Skip to main content
x

देशपांडे, ललितदास आनंद

       लितदास आनंद देशपांडे यांचा जन्म परभणी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण औरंगाबाद येथे झाल्यावर त्यांनी १९६९ मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी महाराष्ट्र कृषी विद्यापीठातून मिळवून १९७२ मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून एम.एस्सी. (कृषी) अनुवंशिक व रोप-पैदासशास्त्रात प्राप्त करून त्याच विद्यापीठातून जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. त्यांनी १९७३मध्ये कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथून संशोधक म्हणून आपल्या सेवाकार्याची सुरुवात केली.

डॉ.देशपांडे यांनी कापूस-पैदासकार म्हणून काम करत असताना अनेक संकर करून त्यातून ‘एन.एच.२३़- पौर्णिमा’ हे ३९ ते ४० टक्के सरस रुईचा उतारा देणारे व १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देणारे, तसेच २६ ते २८ मि.मि. धाग्याची लांबी असणारे असे अमेरिकन कपाशीचे वाण प्रथमच विकसित केले. डॉ.देशपांडे यांनी १९८२ ते २००४ ही सुमारे २२ वर्षे कापूस-पैदासकार म्हणून कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बाग-परभणी येथे कार्य करून देशी कपाशीची उत्पादन क्षमता तसेच धाग्याची लांबी २२.० मि.मि.पासून २९-३० मि.मि.पर्यंत विकसित करून अमेरिकन कपाशीतुल्य देशी कापसाच्या वाणाची निर्मिती केली. जी अमेरिकन कपाशीपेक्षा जास्त रोग प्रतिबंधकारक, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असलेली असल्यामुळे कोरडवाहू लागवडीखाली कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी ठरली व कोरडवाहू कापसाची लागवड करणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारली. या प्रकल्पांतर्गत १९९०मध्ये पी.ए. १४१ (नामदेव) हा देशी कपाशीचा लांब धाग्याचा प्रथम वाण, १९९४मध्ये पी.ए. १८३ (सावता) व १९९९मध्ये पी.ए. २५५ (परभणी तुराब) हे उन्नतवाण १२-१६ क्विं./हे. रुईचा उतारा, २६-२९ मि.मी. धाग्यांची लांबी असणारे वाण निर्माण केले. ‘परभणी तुराब’ या वाणाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे या वाणाची तामिळनाडू सरकारने कोविलपट्टी विभागासाठी शिफारस केली आहे. या वाणांबरोबर पी.ए. ४०२ (विनायक), पी.ए. ४६, इ. सरसवाण निर्माण करून त्यांची कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस केली आहे. देशपांडे यांनी २००४ ते २००६ या काळात कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे कापूस-विशेषज्ञ म्हणून कार्यरत असताना एन.एच. ६१५ या अमेरिकन कापसाच्या वाणाच्या निर्मितीत व शिफारशीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ.देशपांडे यांनी २००६ ते २००८ या काळात केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे पीकसुधार विभागाचे प्रमुख असताना बायोटेक्नॉलॉजी, सीड टेक्नॉलॉजी या विषयाबाबत भरीव कार्य केले आहे.

देशपांडे यांचे ‘कॉटन इन महाराष्ट्र’ हे इंग्रजी पुस्तक आणि ‘कापूस लागवडीचे तंत्र आणि मंत्र’ या विषयावर १८ मराठी लेख प्रसिद्ध झाले आहेत. शिवाय २००२ मध्ये पर्थ (ऑस्ट्रेलिया) येथे झालेल्या ‘इंडो-ऑस्ट्रेलिया’ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ‘इंट्रॉग्रेशन ऑफ जीन्स ऑफ देसी कॉटन इन्टू अमेरिकन कॉटन’ हा शोधनिबंध सादर केलेला आहे. देशपांडे यांनी एम.एस्सी. (कृषी)साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. शिवाय त्यांनी पीएच.डी.साठी प्रमुख मार्गदर्शक व साहाय्यक मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. त्यांनी केलेल्या संशोधन कार्याबद्दल अनेक संस्थांनी विशेष पुरस्कार देऊन त्यांना गौरवलेले आहे.  नागपूर येथे १९९२ मध्ये वसंतराव नाईक चर्चासत्रात ‘इंट्रॉगे्रशन ऑफ जीन्स ऑफ देसी कॉटन इन टू अमेरिकन कॉटन’ हा शोधनिबंध सादर करून त्यांनी सुवर्णपदक पटकावले. याशिवाय कपाशीवरील उत्कृष्ट संशोधनासाठी आणि एन.एच. २३९ (पौर्णिमा) वाणाच्या उत्पत्तीसाठी इंडियन सोसायटी फॉर कॉटन इंप्रूव्हमेंट, मुंबईतर्फे हेक्झामर अ‍ॅवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीतर्फे २००२ मध्ये देशी कपाशीवरील उत्कृष्ट संशोधनाबाबत मल्होत्रा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

       - मानसी श्रेयस बडवे

देशपांडे, ललितदास आनंद