Skip to main content
x

देशमुख, रंजना

रंजना

       गोरा रंग, धारदार नाक, डौलदार बांधा, गालावरचा तीळ आणि नजरेतील वेधकता या वैशिष्ट्यांच्या जोरावर वैविध्यपूर्ण भूमिका साकार करत आपल्या अभिनयाच्या जोरावर थोड्याच कालावधीत रसिकांना आपलेसे करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रंजना.

      रंजना यांचा जन्म मुंबई येथे झाला. घरात अभिनयाचा वारसा असणाऱ्या रंजना यांचे वडील गोवर्धन हे गुजराती रंगमंचावरील ‘बालगंधर्व’ म्हणून ओळखले जात. आई वत्सला देशमुख यांनी वडिलांबरोबर घटस्फोट घेतल्यावर रंजना व तिचा लहान भाऊ आपल्या मावशीकडे म्हणजे संध्याकडे राहू लागले. रंजना यांनी परेल इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. तसेच आई वत्सला देशमुख यांचा अभिनयाच्या क्षेत्रात कारकिर्द घडवण्याला विरोध असल्यामुळे रंजना यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच दावर इन्स्टिट्यूटमधून सेक्रेटेरियल प्रॅक्टिस, ब्यूटी पार्लर, बेकिंग, केटरिंग अशा विविध पदव्या मिळवल्या, पण त्याच बरोबरीने रुईया महाविद्यालयातून तत्त्वज्ञान व साहित्य या विषयातील पदवीही मिळवली.

      खरेतर रंजना यांची अभिनय कारकिर्द बाल वयातच सुरू झाली, ती ‘हरिश्‍चंद्र तारामती’ या चित्रपटातून वयाच्या पाचव्या वर्षीच. त्यांनतर त्यांनी ‘लडकी सह्याद्री की’ या हिंदी व मराठी भाषांतील चित्रपटातही अभिनय केला होता.

      आई व मावशी यांच्यासोबत राहणाऱ्या रंजना यांनी चित्रपटसृष्टीचा अनुभव जवळून घेतला असला तरी तरुणपणी आपण अभिनेत्री होऊ अशी अपेक्षा मनात बाळगली नसताना त्यांना अभिनयाची संधी मिळाली ती, व्ही. शांताराम यांच्यामुळे. ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ (१९७५) या चित्रपटातील भूमिकेसाठी व्ही. शांताराम यांनी रंजना यांना विचारले आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

       या चित्रपटातील रंजना यांच्या छोट्या पण प्रत्ययकारी भूमिकेमुळे त्यांना किरण शांताराम यांनी ‘झुंज’ (१९७७) या चित्रपटात नायिकेची भूमिका दिली. यातील त्यांची ग्रामीण शाळेतील शिक्षेकेची भूमिका त्यांनी सक्षमपणे साकारली. या भूमिकेतील त्यांची अभिनयकला लक्षात घेऊनच त्यांना पुढे अनेकानेक चित्रपट मिळाले. यानंतर त्यांचा मुख्य भूमिका असणारा चित्रपट म्हणजे ‘असला नवरा नको गं बाई’ (१९७७). या चित्रपटात खेडवळ असणाऱ्या राजा गोसावी यांच्याबरोबर त्यांनी केलेली सुशिक्षित तरुणीची भूमिकाही वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

     रंजना यांच्या चित्रपट कारकिर्दीला वेगळेपणा देणारी भूमिका त्यांना ‘चानी’ या चित्रपटामुळे मिळाली. चि.त्र्यं. खानोलकर यांच्या ‘चानी’ या कादंबरीवर आधारित असणाऱ्या या चित्रपटातील चानीची व्यक्तिरेखा रंजना यांनी तंतोतंत वठवली. मराठी स्त्री आणि इंग्रज अधिकारी यांच्या मीलनातून जन्माला आलेली आणि म्हणूनच तत्कालीन समाजाकडून नाकारली गेलेली स्त्री रंजना यांनी ताकदीने रंगवली. मानसिक संघर्ष विरुद्ध सामाजिक संघर्ष मांडलेल्या या चित्रपटातील त्यांची भूमिका आशय व विषयदृष्ट्या पूर्णपणे वेगळी ठरली.

     सुशिक्षित, संवेदनशील शाळा शिक्षक ते खुनी स्त्री अशा दोन टोकांमधील प्रवास साकारणारी ‘सुशीला’ (१९७८) या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षणीय होती. सज्जनतेपासून दुर्जनतेपर्यंतचा सुशीला या व्यक्तिरेखेचा प्रवास, त्यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना हतबुद्ध करणारा ठरला.

     रंजना यांच्या अभिनयाचा खरा कस लागला, तो ‘अरे संसार संसार’ (१९८०) या चित्रपटातील भूमिका साकारताना. कुलदीप पवार या अभिनेत्यासह त्यांची या चित्रपटातील भूमिका वैशिष्टयपूर्ण होती. नववधू म्हणून नव्याने घरात आलेली, शेतकरी नवऱ्याबरोबरचे हालाखीचे जीवनही आनंदात व्यतीत करणारी गृहिणी, नवऱ्याच्या मृत्यूनंतरही मुलांसाठी हिमतीने उभी राहणारी आई, आणि वृद्ध झाल्यावर सुना आल्यावरही घराचे अभंगत्व टिकवण्यासाठी धडपडणारी सासू, असा वयपरत्वे बदलत जाणारा स्त्रीचा प्रवास एकाच चित्रपटातून उलगडून दाखवणाऱ्या रंजना या अभिनेत्रीला चित्रपटातील या विविधांगी भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला तर नवल वाटण्यासारखे काहीच नाही.

     पण त्यांची विशेष रंजक भूमिका म्हणून आपल्याला ‘मुंबईच्या फौजदार’ या भूमिकेकडे पाहावे लागते. त्यातील सुशिक्षित नवऱ्याची अशिक्षित पत्नी, निरागस स्वभावाची गावात राहिलेली मुलगी लग्नानंतर शहरात येते व तिथे नवऱ्यापासून शेजाऱ्यांपर्यंत सर्वांच्या चेष्टेचा विषय होते, पण त्याचेही वाईट वाटून न घेता नवऱ्याशी सुखाने संसार करण्याचे स्वप्न पाहाते. नवऱ्याला मात्र नकोशी झाली आहे हे कळल्यावर ती आपणहून माहेरी निघून जाते पण त्यातही हार न मानता शहरी रीतीरिवाज शिकून पुन्हा नवऱ्याला सामोरी जाते आणि नवऱ्याचे मन जिंकते, पण स्वत:चे निरागसपण हरवून बसते. ग्रामीण-खेडवळ स्त्री ते शहरी, सुशिक्षित स्त्री यातला विरोधभास रंजना ज्या ताकदीने रंगवतात, तो विरोधाभास केवळ चित्रपट पाहण्यातूनच सहजपणे उमगत जाणारा आहे.

     रंजना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले असले तरी त्यांची खरी जोडी जमली ती अशोक सराफ यांच्याबरोबरच. अशोक सराफ यांच्याबरोबर अभिनय केलेले रंजना यांचे ‘सुशीला’ (१९७८), ‘गोंधळात गोंधळ’ (१९८१), ‘गुपचूप गुपचूप’ (१९८३), ‘बहुरूपी’ (१९८४), ‘बिनकामाचा नवरा’ (१९८४), ‘खिचडी’ (१९८५) हे चित्रपट विशेष गाजले. किंबहुना चित्रपटसृष्टीला अशोक-रंजना या नावाची एक नवी कलावंत जोडी लाभली. पण या जोडीचे आणखी चित्रपट पाहण्याचे भाग्य मात्र रसिकांना लाभले नाही. व्ही. शांताराम यांच्या ‘झंजार’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगलोरला जात असताना २२ नोव्हेंबर १९८४ रोजी रंजना यांच्या गाडीला अपघात झाला आणि या अपघातात अपंग झालेल्या रंजना यांना चित्रपटसृष्टीतून कायमचे निवृत्त व्हावे लागले.

     अभिनयाला आपले दैवत मानणाऱ्या रंजना यांनी १९९३ मध्ये व्हील चेअरवर बसूनच ‘फक्त एकदाच’ या नाटकामधून आपल्या अभिनयाची झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवली. या नाटकाचे एकूण ३८ प्रयोग झाले, यातच त्यांच्या हिमतीला दाद द्यावीशी वाटते आहे. त्यानंतर मात्र त्यांच्या वाट्याला विशेष भूमिका आल्या नाहीत. कालांतराने मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

     ग्रामीण, सुशिक्षित, बंडखोर स्त्री साकारताना रंजना जेवढ्या समरस होत होत्या तेवढ्याच त्या निरागस भाव व्यक्त करताना समरस व्हायच्या, इतकेच नाही तर तमाशाच्या फडावर नाचतानाही त्या तितक्याच तल्लीन व्हायच्या. यातूनच अभिनयाकडे पाहण्याची त्यांची प्रगल्भ दृष्टी अधोरेखित होत जाते. त्यांच्या अभिनयातील विविधांगी रूपे प्रेक्षकांना जशी आवडत होती तशीच त्यांची अदाकारीही प्रेक्षकांना भावत होती, म्हणूनच आजही त्यांचे नाव चित्रपटसृष्टीत आदराने व मानाने घेतले जाते.

- डॉ. अर्चना कुडतरकर

देशमुख, रंजना