Skip to main content
x

देसाई, मंगेश सदानंद

         मंगेश सदानंद देसाई यांचा जन्म कोल्हापूरला झाला. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून त्यांचे बी. एस्सी. पर्यंतचे शिक्षण झाले. पदवी घेण्यापूर्वीच त्यांनी या शिक्षणास रामराम ठोकला, कारण इलेक्ट्रॉनिक विषयात त्यांना रस वाटू लागला. त्यांनी १९४२ च्या भारत छोडो चळवळीत भाग घेतला आणि हातबाँब निर्माण करण्याचा उद्योग सुरू केला. त्या उद्योगात अपघात होऊन ते जखमी झाले. त्यांच्या या उद्योगामुळे त्यांना कारावास भोगावा लागला. १९४६ मध्ये सरकारने जेव्हा सर्व राजकीय कैद्यांना कारावासातून मुक्त केले, तेव्हा ते तुरुंगातून बाहेर आले.
      संगीत दिग्दर्शक वसंत देसाई हे त्यांचे चुलते होते. एकदा वसंत देसाई कोल्हापुरात आले असता त्यांनी मंगेश यांना आपल्याबरोबर मुंबईला आणले आणि राजकमल स्टुडिओच्या ध्वनिमुद्रण खात्यात नोकरी दिली. त्या विभागाचे प्रमुख होते ए.के. परमार. मंगेश देसाईंनी त्यांच्या हाताखाली ध्वनिमुद्रणाचे धडे घेतले. जे.बी.एच. वाडिया १९५१ साली राजकमलच्या स्टुडिओत ‘मदहोश’ हा चित्रपट चित्रित करत होते. त्या प्रसंगी ध्वनिमुद्रक परमार आजारी पडले. चित्रपटाचे काम अडू नये म्हणून वाडिया यांनी मंगेश देसाईंकडे चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाची जबाबदारी सोपवली. निर्माते वाडिया यांनी ‘मदहोश’ चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाची प्रशंसा केली. ‘मदहोश’ हा देसाई यांनी स्वतंत्रपणे ध्वनिमुद्रण केलेला पहिला बोलपट होता.
      त्यानंतर ‘दीदार’ हा त्यांनी ध्वनिमुद्रण केलेला दुसरा चित्रपट. त्याचे संगीतकार होते नौशाद. त्या चित्रपटाचा नायक अंध होता व त्याच्यावरच्या एका गाण्याचे ध्वनिमुद्रण चालू असता मंगेश देसाईंनी ध्वनिमुद्रण मध्येच थांबवले. तेव्हा नौशाद म्हणाले, “अरे, तुम्ही काय करता आहात?” तेव्हा मंगेश यांनी त्यांना थांबवले. स्टोअररूममधून एक काठी मागवली व ती धरून त्यांच्या साहाय्यकाला सांगितले की, मी ध्वनियंत्र सुरू केले की तू ही काठी घेऊन चालत राहा. गाणे संपले आणि त्या गाण्यात नायक गाताना त्या काठीचा आवाजही ध्वनिमुद्रित झाला. नौशादजी आश्‍चर्यचकित झाले आणि म्हणाले, “आपने तो पिक्चर की शकल बदल डाली. अब इसमें जान आ गयी।”
       संगीत वादकांनी १९७४ साली संप पुकारला होता. चित्रपटांच्या पार्श्वसंगीताचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. त्या प्रसंगी शांतारामबापूंनी मंगेश देसाईंना विचारले, “मंगेश, पार्श्वसंगीताच्या अभावी रखडत पडलेल्या चित्रपटात जुन्या चित्रपटांतील पार्श्वसंगीताचा योग्य उपयोग करता येऊ शकेल का?” मंगेश देसाई यांनी त्या वेळेस योग्य त्या प्रसंगात त्या पार्श्वसंगीताचा वापर करून पाहिजे तो परिणाम साधून दिला. शांतारामबापू त्या वेळेस गिल्डचे अध्यक्ष होते. त्यांनी निर्मात्यांची सभा घेऊन त्यांना समजावले की, त्यांनी त्यांच्या जुन्या चित्रपटातील पार्श्वसंगीताचा नव्या चित्रपटासाठी वापर करावा आणि ध्वनिमुद्रक मंगेश देसाई हे काम करून देतील. पार्श्वसंगीताचा तुम्हाला पाहिजे तसा परिणाम ते मिळवून देतील. पुढे २५ ते ३० निर्माते आपले चित्रपट आणि त्यातल्या पार्श्वसंगीताचा संग्रह घेऊन आले. मंगेश देसाईंनी त्यांचे काम योग्य प्रकारे करून दिले.
       महाराष्ट्र शासनाने ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून मंगेश देसाईंचा गौरव केला आणि त्यांना कोल्हापूर येथे एक भूखंड देऊ केला. देसाईंनी मानपत्राचा स्वीकार केला, पण भूखंड नाकारला आणि विनंती केली की, शासनाने त्या जागेवर गरजू विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षणसंस्था स्थापन करावी, ज्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल. सत्यजीत राय यांना त्यांच्या ‘प्रतिद्वंद्वी’ चित्रपटाचे पुनर्ध्वनिमुद्रण राजकमल स्टुडिओत करावयाचे होते. त्यांनी चित्राचे डबे मंगेश देसाईंकडे सुपुर्द केले. देसाईंनी त्यावर योग्य ते संस्कार करून ध्वनिमुद्रण पार पाडून राय यांना दिले. सत्यजीत राय यांनी मंगेश देसाईंचे अभिनंदन केले आणि पुढे आपले सारे चित्रपट पुनर्ध्वनिमुद्रणासाठी मंगेश देसाईंच्या हाती सोपवले.
       रमेश सिप्पी आपल्या ‘शोले’ चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगेश देसाईंना लंडनला घेऊन गेले. कारण तो स्टीरिओफोनिक साऊंड असणारा चित्रपट होता. त्यासाठी लागणारा साऊंड स्टुडिओ भारतात नव्हता. ‘शोले’ला मिळालेल्या यशात मंगेश देसाईंचा सिंहाचा वाटा आहे. मनोजकुमार ‘क्रांती’ चित्रपटासाठी त्यांना घेऊन जपानला गेले होते आणि ध्वनिमुद्रणाचे काम त्या देशात करण्यात आले. त्या चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाची वाहवा झाली. ध्वनिमुद्रणातला जादूगार म्हणून मंगेश देसाईंची ओळख आजही आहे. मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

- द.भा. सामंत

देसाई, मंगेश सदानंद