Skip to main content
x

देव, रमेश नारायणसिंग

चित्रपटसृष्टीत सलग ६५ वर्षे सक्रिय असलेले, काळानुरूप वेगवेगळे प्रयोग करणारे आणि कला क्षेत्रातील सर्वच विभागांत यशस्वी कारकिर्द घडविणारे एकमेव कलावंत म्हणजे रमेश नारायणसिंग देव.

रमेश नारायणसिंग देव यांचे घराणे मूळचे राजस्थानातील जोधपूरचे. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या आजोबांना कोल्हापूरला बोलावून घेतले, तेव्हापासून हे कुटुंब त्याच शहरात स्थिरावले. रमेश देव यांचे शिक्षण कोल्हापूरमध्येच झाले. महाविद्यालयामध्ये असतानाच भालजी पेंढारकर, दिनकर पाटील अशा मान्यवरांशी रमेश देव यांचा परिचय होता. त्यांच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी जाणे, त्यांच्याशी गप्पा मारणे सुरू असायचे. त्यातूनच १९४७ साली हौसेखातर रमेश देव यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला. तो चित्रपट होता ‘वाल्मिकी’. त्यात पृथ्वीराज कपूर होते. ही अर्थातच छोटी भूमिका होती. त्यानंतरही रमेश देव छोट्यामोठ्या भूमिका करत राहिले. परंतु कलाकार म्हणून पूर्ण वेळ काम करण्याचा विचार त्यांनी केला नव्हता.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर रमेश देव यांनी पोलीस खात्यात नोकरी मिळवण्यासाठी परीक्षा दिली. त्यात त्यांची निवडही झाली. भरतीसाठी ते नाशिकला जाणार होते. त्या वेळी, लष्करात कॅप्टन असलेला त्यांचा एक भाऊ पुण्यात राहायला होता. रमेश देव त्याच्याकडे राहायला गेले होते. एकदा सहज रेसकोर्सवर गेले असताना तेथे प्रख्यात दिग्दर्शक राजा परांजपे यांच्याशी त्यांची भेट झाली. राजा परांजपे त्या वेळी अश्‍वशर्यतीमध्ये बरेच पैसे हरले होते. रमेश देव यांनी सहज म्हणून त्यांना एका घोड्यावर पैसे लावण्यास सुचवले, त्यावर पैसे लावल्यावर तो घोडा जिंकला. त्यातून राजा परांजपे यांना सहा-सात हजार रुपये मिळाले. त्यांनी खूश होऊन रमेश देवांना त्यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा केली. तेच रमेश देव यांचे खऱ्या अर्थाने पहिले व्यावसायिक काम. ‘आंधळा मागतो एक डोळा’ या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका गाजली. या चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला. त्यानंतर त्यांनी ‘रामराम पाव्हणं’, ‘पाटलाचा पोर’ अशा अनेक चित्रपटांतून कामे केली. भालजी पेंढारकर यांच्या ‘येरे माझ्या मागल्या’मध्ये त्यांनी मुख्य खलनायकही साकारला. अशोक ताटे दिग्दर्शित ‘मंगळसूत्र’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली आहे. मराठी चित्रपटातून यश मिळत असतानाच रमेश देव यांची सीमा यांच्याशी भेट झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मराठी चित्रपटातून यश मिळत असले, तरीही मराठी चित्रपटसृष्टी म्हणजे छोटी विहीर आहे, हे रमेश देव यांच्या लक्षात येऊ लागले होते. हिंदीत काम करणे हे खऱ्या अर्थाने समुद्रात पोहणे आहे आणि त्यातून देशपातळीवर ओळख मिळू शकते, हेही त्यांनी जाणले. त्यामुळे त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी हिंदी उच्चारांचा सराव, हिंदी चित्रपटांचा अभ्यासही केला. ‘आरती’ या राजश्री प्रॉडक्शनच्या पहिल्या चित्रपटामध्ये त्यांना छोटी भूमिका मिळाली. तो चित्रपट गाजला. त्यानंतर ‘मोहब्बत इसको कहते हैं’ या चित्रपटात त्यांना सहनायकाची भूमिका मिळाली. त्यानंतर ‘लव्ह अँड मर्डर’मधून त्यांना नायक होण्याची संधी मिळाली. परंतु दुर्दैवाने रमेश देव यांनी नायक म्हणून साकारलेले तिन्ही चित्रपट पडले, त्यामुळे नंतर खलनायकी ढंगाच्या भूमिका त्यांच्या वाट्याला येऊ लागल्या. त्या त्यांनी आनंदाने स्वीकारल्या.

दरम्यानच्या काळात रमेश देव यांनी ‘अजिंक्य थिएटर्स’ ही स्वत:ची नाट्यनिर्मिती संस्था काढून काही नाटकांची निर्मिती केली. ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘मवाली’, ‘कर्ता करविता’, ‘लाल बंगाली’, ‘अकुलिना’, ‘फोन नं. ३३३३३’ आदी नाटकांचे अनेक प्रयोग त्यांनी केले. राजा परांजपे यांच्याकडून रमेश देव यांना खूप शिकायला मिळाले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात राजा परांजपे यांच्यासारख्या निष्णात दिग्दर्शकाचे मार्गदर्शन मिळणे, ही रमेश देव यांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब होती.

मराठी कलाकाराने हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणे आणि तिथे जम बसवणे, ही त्या काळी खूप मोठी गोष्ट होती. रमेश देव यांनी जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर ते साध्य करून दाखवले. हृषीकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ या चित्रपटात त्यांनी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तेवढ्याच ताकदीने काम केले. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, दिलीपकुमार, आशा पारेख, हेमामालिनी, झीनत अमान अशा बॉलिवूडमधील सर्व लोकप्रिय कलाकारांसोबत त्यांनी काम केले.

नायक म्हणून हिंदीत यशस्वी होऊ न शकल्याने त्यांनी खलनायकी ढंगाच्या भूमिका स्वीकारल्या. मराठीत याच्या उलट झाले. खलनायकी भूमिकांमधून त्यांचा मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला होता, पण नंतर ते नायक म्हणून लोकप्रिय झाले. आपली प्रकृती आणि आवड ओळखून त्याला साजेशा भूमिका निवडणे आणि त्यात समरसून काम करणे यातच कलाकाराचे खरे कौशल्य असते. आपल्याला शहरी भूमिकाच शोभतील, हे त्यांनी ओळखले आणि तशा भूमिकांमध्ये ते रमले. त्या काळात तमाशापटांची लाट असतानाही त्यांनी ग्रामीणपटात किंवा तमाशापटांत अपवादानेच काम केले.

चित्रपट क्षेत्राशी संबंधित सर्व विभागात काम करण्याची आवड आणि इच्छाही रमेश देव यांना होती. त्यांनी स्वत:च्या निर्मिती संस्थेतर्फे ‘सर्जा’ चित्रपटाची निर्मिती करून मराठी चित्रपटसृष्टीला अजिंक्य देव हा नवा नायक दिला. ‘सर्जा’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘सेनानी साने गुरुजी’ या चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी रमेश देव यांना इराण, इराक आणि चीन या देशांतही पुरस्कार मिळाले. असा मान मिळवणारे ते पहिले मराठी दिग्दर्शक आहेत. ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके’, ‘गोष्ट लग्नानंतरची’, ‘जेता’ आदी चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली.

जागतिकीकरणाच्या प्रवाहात जाहिरात आणि विपणन क्षेत्राचे प्रस्थ वाढल्यानंतर त्यांनी स्वत:ची जाहिरात निर्मिती कंपनी स्थापन केली. त्यांचा मुलगा अभिनय देव आता या कंपनीचा कारभार सांभाळत आहे. या कंपनीला जाहिरात क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा फ्रान्सचा ‘गोल्डन लायन’ पुरस्कारही मिळाला. भारतात दूरदर्शनचे आगमन झाल्यानंतर हा छोटा पडदा पुढील काळात खूप मोठा होणार आहे, हेसुद्धा रमेश देव यांनी हेरले आणि त्यासाठी कार्यक्रमांची निर्मिती सुरू केली. पूर्वीच्या काळी पु.ल. देशपांडे पुणे आकाशवाणीचे प्रमुख असताना रमेश देव यांनी त्यांच्या हाताखालीही काही काळ काम केले होते.

संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीत सक्रिय असल्याचे आपले एकमेव उदाहरण असल्याबद्दल रमेश देव यांना सार्थ अभिमान आहे. जगदंबेची कृपा आणि लोकांचे अलोट प्रेम, यांना ते आजवरच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय देतात. एक्स्ट्रॉतील एक्स्ट्रॉ म्हणून चित्रपटातील कामाला सुरुवात करून मुख्य नायक किंवा खलनायक येथपर्यंतचा प्रवास त्यांनी मोठ्या जिद्दीने केला. कामाबद्दल निष्ठा, व्यायामाची आवड आणि निर्व्यसनीपणा यामुळेच नव्वदी पार केल्यानंतरही त्यांचं काम सुरूच राहिलं. मराठीतील सर्वोच्च व्ही. शांताराम पुरस्कार त्यांना मिळाला. सोलापूरच्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची उपस्थिती हे या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले.

रमेश देव यांना सामाजिक कार्याचीही पहिल्यापासून आवड होती . त्यासाठीच त्यांच्या प्रेरणेतून त्यांचा मुलगा अजिंक्य देव आणि सून आरती यांनी विशेष मुलांसाठी एक शाळाही मुंबईत सुरू केली. अशा मुलांना त्यांच्या हक्काचे शिक्षण मिळावे, त्यांच्या मनातील न्यूनगंड कमी व्हावा, यासाठी ही शाळा कार्यरत आहे. असे आणखी काही प्रकल्प राबवण्याचा रमेश देव यांचा मानस होता.

रमेश देव यांनी तीनशे हिंदी आणि सुमारे अडीचशे मराठी चित्रपटांत काम केले. ‘जॉनी एलएलबी’ या हिंदी आणि ‘चांदी’सारख्या काही चित्रपटात त्यांनी काम केले . प्रामाणिकपणे काम करणे तसेच जिद्दीने काम करणे हे आपल्या उत्साहाचे रहस्य असल्याचे ते सांगत. चित्रपटांचे विषय, स्वरूप यांच्यात झालेल्या बदलांचे ते मनापासून स्वागत करत. काळानुसार चित्रपट बदलणारच, हे त्यांचे ठाम मत होते.

- अभिजित पेंढारकर

देव, रमेश नारायणसिंग