Skip to main content
x

देसाई, कमल गणेश

         मल गणेश देसाई यांचा जन्म यमनकडी (जि. बेळगाव) येथे झाला. अहमदाबाद, धुळे, निपाणी, मिरज, भिवंडी, कागल इत्यादी ठिकाणी त्यांनी मराठीचे अध्यापन केले. १९६२मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘रंग’ या कथासंग्रहात पहिल्या लघुकथासंग्रहातील निवडक कथा ‘सत्यकथा’ मासिकातून प्रसिद्ध झाल्या होत्या. ‘रात्रंदिन आम्हा’ ही कादंबरी १९६४ साली प्रसिद्ध झाली तर ‘काळासूर्य’ आणि ‘हॅट घालणारी बाई’ या दोन लघुकादंबर्‍या अनुक्रमे ‘सत्य’, ‘सत्यकथा’ १९६८ आणि ‘मौज’ दिवाळी अंक १९७० यांमध्ये प्रसिद्ध झाल्या.

कमल देसाई यांचा ‘रंग २’ हा कथासंग्रह १९९८ साली प्रसिद्ध झाला. ‘थ्री लेक्चर्स ऑन इस्थेटिक’ या पुस्तकाचा ‘सौंदर्य शास्त्रावरील तीन व्याख्याने’ (१९८३) हा अनुवादही त्यांनी केला आहे. कमल देसाईंच्या कथाविश्वाचा रा.भा.पाटणकरांनी स्वतंत्रपणे केलेला विचार पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला आहे. भालचंद्र नेमाडे यांनी कमल देसाईंच्या कथांना खर्‍या अर्थाने ‘आधुनिक’ असे म्हटले आहे. स्वतंत्र आशय नवनवीन पद्धतीने मांडणार्‍या कमल देसाईंचे कथा लेखन नव्या व वेगळ्या वळणाचे आहे. प्रयोगशील कथाकार म्हणता येईल अशा कथा त्यांनी लिहिल्या आहेत. व्यक्तिविशिष्टता, मानवी मनाचे गुंतागुंतीचे व्यवहार, माणसांचे परस्परसंबंध तटस्थपणे न्याहाळणे ही दोन प्रमुख वैशिष्ट्ये ‘रंग’ कथासंग्रहात जाणवतात. मानवी मनात खोलवर डोकावण्याचे धाडस करून स्वतःला शोधणारी तसेच मानवी मनातील दुःख, एकाकीपण, तुटलेपणा, स्वार्थ, हिंसा यांचे उग्र दर्शन टिपणारी, तीव्र निरीक्षणशक्ती असलेली पात्रे त्यांच्या कथांमध्ये आढळतात.

व्यक्तिविशिष्ट असणार्‍या त्यांच्या कथा आत्मकेंद्रित होत नाहीत. कारण व्यक्तीने स्वतःभोवती विणलेला कोश आणि त्यातून व्यक्तिमत्त्व बंदिस्त होण्याची प्रक्रिया त्यांच्या कथांमधून व्यक्त होते. व्यक्तीचा खरा चेहरा आणि तिने स्वतःला विशिष्ट प्रतिमेमध्ये कोंडून घेतल्यामुळे आकाराला येणारी तिची ‘कृतक प्रतिमा’ यांचे चित्रण त्यांच्या कथांमध्ये आढळते.

गतिमान मानवी मन, षङ्विचार, त्यांचा मानवी आचरणातून होणारा आविष्कार, त्यांमधील संवेदना, भावना, विचार या घटकांचे कमी-जास्त प्रमाणात व्यक्त होणे यांना कमल देसाईंच्या कथांमध्ये महत्त्व प्राप्त होते. मानवी आचरणातील उत्स्फूर्तता, अनिश्चितता, मनोव्यापार आणि गतिमान कालप्रवाह यांचा परस्परसंबंध रेखाटण्यावर त्यांच्या कथेमध्ये भर व्यक्तीच्या अस्तित्वामध्ये व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकाराला येण्यामध्ये तिचे वैशिष्ट्यपूर्ण शरीर, मनातील स्मृती, तिचे इतरांशी जुळलेले अनेकविध नात्यांचे जाळे या सर्वांचे नेमके स्थान काय? असा प्रश्न त्यांच्या कथांमधून उपस्थित होतो.

‘रंग-२’ या त्यांच्या दुसर्‍या कथासंग्रहातील कथा दीर्घकथा आहेत. या कथांमधून स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा सर्व पातळ्यांवर झालेला र्‍हास, अवमूल्यन हा आशय व्यक्त होतो. स्वातंत्र्य लढ्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य, आधुनिकता, शहरीकरण, विकास, निसर्ग-माणूस यांच्यातील परस्परसंबंध यांचा व्यक्तिजीवनाशी असलेला संबंध, त्यांतील विसंगती टिपण्याचा प्रयत्न हे सारे त्यांच्या कथांमधून व्यक्त होते. मनोविश्लेषणप्रधान कथा लिहिणार्‍या कमल देसाईंच्या कथा सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रांतील बदलांचा पर्यावरणाचा होणारा र्‍हास या अंगांनी ‘रंग-२’मध्ये विस्तारलेल्या दिसतात. स्त्री-पुरुष नातेसंबंध, स्त्री-जीवनाची गुंतागुंत उलगडण्याचा प्रयत्न या कथांमधून झालेला दिसतो.

‘रात्रंदिन आम्हा’ या कादंबरिकेमध्ये अज्ञाताचा शोध आणि मानवी आकलनाच्या मर्यादा हा आशय मांडलेला दिसतो. मृत्यूचा अर्थ काय? जगण्याचा अर्थ काय? हे प्रश्न या कादंबरिकेमधून उपस्थित केले आहेत. ‘काळासूर्य’मध्ये पाप-पुण्य, प्रतिष्ठा, तसेच स्त्रीत्व या मूल्यांच्या संदर्भातील रूढ संकल्पनांचा प्रस्थापित शोध घेणार्‍या नायिकेचे चित्रण आलेले आहे. प्रस्थापित रूढ धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक संकेतव्यवस्थेतील स्त्रीचे दुय्यम स्थान नाकारणारी बंडखोर स्त्री हे या लघुकादंबरीचे वैशिष्ट्य आहे. अश्वरथ, काळासूर्य, विरंची ह्या मिथकांमुळे ही लघुकादंबरी वैशिष्ट्यपूर्ण वाटते.

‘हॅट घालणारी बाई’ या लघुकादंबरीमधून स्त्रीचा आत्मशोध, स्मृतींचा व्यक्तिजीवनाशी असलेला संबंध, जगण्यातील श्रेयस आणि श्रेयस प्राप्तीला असणारा अर्थ काय? सर्जनाचे स्त्रीच्या जगण्यातील स्थान आणि सर्जन व विनाश यांचा गतिमान कालप्रवाह आणि माणूस असण्याच्या मर्यादा यांच्यासह अर्थ कसा लावायचा? असे अनेक प्रश्न या लघुकादंबरीतून कमल देसाई यांनी उपस्थित केले आहेत. कमल देसाईंच्या साहित्यकृतींमधून स्वतंत्र प्रज्ञा असलेली, निर्णयस्वातंत्र्य राबवणारी, जगण्याचा अर्थ शोधणारी चिंतनशील स्त्री-प्रतिमा उभी राहते.

- प्रा. रूपाली शिंदे

देसाई, कमल गणेश