Skip to main content
x

देशपांडे, वसंत बाळकृष्ण

संत बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथे झाला. वऱ्हाडातील कमळापूरच्या मूळच्या वतनदार घराण्यातील आजोबा गोविंद देशपांडे हे गायन शिकले होते, तर वसंतरावांचे वडील तबला वाजवत. त्यांची आई राधाबाई पारंपरिक स्त्री-गीते उत्तम, सुरेल आवाजात गात असे. त्यांच्यावर तो पहिला संगीत संस्कार  झाला. नागपूर येथे विष्णू दिगंबर पलुसकरांच्या पठडीतील शंकरराव सप्रे यांच्याकडे ‘श्रीराम संगीत विद्यालया’त त्यांचे प्राथमिक संगीत शिक्षण झाले. तिथे रामचंद्र चितळकर (प्रख्यात संगीतकार सी. रामचंद्र) हे त्यांचे सहाध्यायी होते. हे दोघे बालवयात मेळ्यांमध्ये गात, मूकपटांना प्रत्यक्ष पार्श्वसंगीत वाजवत असत. बालवयातच मास्टर दीनानाथ यांच्या गाण्याच्या आकर्षणामुळे त्यांनी अनेक संगीत नाटके पाहिली, त्यांचा सहवासही केला. दीनानाथांच्या गायनातील तडफदारपणा, तेजस्विता त्यांनी अंगीकारली.

वसंत देशपांडे १९३६ ते ३८ या काळात मामा शंकर पांडे यांच्यासमवेत लाहोरला राहिले. तिथेच ते मॅट्रिक झाले. लाहोरच्या वास्तव्यात त्यांनी तिकडच्या अनेक उस्तादांचे तयारीचे गाणे ऐकले. पतियाळा घराण्याचे उस्ताद आसद अली खाँ यांच्याकडून त्यांना सहा महिने केवळ ‘मारवा’ या रागाची विशेष तालीम मिळाली. १९४० साली प्रापंचिक जबाबदारी ओळखून मिलिटरी अकाउण्ट्समध्ये नोकरी पत्करून ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांनी १९४२ ते ५२ अशी दहा वर्षे सुरेशबाबू माने यांच्याकडून किराणा घराण्याच्या स्वरप्रधान बढत अंगाच्या गायकीची तालीम घेतली. याच काळात त्यांना गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांचाही सहवास लाभला. वसंत देशपांडे यांनी १९५० च्या सुमारास भेंडीबाजार घराण्याच्या उ. अमान अली खाँ यांच्याकडूनही काही काळ खंडमेरू पद्धतीने स्वरप्रस्तार करणाऱ्या या गायकीची तालीम घेतली. त्यांनी त्या गायकीतील लयीशी खेळत डौलदारपणे केलेले बोलबनाव व विशेषतः ‘सरगम’ करण्याचा खास अंदाज उचलला. जटिल तानक्रिया हा तर देशपांडेंच्या गायकीतील एक विशेष भाग होता. पं. कुमार गंधर्व हे त्यांचे जिवलग मित्र होते. त्यांना देशपांडे यांनी गुरुसमान मानून त्यांच्या अनेक बंदिशीही स्वतःच्या ढंगात गायल्या. अनेक घराण्यांतील गायकींचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेस व गळ्याच्या धर्मास अनुकूल अशी वेगळी गायकी तयार केली.

त्यांनी १९६२ साली ‘ट्रान्स्फॉर्मेशन ऑफ म्युझिक’ या विषयावर प्रबंध सादर करून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून डॉक्टरेट मिळवली. मिलिटरी अकाउण्ट्समधील नोकरीमुळे त्यांची १९६३ साली नेफा आघाडीवर बदली झाली. त्यांच्या संगीतस्नेही, प्रख्यात गायिका बेगम अख्तर यांच्या आग्रहामुळे या नोकरीचा त्यांनी १९६५ साली राजीनामा दिला व त्यांनी स्वतःस संगीत क्षेत्रात पूर्णपणे झोकून दिले. एच.एम.व्ही.ने त्यांच्या मारवा, मधुकंस, नटभैरव, राजकल्याण या रागांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या.

ख्यालाबरोबरच ठुमरी शैलीवरही देशपांडे यांचा पूर्ण अधिकार होता. बनारस व पंजाब अंगाची ठुमरी ते मोठ्या नखरेल अंदाजाने पेश करत. ‘मैं कैसे आऊँ  बालमा’, ‘रस के भरे तोरे नैन’ या ठुमर्‍या आणि ‘आनबान जिया में लागी’, ‘बिंदिया ले गई’, ‘जमुना किनारे मेरा गाँव’ हे दादरे ते फार खुलवून गात. ठुमरीतील चमत्कृतिपूर्ण सरगम व खास ‘खाँसाहेबी’ स्वरोच्चार हे त्यांचे वैशिष्ट्य होते. बेगम अख्तर आणि त्यांची सांगीतिक मैत्री १९३५ सालापासून होती व गझल हाही देशपांड्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्याकडे पारंपरिक, बैठकीच्या लावण्यांचाही संग्रह होता.

वसंतराव एक चतुरस्र कलाकार होते. गायनाबरोबरच ते तबला, सारंगी, हार्मोनिअम, ऑर्गन उत्तम वाजवत. पं. कुमार गंधर्वांच्या काही व्यावसायिक ध्वनिमुद्रिकांत त्यांनी तबल्याची साथही केली होती. त्यांनी १९४९ साली हिराबाई बडोदेकरांसह तबलावादक व गायक म्हणून आफ्रिकेचा दौरा केला. ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटातील ‘इंद्रायणी काठी’ या भीमसेन जोशींनी गायलेल्या भजनास त्यांनी ऑर्गनची साथही केली. मराठी नाट्यसंगीताच्या इतिहासाचे ते चालतेबोलते कोशच होते. आशा भोसले यांना १९५२ साली नाट्यपदांच्या ध्वनिमुद्रिकेसाठी दीनानाथांच्या पदांची तालीम देशपांड्यांनीच दिली होती. ‘मराठी नाट्यसंगीताची वाटचाल’ असा कार्यक्रम त्यांनी मोठ्या विद्वत्तेने व रंजकतेने सादर केला.

सुखदेव कथक यांच्याकडून त्यांनी कथकी बाजाची, अदाकारीची ठुमरी आत्मसात केली. त्यांचा ज्योतिष, योग, आयुर्वेद, जीवशास्त्र, बागकाम, पाककला, कुस्ती, इ. अनेक शास्त्रांचा व्यासंग होता. ते उत्तम वक्ते  होते. बालगंधर्व, मा. दीनानाथ, अब्दुल वहीद खाँ, सुरेशबाबू, विनायकबुवा, ग.ह. रानडे यांच्या गाण्यांची ते इतकी हुबेहूब प्रस्तुती करत, की ती नक्कल न वाटता अस्सल गायकी ऐकल्याचे समाधान देऊन जाई. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे ते एक सभासद होते व सवाई गंधर्व समारोहात त्यांची गायन हजेरी ही ठरलेली असायची.

वसंतरावांनी अनेक उत्तम बंदिशी रचल्या होत्या, उदा. मारुबिहाग (उनही से जाय कहो, मैं पतिया लिख भेजी), राजकल्याण (हमारी अरज सुनो, ऐसी लाडली प्रीत), जोगकंस (खेलन आयो री), चंद्रकंस (री मोरी मुरकी कलाई), बसंतमुखारी (कित हो गए बनवारी), नटभैरव (मान अब मोरी, सुजान करिए गुण की चर्चा). कुमारजींना त्यांनी स्थायीतून विचारलेला प्रश्न व तिला कुमारजींनी अंतर्‍यातून दिलेले उत्तर असणारी मधुवंती रागातील ‘मैं आऊँ तोरे मंदरवा’ ही बंदिश प्रसिद्ध आहे. त्यांनी गझल, भजनांना चाली लावल्या व काही संगीत नाटकांसाठीही चाली दिल्या होत्या.

देशपांडे यांनी १९४१ पासून मराठी संगीत रंगभूमीवर अनेक भूमिका आपल्या तेजस्वी गायन व प्रभावी अभिनयाने रंगविल्या. अश्विनशेट (संशयकल्लोळ), नारद (सौभद्र) या त्यांच्या भूमिकाही गाजल्या. दीनानाथांची पदे, ‘सकल चराचरी या’, ‘मधुमीलनात या’, ‘वितरी प्रखर’, ‘परवशता पाश’, ‘शतजन्म शोधिताना’, ‘सुकतातची जगी या’, ते अत्यंत तडफेने गात. ‘रवि मी’, ‘प्रेम सेवाशरण’ (मानापमान), ‘मृगनयना रसिकमोहिनी’, ‘मानिली आपुली’, ‘कर हा करी’ (संशयकल्लोळ), ‘मालिनीकण वाही’, ‘कांते फार तुला’, ‘लाविली थंड उटी’ (शाकुंतल) इ. जुन्या नाटकांतील त्यांच्या नाट्यपदांच्या ध्वनिमुद्रिका अत्यंत गाजल्या.

‘एकदाच गाऊ दे’ (१९६१), ‘मी जिंकलो मी हरलो’ (१९६२), ‘हे बंध रेशमाचे’ (१९६८), ‘वरदान’ (१९७५) या नवीन संगीत नाटकांतही त्यांनी भूमिका केल्या. ‘तुका म्हणे आता’ (लेखक : पु.ल. देशपांडे), ‘मेघमल्हार’ (‘गुलजार नार ही’, ‘धीर धरी’ या दोन पदांसाठी), ‘वीज म्हणाली धरतीला’ (१९७०), ‘वरदान’ (१९७५) या नाटकांना त्यांनी संगीत दिले होते.

जितेंद्र अभिषेकींनी संगीत दिलेले पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीत नाटक १९६७ साली रंगमंचावर आले. हे संगीत नाटक म्हणजे देशपांडे यांच्या जीवनातले एक अनोखे पर्व होते. या नाटकाच्या ५२७ प्रयोगांत त्यांनी काम केले. या नाटकातील आफताब हुसेन खाँसाहेबांची भूमिका ते अक्षरशः जगले. आपल्या गायन-अभिनय क्षमतेचा पुरेपूर वापर त्यांनी या संगीत नाटकात केला. या भूमिकेने व त्यातील ‘तेजोनिधी लोहगोल’, ‘या भवनातील गीत पुराणे’, ‘घेई छंद’, ‘सुरत पिया की’, ‘लागी करेजवा कटार’ इ. पदांनी त्यांना दिगंत कीर्ती बहाल केली व रसिकांच्या मनांत त्यांचे अढळ स्थान निर्माण झाले.

कोल्हापूरच्या शालिनी सिनेटोन निर्मित, भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘कालिया मर्दन’ या बोलपटाच्या हिंदी आवृत्तीत त्यांनी १९३५ साली बालकृष्णाची भूमिका साकारली व गायनही केले. ‘म्युनिसिपालिटी’, ‘दूधभात’ (हिंदीत तनहाई), ‘गुळाचा गणपती’ या मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिकाही केल्या. दादा चांदेकर, वसंत पवार, दत्ता डावजेकर, सुधीर फडके, पु.ल. देशपांडे, वसंत देसाई, वसंत प्रभू, राम कदम, इ. संगीतकारांसाठी ‘पेडगावचे शहाणे’, ‘गुळाचा गणपती’, ‘वैजयंता’, ‘झाला महार पंढरीनाथ’, ‘छंद प्रीतीचा’, ‘भोळी- भाबडी’, इ. सुमारे ८० मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.

‘अष्टविनायक’ (१९७९) हा त्यांनी अभिनय केलेला चित्रपट व त्यातील त्यांची गाणी (‘दाटून कंठ येतो’, ‘तू सुखकर्ता’, ‘प्रथम तुला वंदितो’) अतिशय लोकप्रिय ठरली. रंगबिरंगी (१९८३) या  हिंदी चित्रपटातील ‘ओ मृगनयनी चंद्रमुखी’ या टप्पा अंगाच्या युगुलगीतासाठी संगीतकार आर.डी. बर्मन यांनी खास करून देशपांडे व फैयाझ यांना पाचारण केले.

भावसंगीताच्या क्षेत्रातही वसंत देशपांडे यांनी आपली खास मुद्रा उमटवली. ‘चंद्रिके चकोर भुलला तुला’ व ‘गुलगुल बोलती राघूमैना’ (१९४८), ‘बगळ्यांची माळ’, ‘राहिले ओठातल्या ओठात’ (कवी : वा.रा. कांत, संगीत : श्रीनिवास खळे, १९७२), ‘वाटेवर काटे’, ‘कुणी जाल का’ (कवी : अनिल, संगीत : यशवंत देव, १९७५) ही त्यांची भावगीतेही विशेष गाजली.

त्यांनी आकाशवाणीवरील संगीत नाटके, संगीतिका व अनेक कार्यक्रमांतून गायन केले. त्यांनी १९८० साली अमेरिकेचा दौरा केला. त्यांच्या एकसष्टीनिमित्त १९८१ साली त्यांचा सत्कार समारंभ झाला. अकोला येथे  १९८२ साली झालेल्या बासष्टाव्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. याच वर्षी संगीत नाटक अकादमीतर्फे तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा दिल्ली येथे सत्कार करण्यात आला. पुण्यात राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

संगीतात वादळी तर वैयक्तिक जीवनात स्नेहशील, दिलदार व्यक्तित्व असणार्‍या देशपांडे यांनी प्रपंचही नेटका केला व संगीताचा संसारही खुलवला; मात्र त्यांच्या कार्याला व्यावहारिक यशाची, पुरस्कारांची सोनेरी झालर फार उशिरा लाभली. कृ.द.दीक्षित, रामकृष्ण बाक्रे, पु.ल. देशपांडे, सुनीता देशपांडे, प्रभाकर जठार इ. अनेकांनी त्यांच्या गायकीचे व व्यक्तित्त्वाचे मनोज्ञ दर्शन आपल्या लेखांमध्ये घडवले. त्यांच्या पश्चात ‘वसंतराव देशपांडे ट्रस्ट’तर्फे ‘वसंतोत्सव’ हा संगीतमहोत्सव आयोजित केला जातो व त्यांच्या नावाने पुरस्कारही देण्यात येतो. नागपूर येथे त्यांच्या गौरवार्थ ‘वसंतराव देशपांडे नाट्यगृह’ उभारण्यात आले आहे.

मधू नाडकर्णी, विलास इनामदार, पद्माकर कुलकर्णी, उषा चिपलकट्टी, लता देव, चंद्रकांत लिमये, विजय कोपरकर हे त्यांचे प्रमुख शिष्य होत. शैला दातार व आशा खाडिलकर यांनाही त्यांचे मार्गदर्शन लाभले. नृत्यपंडिता रोहिणी भाटे याही सुमारे वीस वर्षे वसंतराव देशपांडे यांच्याकडे गायन शिकल्या. त्यांचा नातू राहुल देशपांडे त्यांच्या गायकीची व संगीत नाटकांचीही परंपरा पुढे नेत आहे.

ख्याल, ठुमरी, नाट्यसंगीत, भावगीत अशा गानविधा समर्थपणे गाणारे एक चतुरस्र बुद्धीचे गायक, ‘कट्यार काळजात घुसली’सारख्या नाटकांतील गायन व अभिनयाने संगीत रंगभूमीस नवसंजीवनी देणारे संगीतनट, संगीत दिग्दर्शक, कलामर्मज्ञ असे अनेक आयाम असणारे वसंतराव देशपांडे हे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते.

चैतन्य कुंटे

देशपांडे, वसंत बाळकृष्ण