Skip to main content
x

देसाई, रणजीत रामचंद्र

     देसाईंचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड ह्या गावी इनामदार घराण्यात झाला. त्यांचे वडील रामचंद्रराव रसिक संगीतप्रेमी होते. रणजीत देसाईंच्या लहानपणीच आईचा मृत्यू झाल्यामुळे  ते कोल्हापूरला आजीकडे राहायला गेले. राजाराम महाविद्यालयामध्ये इंटरपर्यंत शिक्षण झालेल्या देसाईंना ग.बा.जोशी नावाचे शिक्षक, फडके-खांडेकरांसारखे ज्येष्ठ लेखक, प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर, सदाशिव अय्यर हे प्राध्यापक या सर्वांकडून लेखनासाठी प्रेरणा मिळाली. शिवाय कोवाड या खेड्यातील बालपण, आजीचे घरातील संस्कार, रामायण, महाभारत, संतसाहित्य यांबरोबरच आधुनिक मराठी-इंग्रजी साहित्याचे वाचन आदींचा परिणाम रणजीत देसाईंच्या घडणीवर झाला आहे. वाचनाचे वेड, संगीताची आवड, संवेदनशील वृत्ती यांना निरीक्षणाची, मनन-चिंतनाची, उत्कटतेची आणि उदात्ततेची जोड मिळाल्यामुळे रणजीत देसाईंचे लेखक म्हणून ‘स्वतंत्र’ व्यक्तिमत्त्व घडत गेले.

राजाराम महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ‘रूपमहाल’ ही कथा ‘राजारामीय’ ह्या वार्षिकांकात प्रसिद्ध झाली. १९४७ साली ‘प्रसाद’ मासिकाने आयोजिलेल्या कथास्पर्धेत त्यांच्या ‘भैरव’ या कथेला पारितोषिक मिळाले. कोल्हापूरच्या ‘महाद्वार’ मासिकात कथालेखनाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे देसाईंनी सुरुवातीच्या काळात जोमाने कथा लेखन केले. १९५२ साली प्रसिद्ध झालेल्या ‘रूपमहाल’ ह्या पहिल्या कथासंग्रहापासून १९९१ पर्यंत त्यांचे १६ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यात ‘कणव’ (१९६०), ‘जाण’ (१९६५), ‘गंधाली’ (१९७१), ‘मधुमती’ (१९८२), ‘मोरपंखी सावल्या’ (१९९१) हे विशेष उल्लेखनीय कथासंग्रह आहेत.

याच काळात रणजीत देसाईंनी कादंबरी लेखनाला सुरुवात केली. ‘बारी’ (१९५९), ‘माझा गाव’ (१९६०) ह्या त्यांच्या सुरुवातीच्या कादंबर्‍यांत ग्रामीण जीवनाचे चित्रण केले आहे. आपल्या लेखनाच्या प्रारंभीच्या काळात कथाकादंबर्‍यांतून ग्रामजीवनाचे चित्रण करणार्‍या देसाईंनी माधवराव पेशवे व त्यांची पत्नी रमाबाई यांच्या सहजीवनावरील ‘स्वामी’ ही कादंबरी लिहिली आणि मराठी कादंबरीच्या क्षेत्रात इतिहास घडवला. मराठीतील समीक्षक आणि वाङ्मयेतिहासकारांनी देसाईंच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरील कथांची फारशी दखल घेतली नसली, तरी ‘स्वामी’ कादंबरी ही मराठीतील बहुचर्चित आणि वाचकप्रिय ऐतिहासिक कादंबरी ठरली. १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या ‘स्वामी’नंतर देसाईंनी ‘श्रीमान योगी’ (१९६८), ‘राधेय’ (१९७३), ‘समिधा’ (१९७९), ‘लक्ष्यवेध’ (१९८०), ‘पावनखिंड’ (१९८१), ‘राजा रविवर्मा’ (१९८४), ‘अभोगी’ (१९८७), ‘प्रतीक्षा’ (१९९४), ‘शेकरा’ (१९९६) या कादंबर्‍या लिहिल्या. पुराणकथेवर आधारलेली, प्रत्येकाच्या मनात स्थिरावलेल्या कर्णाच्या जीवनाचा शोध घेणारी ‘राधेय’ ही देसाई यांची एकमेव पौराणिक कादंबरी आहे. कलावंतांविषयी त्यांना वाटणारी आस्था, कुतूहल आणि जिव्हाळा ‘राजा रविवर्मा’ आणि ‘अभोगी’ ह्या दोन कादंबर्‍यांत व्यक्त झाला आहे. ‘शेकरा’ या शेवटच्या कादंबरीत देसाई यांनी वन्यजीवनाचे चित्रण केले आहे. देसाई यांच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या ‘अभोगी’ ह्या कादंबरीत नाट्यपूर्ण घटन-प्रसंगांची आणि योगायोगांची योजना, प्रेमाचा गुंतागुंतीचा त्रिकोण, भावपूर्ण वातावरण, निसर्गरम्य स्थलदर्शन, रेखीव व्यक्तिरेखाटन, शेवटी कथानकाला मिळालेली कलाटणी व गोड शेवट अशी ११ वैशिष्ट्ये आढळून येतात. त्यामुळे कादंबरी एक चित्रपटकथाच ठरते. देसाई यांनी एकूण बारा कादंबर्‍या लिहिल्या. आशयाच्या दृष्टीने सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, चरित्रपर अशा विविधता त्यांच्या कादंबर्‍यांत आहे.

देसाई यांनी चार चित्रपटकथा लिहिल्या आहेत; ‘रंगल्या रात्री अशा’ (१९६२), ‘संगोळी राय्याण्णा’ (कन्नड) १९६३, ‘सवाल माझा ऐका’ (१९६४) व ‘नागीण’ (१९८१). मोजक्याच चित्रपटकथा लिहिणार्‍या देसाईंचे  ‘रंगल्या रात्री अशा’ आणि ‘सवाल माझा ऐका’ ह्या कथांवरील चित्रपट महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. अस्सल ग्रामीण वातावरणाची पार्श्वभूमी, नाट्यपूर्ण प्रसंगांची निर्मिती, खटकेबाज संवादांची योजना या ठळक वैशिष्ट्यांमुळे मराठी चित्रपटांतील तमाशाप्रधान चित्रपटांच्या मालिकेत या दोन चित्रपटांना बरेच वरचे स्थान प्राप्त झाले आहे.

कथा-कादंबरी ह्या दोन वाङ्मय प्रकारांच्या तुलनेत देसाई यांचे नाट्यलेखन प्रभावी ठरले नाही. ‘वारसा’ ह्या (१९७२) पहिल्या नाटकापासून ‘पंख जाहले वैरी’ (२०००) हे नाटक आणि शेवटचे ‘पांगुळगाडा’ हे अप्रकाशित नाटक धरून देसाईंनी एकूण बारा नाटके लिहिली. नाटककार वसंत कानेटकर यांच्या सहकार्याने लिहिलेल्या ‘गरुडझेप’ ह्या नाटकाला वाचक-प्रेक्षक-समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘हे बंध रेशमाचे’ यासारखे नाटक वगळता त्यांची अन्य नाटके उपेक्षितच ठरली. ‘स्वामी’, ‘श्रीमान योगी’ ह्या स्वतःच्या कादंबर्‍यांची त्यांनी केलेली नाट्यरूपांतरेही लक्षवेधी ठरली नाहीत.

देसाई हे प्रामुख्याने मराठीतील वाचकप्रिय कादंबरीकार होते; कष्टाळू ललित लेखक होते; समीक्षक नव्हते तथापि साहित्य संमेलने आणि साहित्यविषयक अन्य कार्यक्रमांतून त्यांनी आपली साहित्यविषयक भूमिका आणि मते प्रकट केली आहेत. साहित्याचे स्वरूप, त्याचे प्रयोजन, त्याचा परिणाम आणि साहित्यविषयक आदर्शवादी मते मांडणारे देसाई परंपराभिमानी होते. लेखकाची सर्जनशीलता ही प्रतिभा-सामर्थ्यावर अवलंबून असते; केवळ सन्मान, कीर्ती, अर्थप्राप्ती हीच उद्दिष्ट्ये लेखकाने डोळ्यांसमोर ठेवू नयेत. लेखकामध्ये प्रतिभा-सामर्थ्याबरोबर जीवनाची व्यापक जाण आणि प्रामाणिकपणाची आवश्यकता असते. साहित्यचळवळींचा हेतू चांगला असला, तरी साहित्याचा विकास लेखकाच्या कुवतीमुळे होतो; या प्रकारची मते त्यांनी मांडली आहेत. त्यांच्या लेखनावरील रंजनपरतेचा प्रभाव जाणवत असला, तरी आनंदप्राप्ती हे साहित्याचे प्रयोजन त्यांनी स्वीकारले होते. त्यानुसार त्यांनी साहित्यनिर्मिती केली.

मराठी वाङ्मयाच्या विकासक्रमात प्रामुख्याने कथाकार आणि कादंबरीकार म्हणून देसाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटला आहे. मनाची विशालता, मानवी प्रतिष्ठा, दया-त्याग-क्षमाशीलता, औदार्य-माणुसकी ह्या गुणांचा पुरस्कार रणजीत देसाई यांनी लेखनात केला. रंजनपरता आणि संस्कारशीलता या उद्दिष्टांना त्यांनी स्वतःच्या लेखनात महत्त्व दिले. एक रसिक वाचक आणि निष्ठावान साहित्यिक म्हणून वाटचाल करण्यात त्यांनी धन्यता मानली. ‘स्वामी’ आणि ‘श्रीमान योगी’ ह्या दोन कादंबर्‍यांनी मराठी साहित्य विश्वातील त्यांचे स्वतःचे स्थान सिद्ध केले. त्यामागे देसाई यांची वाचक सन्मुख भूमिका होती.

तीन तपे अविरतपणे विविधांगी लेखन करणार्‍या देसाई यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य स्पर्धेत १९६२ साली ‘स्वामी’ कादंबरीला गौरवण्यात आले. १९६४ साली ‘स्वामी’ला साहित्य अकादमीचाही पुरस्कार मिळाला. १९७३ साली भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र शासनातर्फे १९९० साली देसाईंना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत, तसेच दिल्ली येथील नाट्यस्पर्धेत ‘कांचनमृग’ नाटक गौरवास पात्र ठरले. १९७४ साली इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा बहुमान देसाईंना मिळाला. याशिवाय कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य, दिल्ली येथील साहित्य अकादमीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. बडोदे (१९६५), औदुंबर (१९६९), कल्याण (१९७२), गोरेगाव-मुंबई (१९७७), कोल्हापूर (१९८३), इस्लामपूर (१९८४), आजरा (१९८५), चंदगड (१९८९) ह्या शहरांत भरवण्यात आलेल्या साहित्य-नाट्य- ग्रामीण साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान देसाई यांना मिळाला.

या सर्व मानसन्मान-पुरस्कारांतून, कादंबर्‍यांच्या अनुवादांतून त्यांची वाचकप्रियता आणि समाजमान्यता सूचित होते. देसाई यांच्या काही कादंबर्‍यांचे अन्य भारतीय भाषांत अनुवाद करण्यात आले आहेत. ‘स्वामी’ (गुजराती, हिंदी, कन्नड); ‘श्रीमान योगी’ (हिंदी, इंग्लिश); ‘राजा रविवर्मा’ (मल्याळी, हिंदी, कन्नड); राधेय (हिंदी) ह्या त्या कादंबर्‍या होत. सातत्याने केलेले लेखन, वाचन, चिंतन, मनन, प्रवास यांमुळे देसाईंचे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. मानसिक ताण-तणावांचा परिणाम प्रकृतीवर झाल्यामुळे मधुमेह, रक्तदाब हे विकार बळावत गेले. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ‘शेकरा’ ह्या त्यांच्या शेवटच्या कादंबरीच्या संदर्भात आनंद यादवांनी लिहिले, ‘दादा गेले आणि त्यांचं एक हिरवंगार हृदय जंगल जळून खाक झालं.’      

- वि. शं. चौघुले

देसाई, रणजीत रामचंद्र