Skip to main content
x

देव, अजिंक्य रमेश

       अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखनाबरोबरच चित्रकलेची आणि अनेक खेळांचीही आवड जोपासणाऱ्या अजिंक्य देव यांचा जन्म मुंबईत झाला, बालपणही मुंबईतच गेले. बी.डी.एम. हायस्कूलमध्ये आणि साठे महाविद्यालयामध्ये त्यांचे शिक्षण झाले. प्रख्यात अभिनेते रमेश देव व सीमा देव हे आईवडील, अभिनय हे दिग्दर्शक असलेले धाकटे भाऊ असे हे देव कुटुंब चित्रपटसृष्टीशी निगडित आहे. आईवडिलांच्या व्यग्रतेच्या काळात त्यांना आजी आणि मामा यांचा प्रेमळ सहवास लाभला. अभिनयासाठी असलेल्या आईवडिलांची चित्रपट जगतातली कारकिर्द जवळून आणि सजगपणे अनुभवणाऱ्या अजिंक्य यांनी उपजतच अभिनयाकडे असलेला कल आणि घरातला हा वारसा घेऊन चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले ते अर्धांगीया चित्रपटाद्वारे १९८४ मध्ये. त्यानंतर त्यांचे १९८५ साली वहिनीची मायाआणि १९८६ साली शाबास सूनबाईहे चित्रपट प्रदर्शित झाले, पण अजिंक्य देव यांचे नाव सर्वतोमुखी झाले ते १९८७ साली, रमेश देव यांची निर्मिती असलेल्या, राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या सर्जाया ऐतिहासिक पार्श्‍वभूमीच्या चित्रपटामुळे.

अजिंक्य यांनी सर्जाचित्रपटासाठी सर्जा दोर न बांधता गड चढतोहे दृश्य जमिनीपासून ३५०-४०० फुटांवर जेमतेम उभे राहता येईल अशा जागी उभे राहून, अंगावर सोसाट्याचा वारा झेलत, दगडांच्या कपारीला धरून ३-४ फूट वर चढण्याचे धाडस करून चित्रित करून दिले. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ज्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी आणि तमाशाप्रधान चित्रपटांची चलती होती, त्या काळात सर्जाच्या कथानकावर चित्रपट करणे. आणि तो चालणार नाही अशी शंका व्यक्त होत असतानाही रमेश देव यांनी केलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. ही भूमिका अजिंक्य यांच्या कारकिर्दीत मौलाचा दगड ठरली. या भूमिकेसाठी अजिंक्य यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य शासनाचे विशेष पारितोषिकही मिळाले.

माझं घर माझा संसारहा त्यानंतर प्रदर्शित झालेला अजिंक्य यांचा लोकप्रिय चित्रपट. नायिका होती मुग्धा चिटणीस. या चित्रपटातली दृष्ट लागण्याजोगे सारे’, ‘हसणार कधी, बोलणार कधीही गीतेही लोकप्रिय झाली. कशासाठी प्रेमासाठी?’, ‘माहेरची साडी’, ‘जसा बाप तशी पोरे’, ‘जिवलगा’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘कुंकू’, ‘चल गंमत करू’, ‘विश्वविनायक’, ‘पैंजण’, ‘लपंडाव’, ‘अवगत’, ‘एक क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके’, ‘रिंगा रिंगा’, ‘जेता’, ‘दुभंगहे अजिंक्य देव यांचे मराठीतले निवडक पण लक्षणीय चित्रपट. माहेरची साडीया भावुक-कौटुंबिक, कमालीच्या लोकप्रिय चित्रपटातली अलका कुबल यांच्या भावाची भूमिका असो किंवा त्याहून अगदी वेगळ्या अशा राजकीय पार्श्वभूमीवरच्या सरकारनामामधली सरकारी अधिकाऱ्याची भूमिका असो - अजिंक्य यांनी सर्वच भूमिका ताकदीने साकारल्या.

अजिंक्य यांची भूमिका असलेला वासुदेव बळवंत फडकेहा चित्रपट हे रमेश देव यांचे स्वप्न होते. क्रांतिकारकाचा जीवनपट उलगडून दाखवणारा हा मराठीतला पहिलाच ऐतिहासिक चित्रपट. हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला. त्यासाठी दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला. २०१० साली जेताया चित्रपटाद्वारे अजिंक्य दिग्दर्शक आणि पटकथाकारही बनले. निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी सांभाळली. एका वृद्धाचा यंत्रणेविरुद्धचा लढा यात केंद्रस्थानी आहे. नायकाची भूमिका रमेश देव यांनी साकारली. या चित्रपटाच्या माध्यमातून अजिंक्य यांना आईवडिलांना दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात २४ वर्षांनंतर या तिघांनी पुन्हा एकत्र काम केले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा तसेच महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारही मिळाला.

अजिंक्य देव यांनी हिंदी चित्रपटातही मोजक्या पण लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या. संसार’, ‘कच्ची कली’, ‘सोने पे सुहागा’, ‘प्यासी निगाहे’, ‘परवाने’, ‘फूल और अंगार’, ‘पांडव’, ‘छोटासा घर’, ‘आन : मेन अ‍ॅट वर्क’, ‘डेव्हीडहे त्यांचे हिंदी चित्रपट. याचबरोबर त्यांनी काही तेलगू चित्रपटात आणि द पिकॉक स्प्रिंगया इंग्रजी दूरदर्शन चित्रपटातही काम केले आहे. ९० पेक्षा अधिक चित्रपटात अभिनय करणाऱ्या अजिंक्य देव यांनी रेणुका शहाणे यांच्यासह केलेली रवी राय यांची सैलाबही हिंदी मालिका अतिशय गाजली. सैलाबनंतर अजिंक्य यांच्याकडे भूमिकांचा ओघ सुरू झाला. युनिट ९ही त्यांची गाजलेली मराठी मालिका. त्यांनी रेणुका शहाणे यांच्याबरोबर अंतरनावाची टेलिफिल्मही केली आहे. मालिकांमधल्या आणि चित्रपट क्षेत्रातल्या या कारकिर्दीबरोबरच अजिंक्य देव यांनी प्रभात एन्टरटेन्मेंटया दूरदर्शन वाहिनीचे संचालक म्हणूनही काही काळ काम केले. या वाहिनीच्या कामात अजिंक्य यांची पत्नी आरती यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता.

थोडं तुझं थोडं माझंहा अजिंक्य देव यांचा २०१३ मधील चित्रपट. २०१९मध्ये 'वॉरिअर क्वीन ऑफ झांसी' या इंग्रज चित्रपटात तात्या टोपे यांची भूमिका केली. तर, २०२०मध्ये 'तानाजी' या हिंदी चित्रपटात त्यांनी चंद्राजी पिसाळ ही भूमिका केली. अजिंक्य देव आणि देव कुटुंबीय यांनी विशेष मुलांसाठी मुंबईत सुरू केलेली अ‍ॅकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंटही शाळा त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देते.

- स्वाती प्रभुमिराशी

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].