Skip to main content
x

देशपांडे, निर्मला वसंत

     निर्मला वसंत देशपांडे यांचा जन्म बडोदा येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव लीला फडणीस होय. त्यांच्या लेखनाचे एक ठळक वैशिष्ट्य जाणवते ते म्हणजे त्या स्त्रीच्या अंतर्मनाचा वेध घेतात. स्व-अनुभवच अनेक ठिकाणी कलारूप धारण करतो. त्यामुळे त्यांच्या लेखनाला जिवंतपणा प्राप्त होतो. त्यांच्या लेखनाला त्या गांधीवादी कार्यकर्त्या असल्यामुळे त्याचीही झाक त्यांच्या लेखनात येते.

     त्यांचे बालपण देवास, बडोदा, इंदोर, ग्वाल्हेर येथे गेल्यामुळे त्यांच्या लेखनाला बर्‍याचदा संस्थानची पार्श्वभूमी लाभते. एैसपैस वाडे-बंगले, पाठीपुढे अंगण, गच्ची असलेली घरे, प्रत्येकाला भरपूर भावंडे असणे, मोठ्या मुलाने जबाबदारी कर्तव्य म्हणून स्वीकारणे, कौटुंबिक नात्यांनी बांधली गेलेली माणसे, मोठ्यांची घरातील वागणूक त्यांचे नीतिनियम, त्यांचा धाक-दरारा, मुलांवरचे संस्कार या सार्‍यांचे त्या काळातील दर्शन घडते. प्रत्यक्ष आईवडिलांपेक्षाही त्यांचे आजी, काकी, मामी, आत्या अशांशीही असलेले प्रगाढ नाते; याचे कालानुरूप दर्शन त्यांच्या लेखनातून घडते.

     ‘टिकली येवढं तळं’, ‘बन्सी काहे को बजायी’, ‘कथा एका बकुळची’, ‘सलत सूर सनईचा’ आदी कादंबर्‍या; ‘मर्ल’ हा कथासंग्रह; ‘गंधखुळी’, ‘हा छंद सुटत नाही’ हे काव्यसंग्रह; ‘मातीची गाय’, ‘पौर्णिमेचा चंद्र’, ‘चिव चिव चिमणी’, ‘उंटावरचा शहाणा’ हे बालवाङ्मय; ‘भाळी गोंदण चांदणे’ हे आत्मचरित्र अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या ‘टिकली येवढं तळं’, ‘कथा एका बकुळची’ या कादंबर्‍यांना आणि ‘मातीची गाय’, चिव चिव चिमणी’ या बालसाहित्याला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले आहेत. ‘भाळी गोंदण चांदण’ या त्यांच्या आत्मचरित्रातून तत्कालीन संस्कृती सतत दिसते. पहिल्यांदाच लुगडे नेसण्याचा सोहळा, अनंताच्या पूजेचे नेम-नियम, दागिन्यांचे वेगळे-वेगळे जाडजूड प्रकार, श्रावण्या-अभिषेक, लग्नानंतर गोंधळ घालणे हे आहेच पण खास ‘सीकेपी’च्या रितीभाती, वेगवेगळी पक्वान्ने, सामीष आणि इतर पदार्थ यांचीही ओळख होते.

     या आत्मचरित्रात त्यांनी कुठलाही आव न आणता नम्र भूमिका घेतली आहे. आपल्या या आत्मपर लेखनाला ‘आत्मचरित्र’ असे भारदस्त नाव देणे त्यांना पटत नाही. त्यांच्या पतीचे- वसंत देशपांडे यांचे सहजीवनातला जोडीदार म्हणून चित्रण झाले आहे. ‘स्व’ला अधिक महत्त्व आहे, पण ‘माझ्यावर सतत अन्याय केला गेला’ असा सूर नाही. आपल्या मतांमध्ये विचारांमध्ये झालेले बदल, आपला त्रागा, चिडचिड, मुंबईत आल्यावर सुरुवातीला आलेले कावरे-बावरेपण, पतीचा अलिप्तपणा, पण माहेरच्यांना त्यांनी सहजपणे दिलेला आधार, नातूंशी असलेली त्यांची मैत्री, त्यांचा मृदू उबदार स्नेह, त्या स्नेहाची देशपांड्यांना असणारी जाणीव, महत्त्वाचे म्हणजे या मैत्रीमुळे पति-पत्नीमध्ये थोडाही तणाव नाही हा पतीचा समजूतदारपणा, त्यांच्या विवाहाचा गाढ विश्वास आणि प्रगाढ माया त्या साध्या सोप्या शब्दांत मांडतात.

     कपाळावरचे गोंदण काही पुसता येत नाही, तसेच आयुष्यातील दुःखही वजा करता येत नाही; पण सुखाचे चांदणे फुलवणे तर आपल्या हातात असते. निर्मला बाईंनी हेच केले; त्यांनी आयुष्यातून चांदणे शोधले... फुलवले.

     ‘टिकली येवढं तळं’ या कादंबरीत तेच वातावरण, सर्जनक्षमता असणारी नायिका, तिला प्रोत्साहन देणारे निशिकांत, त्यांच्यात निर्माण झालेला एक तरल अनुबंध यांचे चित्रण आहे. नायिकेबरोबरीनेच ‘रामप्यारी’सारख्या एका कामवालीचे चित्रणही त्या सुरेख करतात. त्यासाठी बुंदेलखंडी लोकगीतांच्या वापर केल्यामुळे एक वेगळाच पोत त्या व्यक्तिरेखेला प्राप्त होतो. कणखरपणा, जीवनविषयक तत्त्वज्ञान, जीवनात काहीच न मिळूनही हसत-खेळत जगण्याची वृत्ती हे सारे त्या व्यक्तिरेखेतून रेखाटले आहे. आपल्याकडे काम करणार्‍या गंगा देवकी यांचेही चित्रण त्यांनी आपल्या आत्मचरित्रामधून केले आहे.

     साहित्यिकांच्या सहवासामुळेही त्यांचे आयुष्य सधन झालेले दिसते. त्यांच्या काव्यवेडाला खतपाणी घालणारे ‘जाँ निसार अख्तर’, ‘शिवमंगल सिंह-सुमन’ हे कवी महाविद्यालयीन काळात तर पुढे ग्रेस, जयवंत दळवी, श्री.दा.पानवलकर, मधुकर केचे, शिरीष पै, सोपानदेव चौधरी, रामदास भटकळ यांची मैत्री पोषक ठरली.

     ‘बन्सी काहेको बजायी’ ह्या त्यांच्या कादंबरीबद्दल डॉ.द.भि.कुलकर्णी म्हणतात की अतिशय निरलंकृत शैलीतील, व्यक्तिमनातून सामाजिक नेणिवेचा आविष्कार करणारे ऋजू अंतःकरणाचे ललित साहित्य मधुर तरीही वास्तव, एककेंद्री तरीही बहुमुखी अनुभूती देणारी मानवी मनाचे-जीवनाचे निरुपम चित्रण लेखिकेला साधले आहे.

     ‘मर्ल’ या त्यांच्या कथासंग्रहाबद्दल ‘निवेदनशैलीत फसवा साधेपणा, नाट्यपूर्ण घटनांची चोखंदळ आणि कसबी रचना त्यांची कथा म्हणजे मर्‍हाटी संस्कृतीचाच एक विविधतापूर्ण ‘पोट्रेट’ आहे,’ अशा शब्दांनी ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी गौरवले आहे.

     ‘मर्ल’, ‘उज्ज्वला बर्वे’, ‘निथळगौर’, ‘बन्नाबन्नी’, ‘मेरी हॅड अ लिटिल लँब’ या कथाही अतिशय वाचनीय आहेत. त्यांच्या बालकवितांमध्येही मुलांना आवडतील अशा चमकदार कल्पना आढळतात.

     - प्रा. मीना गुर्जर

देशपांडे, निर्मला वसंत