देशपांडे, पुष्पा मधुकर
मधुकर गणपत देशपांडे यांचा जन्म कर्नाटकातील गुलबर्गा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण गुलबर्ग्यात व महाविद्यालयीन शिक्षण गुलबर्गा व पुणे येथे झाले. १९५९ मध्ये त्यांनी एम.ए.(गणित) पदवी मिळवली.
पुष्पा मधुकर देशपांडे ह्यांचा जन्म नाशिकचा. त्यांचे शालेय शिक्षण हैद्राबाद (आंध्र) येथे व महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद व पुणे येथे झाले. १९६० साली त्यांनी एम.ए.(गणित) ही पदवी संपादन केली.
१९५९ मध्ये मधुकर व पुष्पा ह्यांचा विवाह झाला व ते पुण्यात राहू लागले. मधुकररावांनी गुलबर्गा इंजिनियरिंग महाविद्यालय, फर्गसन महाविद्यालय व पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पुष्पाताई पुण्यातील सेंट मीराज महाविद्यालयमध्ये प्राध्यापिका होत्या. गणितात डॉक्टरेट मिळविण्यासाठी मधुकरराव १९६५ साली अमेरिकेला गेले व १९६९ मध्ये गणितात पीएच.डी. झाले. १९६६ साली पुष्पाताई अमेरिकेला गेल्या. तेथे मिलवॉकी गावात देशपांडे स्थायिक झाले. पुष्पाताईंनी गणितातील एम.एस. पदवी मिळविली.
पण मायभूमीच्या ओढीने १९७१ मध्ये दोघेही भारतात परतले. औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून मधुकरराव व गणिताच्या प्राध्यापिका म्हणून पुष्पाताई नोकरी करू लागल्या. पण ह्या नोकरीत व भारतात मन न रमल्याने दोघेही १९७२ मध्ये मिलवॉकीस परत गेले. तेथे १९७८ मध्ये मधुकररावांनी अमेरिकेत इंडिया म्युझिक सोसायटीची स्थापना केली. १९९१ पर्यंत ह्या संस्थेचे काम त्यांनी केले. १९८५ ते १९९५ पर्यंत शिकागोतील इंडिया डेव्हलपमेंट सर्व्हिस ह्या संस्थेचे ते विश्वस्त होते. मिलवॉकीच्या मार्केट युनिव्हर्सिटीत गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना गणित पत्रिके (मॅथस् जर्नल) मध्ये लेखन केले, नॅशनल कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले.
१९६७ ते १९७४ ह्या काळात पुष्पाताईंनी मिलवॉकी येथील महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून व युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिनमध्ये अध्यापक म्हणून काम केले तर १९७६ ते १९९४ या काळात मिलवॉकी ट्रेड अँड टेक्निकल शाळेमध्ये त्या प्राध्यापिका होत्या. उच्च गणिताचे अभ्यासक्रम राबविणे, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांसाठी विद्यार्थी तयार करणे, प्रावीण्यवर्ग घेणे ह्यात त्यांचा हातखंडा होता.
१९९४ पर्यंत देशपांडे पती-पत्नी कौटुंबिक जबाबदाऱ्यांतून उत्तम प्रकारे मुक्त झाले. ‘फिरती प्रयोगशाळा’ हा वैज्ञानिक प्रकल्प भारतात करावयाचा होता, त्यासाठी त्यांनी निधी जमविला. डॉ. जगन्नाथ वाणी ह्यांच्या मदतीने सीआयडीए व वाईल्ड रोझ फाऊंडेशन या कॅनेडियन संस्थांकडून अनुदान मिळविले व प्रकल्पाची आर्थिक व्यवस्था करून दोघेही पुन्हा भारतात- पुण्यात आले.
पुण्यातील सहकारी मित्रांचे विचार, शाळांशी साधलेला संपर्क ह्यातून प्रकल्पाची योजना निश्चित केली. ग्रामीण भागातील विनाअनुदानित शाळा, पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य हे कार्यक्षेत्र ठरविले. फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देऊन विज्ञानाभिमुख करणे हा ह्या प्रयोगाचा हेतू होता. त्याप्रमाणे १९९५ मध्ये विज्ञान वाहिनी संस्थेची स्थापना झाली.
टाटा ६०६ या वाहनाच्या चेसिसवर देशपांड्यांनी एक प्रयोगशाळा तयार केली. त्यावेळी आठ जणांचा कृतिगट होता. १४ जुलै १९९५ रोजी शबाना आझमी व जावेद अख्तर ह्यांच्या हस्ते फिरत्या प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. नंतरच्या काळात ह्या फिरत्या प्रयोगशाळेने दोन हजार शाळांना भेट दिली आहे. दोन लाख विद्यार्थ्यांना या प्रयोगाचा लाभ झाला आहे. ही शाळाभेट म्हणजे त्या शाळेचा ‘विज्ञान दिन’ असतो. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रयोगांच्या साहाय्याने विज्ञानाचे मार्गदर्शन मिळते.
मधुकररावांनी पुण्याप्रमाणेच उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर गावात स्थानिक लोकांच्या मदतीने ग्रामीण विज्ञानकेंद्र उभारले आहे. कर्नाटकमध्ये गुलबर्गा येथे संस्थेने स्थानिक लोकांना ‘विज्ञान प्रसारिणी’ ही फिरती प्रयोग शाळा निर्माण करण्यास मोठी मदत केली आहे.
१९९५ साली असलेल्या आठजणांच्या कृतिगटात आज अकरा विश्वस्त व एकूण सव्वीस सहकारी आहेत. जानेवारी २००५ मध्ये संस्थेचा दशवार्षिक वाढदिवस साजरा झाला. या समारंभास महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील दहा विज्ञानसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून शिक्षणक्षेत्रात वेगळा प्रयोग करणाऱ्या मधुकर देशपांडे व पुष्पा देशपांडे ह्यांचा अनेक संस्थांनी पुरस्कारांनी गौरव केलेला आहे. पुष्पाताईंना सेवासदन संस्थेचा ‘देवधर पुरस्कार’, निवेदिता संस्थेचा ‘सरस्वती समाजसेवा पुरस्कार’ अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयोग अभिनव आहे.