Skip to main content
x

देशपांडे, शंकर राजाराम

राममारुती महाराज

    राममारुती यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पेण या गावी झाला. राममारुतीच्या माउलीने या बालकाला ईश्वरभक्तीची आवड आहे असे पाहून बालमुकुंद स्वामींच्या चरणी अर्पण केले. शालेय शिक्षणाऐवजी मुलगा देवदर्शन, कथा, कीर्तन यांत रमे. बालमुकुंद स्वामींनीच त्याचे मूळचे ‘शंकर’ हे नाव बदलून ‘राममारुती’ असे नामाभिधान करून त्याला आपले शिष्यत्व दिले. स्वामी त्याला हिमालयावर घेऊन गेले. तेथे त्याच्याकडून योगाभ्यास करून घेतला आणि आपल्या सर्व शक्ती त्याच्या ठायी रुजविल्या.

राममारुती महाराजांना योगविद्येचे अकारण प्रदर्शन करणे रुचत नसे. शिर्डीच्या साईबाबांना ते गुरुस्थानी मानीत. त्यांनी स्वत:ची ईश्वर नामभाषा तयार केली. श्रीराम जयराम, जय पांडुरंग, गोविंद, गोपाळ इ. नामांना विशेष अर्थ असे आणि त्यांच्या सहवासात आल्यावर तो नीट समजे. योगाभ्यास व अध्यात्माची सिद्धी प्राप्त झाल्यावर दहा-बारा वर्षांनी महाराज स्वगृही परतले. सद्गुरूंच्या निर्वाणानंतर पुन्हा महाराज १०-१२ वर्षे हिमालयात ईशचिंतनात मग्न होते.

राममारुतींनी, नानामहाराज श्रीगोंदेकर यांना समाजकार्यास प्रवृत्त करून मुंबईस एक शिक्षणसंस्था काढली. याशिवाय, मातृवत्सल मंडळ व कृष्णनंद राममारुती विद्यालयाची स्थापना केली. स्वत: निरक्षर असूनही त्यांनी शैक्षणिक संस्था काढून हजारो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा खुली केली. सुमारे २५ वर्षे त्यांनी महाराष्ट्र व गुजरात प्रांतात समाजकार्य केले.

राममारुतींची देहयष्टी मजबूत व पीळदार होती. त्यांना मुलांच्या शिक्षणाची फार तळमळ होती. त्यांचे महानिर्वाण कल्याण येथे दळवी वाड्यात, भाद्रपद वद्य नवमीला झाले.

श्री गजानन महाराज पट्टेकर यांनी राममारुती महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धार व मंदिर रचनेत सक्रिय भाग घेतला. श्री पट्टेकर हे राममारुती महाराजांना गुरुस्थानी मानीत. महाराजांचे भिवंडी येथील श्री. शांतारामभाऊ जयवंत व श्री. भाऊसाहेब धनवटकर यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. कल्याण येथील श्री संत राममारुती महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला अनेक भाविक येतात. ही समाधी जागृत आहे असे भाविकांचे प्रतिपादन आहे. श्री. अनंत यशवंत गडकरी यांनी श्री राममारुती महाराजांचे ओवीबद्ध चरित्र लिहिले असून त्याच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

वि.ग. जोशी

देशपांडे, शंकर राजाराम