Skip to main content
x

देसाई, मृणालिनी प्रभाकर

     मृणालिनी प्रभाकर देसाई या पूर्वाश्रमीच्या मृणालिनी धनेश्वर. त्यांचा जन्म मुंबईत झाला. आई सर्वांवर प्रेम करणारी प्रेमळ गृहिणी होती. वडील ‘नाना’ नावानेच घरात, परिसरात प्रसिद्ध होते. स्वातंत्र्यापूर्वीच्या त्या काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारी बरीच माणसे अवतीभोवती होती. मनामध्ये इंग्रजांविषयी राग-द्वेषाची भावना होती. विदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा विशेषतः खादीचा पुरस्कार यासाठी सामान्य जनातही संघटित झाली होती. विदेशी माल भरलेल्या लॉरीसमोर अडवा होऊन देशासाठी आत्मबलिदानालाही बाबू गेनू तयार झाला होता. विदेशी मालाची होळी पेटवली गेली होती अन् हे सारे भीषण वास्तव  वयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षी मृणालिनीने अनुभवले होते. वडील-नाना यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे देशप्रेमाचे, स्वदेशीचे बीज कुठेतरी नकळत मनात रुजले. त्या लहान वयातही आपला विलायती फ्रॉक तिने त्या पेटत्या होळीत सहज टाकला.

बालपणापासूनच त्यांची वृत्ती अभ्यासू होती. हिंदी, गुजराती, मराठी भाषांच्या त्या चांगल्या जाणकार होत्या. नानांमुळे त्यांना पुस्तकवाचनाची गोडी लागली. त्या संस्कृत भाषेच्याही खास अभ्यासक होत्या. लहानपणापासून त्यांच्या मनात मीरेविषयी अतर्क्य ओढ होती. यातूनच पुढे ‘योगिनी’ ही मीराबाईंच्या जीवनावरील कादंबरी त्यांनी लिहिली. मनात आलेले विचार प्रभावीपणे आणि सुसंगतपणे मांडणे, हा त्यांचा खास गुण होता. त्यांनी एम.ए. पदवी संपादन केली होती.

त्यांनी आपली लेखणी जाणीवपूर्वक उचलली आणि कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, चरित्र असे साहित्यातील विविध प्रकार हाताळले. लिखाणातील नेमके-नेटकेपणामुळे आणि विषयांमधील वैविध्यामुळे विविध स्तरांतील वाचकांना त्यांनी नकळत आकर्षून घेतले. त्यांच्या ज्ञानाबद्दल, अभ्यासू वृत्तीबद्दल विश्वास असल्यामुळे जाणकारांनी त्यांच्याकडे (काही वेळा) लिखाणाची खास जबाबदारीही सोपवली. ‘वेदबोलिता अनंत’ याची मूळ संहिता विष्णुदेव पंडित यांची असून या मूळ गुजराती पुस्तकाला त्यांनी मराठीत अनुवादित केले. महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाने यासाठी खास योगदान दिले.

स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता; आणि त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्या ध्येयवादी, विचारवंत  आणि लढाऊ वृत्तीच्या होत्या. चरित्रपर पुस्तके लिहिण्याकडे प्रारंभी त्यांचा कल होता. त्यांच्या नावावर पुढील ग्रंथसंपदा आहे. ‘गीतगोविंदकार जयदेव’ (१९५७), ‘अलौकिक शिल्पकार मायकेल एंजलो’ (१९५९), ‘मेधाणी जीवनसरिता’ (१९६४), ‘सरस्वतिचंद्र’ (१९७३), सॉक्रेटिस (१९७३), ‘दीपनिर्माण’ (अनुवाद) (१९८३), ‘बिंदी’ (कथासंग्रह १९७७), ‘आनंदयात्रा’ (१९७३), ‘रुसवा’ (१९७६), ‘सोसलेले घाव’ (१९७६) या कथासंग्रहांबरोबरच त्यांच्या जवळजवळ वीस कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. स्वजीवनावर आधारित ‘निशिगंध’ हे आत्मवृत्त त्यांनी १९६८ साली लिहिले. त्यांच्या कादंबर्‍यांतून त्यांनी ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक विषय मांडले आणि मुक्तचिंतनातून काही प्रश्न, घटना, प्रसंग, चरित्रे यांच्यावर प्रकाशझोत टाकला. ‘कान्होजी आंग्रे’ (ऐतिहासिक), ‘परशुराम’ (पौराणिक) (१९७०), ‘बिलवदल’ (१९७५) (अहिल्याबाई यांच्या जीवनावर आधारित), ‘इनामदार’ (सामाजिक १९९४), ‘विराणी’ हे १९६७ मध्ये प्रकाशित झालेले प्रवासवर्णनपर पुस्तक आहे. 

महात्मा गांधी यांच्या विचारांचा आणि तत्त्वांचा पगडा त्यांच्या संपूर्ण जीवनावर होता. किंबहुना स्वातंत्र्यलढ्यात त्या स्वयंप्रेरणेने सहभागी झाल्या असल्या, तरी त्यामागे गांधी विचारधारा, तत्त्वनिष्ठा यांची प्रेरणा होती. महात्मा गांधीच्या अलौकिक चरित्राचा ठसा त्यांच्या आचारविचारांवर, वृत्ती-प्रवृत्तींवर खोलवर उमटला होता. गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने मृणालिनीताईंनी वाचकांसमोर ‘पुत्र मानवाचा’ (१९६८)  ही अभ्यासपूर्ण कादंबरी ठेवली. अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून ज्यांनी अखिल जगताला स्तिमित केले, त्या महामानवाची चरित्रगाथा मांडून लोकशक्तिजागर व्हावा, हा त्यांच्या या लिखाणामागील अंतर्गत हेतू असावा. ‘पुत्र मानवाचा’ हे त्यांचे लिखाण आवडल्याची पोचपावती महिलांकडून मिळाली. ‘पुत्र मानवाचा’ ही कादंबरी संदर्भ म्हणून मान्यता पावली. २९नोव्हेंबर१९९४ रोजी मृणालिनीताईंनी आपली जीवनयात्रा संपवली. गुजराती असूनही सर्व लेखन मराठी भाषेत केले, हे त्यांचे अत्यंत आगळे असे वैशिष्ट्य होय. 

- डॉ. ललिता गुप्ते

देसाई, मृणालिनी प्रभाकर