक्ष संदर्भ हे सर्व वर्णानुक्रमाने दिले असून ग्रंथकाराच्या नावापुढे जन्म-मृत्यूचे सालही नोंदण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यासंबंधीचे एकंदर मुद्रित वाङ्मय एकत्र दिसेल, असे दर्शित केले आहे.

त्यांच्या या ग्रंथाने मराठी वाङ्मयाचा अभ्यास करणार्‍यांची उत्कृष्ट सोय झाली आहे. १९३७ सालापर्यंत मराठीत कोणत्याही विषयावर काय वाङ्मय प्रसिद्ध झाले आहे, याची त्यांच्या ग्रंथावरून तपशीलवार माहिती मिळते आणि अभ्यासकाला झालेले कार्य लक्षात घेऊन त्यापुढे कार्य करण्याची सूचना मिळते. त्यांच्यात संशोधनाची दृष्टी उपजत होती व रेखीव काम करण्याकडे त्यांचा कल होता.

संपादित

संदर्भ
१. अर्वाचीन चरित्रकोश; संपादक, चित्राव सिद्धेश्‍वरशास्त्री
दाते, शंकर गणेश