Skip to main content
x

देव, शांताराम भालचंद्र

     शांताराम भालचंद्र देव यांचा जन्म तळेगाव, ढमढेरे जि. पुणे येथे झाला. वडील भालचंद्र हे श्रीमोरया गोसावी यांच्या घराण्यातील असून शांताराम हे तेराव्या पिढीतील. श्रीमोरया हे थोर गाणपत्य असून संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे समकालीन होते. आई त्रिवेणीबाई या फलटण येथील श्री ज्ञानेश्वरभक्त डॉ. गोविंद महाराज उपळेकर यांच्या एकुलत्या एक भगिनी. आई आणि वडील दोन्हीकडूनही धार्मिकतेचा आणि आध्यात्मिकतेचा समृद्ध वारसा त्यांना लाभला.

     वडिलांच्या पोलीस खात्यातील नोकरीमुळे शांतारामांचे प्राथमिक शाळेतील शिक्षण अनेक ठिकाणच्या शाळांतून झाले. वयाच्या सहाव्या वर्षी मातृसुखास पारखे झाल्यामुळे शांतारामाची देखभाल सातारा व पुणे येथील बहिणींनी केली. न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथून १९३९ मध्ये उत्तमरीत्या मॅट्रिक उत्तीर्ण झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण ब्रह्मे शिष्यवृत्ती आणि शिकवण्या यांच्यामुळे शक्य झाले. फर्गसन महाविद्यालयातील प्रा.आर.डी. वाडेकर यांचे ते आवडते विद्यार्थी होते. देवांवर त्यांचा बराच प्रभाव होता. प्राकृत वाङ्मय आणि जर्मन भाषा हे विषय घेऊन बी.ए. झाल्यावर पाली आणि अर्धमागधी या विषयांत ते १९४७ मध्ये मुंबई विद्यापीठाचे एम.ए. झाले.

     येथून पुढे डॉ. शांतारामांचे आयुष्य प्रसिद्ध डेक्कन महाविद्यालयाशी निगडित झाले ते अखेरपर्यंत. पीएच.डी.साठी ख्यातकीर्त पुरातत्त्वज्ञ डॉ.ह.धी. सांकलिया यांच्या सहवासात ते आले. त्यांच्या आयुष्याला आणि व्यक्तिमत्त्वाला योग्य असे वळण मिळाले. ‘अभिलेखांतून आणि वाङ्मयातून उलगडणारा जैन मुनीसंघाचा इतिहास’ या विषयात डॉ.देवांची पीएच.डी. होती. विशेष म्हणजे प्राकृत आणि जैन धर्म या विषयांचे तत्कालीन जगन्मान्य विद्वान डॉ.अल्सडॉर्फ आणि डॉ.उपाध्ये या परीक्षकांनी प्रबंधाची वाखाणणी तर केलीच, पण तो लगेच प्रकाशित करावा अशी शिफारसही केली. अहमदाबादेतील कस्तुरभाई लालभाई यांच्या आर्थिक मदतीने तो लगेच प्रकाशितही झाला.

     डॉ. सांकलिया यांच्यामुळे श्री. देव यांना डेक्कन महाविद्यालयात आधी संस्कृतकोश योजनेत काम करता आले. त्या वेळचे संचालक श्री. सुमंत कत्रे यांनी उत्खननात भाग घेण्याची संधीही श्री. देव यांना त्याच वेळी दिली. पुरातत्त्व खात्याचे डॉ.बी.जी. लाल शिशुपालगढ, ओडिशा येथे करीत असलेल्या उत्खननात डॉ. सांकलियांच्या प्रेरणेने देवांना भाग घेऊन उत्खननाचे तंत्र जाणून घेता आले. विशेष म्हणजे पुढे ५०-६० वर्षे भारतीय पुरातत्त्वाची सर्वतोपरी धुरा वाहणारी मंडळी त्यांना येथे भेटली. त्यांत सर्वश्री बाळकृष्ण थापर, रंगनाथ राव, गोपालाचारी, बॅनर्जी, सौंदरराजन यांचा समावेश होता. या सर्वांनी मिळून भारतीय पुरातत्त्वाची कीर्ती दिगंत केली. याच वेळी सर मार्टिमर व्हीलर या जागतिक कीर्तीच्या पुरातत्त्वज्ञाची ओळख झाली ती अखेरपर्यंत राहिली.

     डॉ.सांकलियांच्या पारखी नजरेत भरल्यामुळे त्यांनी श्री.देव यांना १९५५ मध्ये अध्यापनक्षेत्रात संधी दिली. श्री.देव यांच्याबद्दल ‘मोजक्या पण चांगल्या सवयी असलेली आणि अल्प गरजा असलेली व्यक्ती’ अशी नोंद डॉ.सांकलियांनी त्यांच्या आत्मचरित्रात केली आहे.

     येथून पुढे पुरातत्त्वाशी जडलेले नाते दृढ होत गेले. लांघनज (१९४९), उत्खनन, साबरमती खोरे, नाशिक-जोर्वे (१९५०-५१), नावडाटोली-महेश्वर (१९५२-५३; १९५७-५९), नेवासा (१९५४-५६; १९५९-६१), चांडोली (१९६१), आहार (१९६१-६२), सोनगाव (१९६५) आणि त्रिपुरी (१९६६) येथील उत्खननांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. देवांचे लिखाण हे आशयघन, नेटके, संदर्भासहित आणि सर्वसामान्यांनाही समजेल अशा सोप्या भाषेत असायचे. त्यामुळे वरील सर्व आणि अन्य ठिकाणच्या उत्खननांचे वृत्तान्त लिहिण्याचे काम त्यांनाच करावे लागले व ते त्यांनी चोखपणे पार पाडले. १९६३-१९६५ या काळात इंडिया एड मिशनने त्यांची नेमणूक प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या विषयांचे प्राध्यापक म्हणून काठमांडू येथील त्रिभुवन विद्यापीठात केली. तेथे त्यांनी पैसिया, बंजारही आणि काठमांडू येथे पुरातत्त्वीय उत्खननेही केली. १९६६ साली महामहोपाध्याय प्रा.वा.वि. मिराशी निवृत्त झाल्यावर त्या जागेवर डॉ. देवांची निवड झाली. त्यामुळे त्यांना नागपूर येथे जावे लागले. तेथेही नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातर्फे त्यांनी टाकळघाट-खापा (१९६७-१९६८), माहुरझरी (१९७८-१९७९), बोरगाव (१९८०-१९८१), खैरवाडा (१९८१-१९८२), रायपूर (१९८५), नयकुंड (१९८२) आणि पवनार (जि. वर्धा) या ठिकाणी बृहदाश्मयुगीन संस्कृती संबंधात उत्खनने केली. नागपूर विद्यापीठाला हे नवीनच होते. त्यामुळे ही उत्खनने गाजली आणि पुरातत्त्वाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचले. डेक्कन महाविद्यालयाच्याच परंपरेप्रमाणे या सर्व उत्खननांचे वृत्तान्तही लगेच प्रसिद्ध केले गेले.

     या शास्त्राच्या जाणकारांचे आणि अभ्यासकांचे लक्ष विदर्भाकडे वेधले गेले. विदर्भातल्या गाजलेल्या उत्खननांत पवनी (जि. भंडारा) येथील उत्खननाचा उल्लेख अनिवार्य आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि नागपूर विद्यापीठाचा पुरातत्त्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे उत्खनन झाले. येथील उत्खननात इसवीसनापूर्वीच्या शतकातल्या एका मोठ्या स्तूपाचे अवशेष प्राप्त झाले. शुंगकालीन शिल्पे उपलब्ध झाली. प्रसिद्ध सांची स्तूपापेक्षा हा स्तूप मोठ्या परिघाचा होता; इत्यादी. नागपुरात असतानाच मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या सहकार्याने डॉ. देव यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील भोकरधन येथेही उत्खनन केले. सातवाहन काळातील एक वसाहत येथे उघडकीस आली. अनेक मौल्यवान वस्तूंमध्ये एक हस्तिदंती स्त्री-प्रतिमाही मिळाली. पॉम्पी (इटली) येथे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील जी स्त्रीची प्रतिमा मिळाली होती, तिची ही जुळी बहीण शोभेल अशी होती.

     डॉ. देव आणि त्यांचे गुरू डॉ. सांकलिया यांचे नाते असे की  सांकलिया निवृत्त होण्याच्या सुमारास त्यांनी डॉ. देव यांना  प्राध्यापक म्हणून पुण्याला पुन्हा बोलावून घेतले आणि जगप्रसिद्ध डेक्कन महाविद्यालयाच्या संचालकपदी त्यांची निवड १९७८ मध्ये झाली आणि डॉ. देव हे डॉ. सांकलियांचे खर्‍या अर्थाने उत्तराधिकारी झाले.

     पुरातत्त्वाचा अभ्यास करायचा तर अनुषंगाने आवश्यक ठरणार्‍या अन्य शाखांचेही साहाय्य घ्यावे लागते, हे अनुभवाने देवांच्या लक्षात आले होतेच. त्यांनी मग रसायनशास्त्र, पुरावनस्पतिशास्त्र, पुराजीवशास्त्र, मानववंशशास्त्र यांचा शास्त्रदृष्ट्या उपयोग करून घेण्यासाठी प्रयोगशाळांची व्यवस्था केली आणि भारतातल्या विद्यापीठांत एकमेव ठरावा असा, प्रयोगशाळांनी सुसज्ज पुरातत्त्व विभाग विस्तारित केला. जोडीला इमारतीचाही विस्तार केला. देवांच्या अथक परिश्रमाने आपले असे वैशिष्ट्यपूर्ण स्थान डेक्कन महाविद्यालयाने प्राप्त केल्याचे पाहून १९८५ मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळाच्या संबंधीत समितीने या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिलाच पाहिजे अशी शिफारस केली. स्वत:च्या वैयक्तिक भल्यापेक्षा डेक्कन महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढली पाहिजे याकडेच त्यांनी अधिक लक्ष दिले. १९७३ मध्ये डॉ.सांकलियांच्या अमृत महोत्सवानिमित्त एक परिषद बोलावून भारत आणि भारताबाहेरील पुरातत्त्व पंडितांच्या साक्षीने त्यांनी सांकलियांचा सत्कार करून गुरु ऋण फेडले.

     डॉ. देवांनी भाषणासाठी, चर्चासत्रात भाग घेण्यासाठी जर्मनी, इंग्लंड,अमेरिका, स्वित्झर्लंड,रशिया इत्यादी देशांत प्रवास केला. १९९६ मध्ये जागतिक पुरातत्त्व परिषद साउथम्पटन (इंग्लंड) येथे भरली होती.  विभागीय अध्यक्ष म्हणून त्यांनी परिषदेत भाग घेतला, तर भारत-रशिया सहकार्य योजनेत  अक्शाबाद (रशिया) येथील परिसंवादात भाग घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाने त्यांची निवड केली होती. नेपाळ येथे तर इंडिया एड मिशनने त्रिभुवन विद्यापीठात भारतीय विद्या विभाग सुरू करण्यासाठी प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती केली होती (१९६३-१९६५). तेथे त्यांनी दोन ठिकाणी उत्खनने केली. त्यांच्या वृत्तान्तासह नेपाळमधील काष्ठशिल्प यावरील पुस्तकही प्रसिद्ध केले.

     ग्रंथसंपदेचा विचार करता डॉ. देवांनी लिहिलेल्या ‘पुरातत्त्व विद्या’ या ग्रंथाचा सर्वप्रथम विचार करावा लागेल. इतका साक्षेपी, ‘विस्तृत आणि मराठी’ पारिभाषिक शब्दांची निर्मिती करून या विषयावर लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ होय. अन्य ग्रंथांत महाराष्ट्रातील उत्खनने, जैन संप्रदाय व संस्कृती : काही विचार, महाराष्ट्र : एक पुरातत्त्वीय समालोचन या सर्व ग्रंथांना शासकीय वा अन्य पारितोषिके मिळाली. तर महाराष्ट्र व गोवा : शिलालेख व ताम्रपत्रांची वर्णनात्मक सूची. हे ग्रंथही त्यांच्या नावावर जमा आहेत. उत्खनन-वृत्तान्तावरील अनेक ग्रंथांशिवाय मार्कंण्डी टेम्पल्स, हिस्ट्री ऑफ जैन मोनॅरिजम फ्रॉम इन्स्क्रिीप्शन्स अ‍ॅन्ड लिटरेचर, जैन मोनॅस्टिक ज्युरिस्प्रुडल्स, प्रॉब्लेम ऑफ साउथ इंडिअन मेगॅलिथ्स, जैन कॅनॅनीकल लिटरेचर इत्यादी ग्रंथ प्रकाशित झाले.

    याशिवाय देशी-परदेशी जर्नल्समधून ७५ च्या वर विविध विषयांवरील लेख ही जमेची बाजू आहेच. ‘आपणासारखे करिती तत्काल’ या संत वचनानुसार व हेतूने सुमारे २० विद्यार्थ्यांना (त्यांतील बरेच जण या घडीला नामवंत) त्यांनी पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. डॉ. देवांनी बनारस, मद्रास, मुंबई, कर्नाटक, नागपूर, हैद्राबाद, बडोदा, म्हैसूर येथे तसेच परदेशात लेनीनग्रड, लंडन विद्यापीठ, लंडन येथे विशेष व्याख्याने दिली. त्यांना जे पुरस्कार मिळाले, त्याचीही नोंद येथे करावी लागेल. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने त्यांचा मानद विद्वान म्हणून सन्मान केला. विद्यापीठ अनुदान मंडळ व भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, राज्य पुरातत्त्व विभाग, राष्ट्रीय संग्रहालयाची पुरावस्तू निवड समिती आणि अनेक विद्यापीठांच्या समित्यांशी त्यांचा संबंध होता. निवृत्त झाल्यावर १९८५ मध्ये त्यांची नेमणूक भोगीलाल भारतीय विद्या संस्था, दिल्ली येथे संचालक म्हणून झाली. त्यांना भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेने दोन वेळा विद्वतवृत्ती दिली. विद्यापीठ अनुदान मंडळाने राष्ट्रीय व्याख्यातेपद दिले. विशेष म्हणजे दक्षिण भारत जैन सभेने मानपत्र, मानधन देऊन त्यांचा सत्कार केला. महाराष्ट्र शासनाने त्यांना जीवनभरासाठी मानद प्राध्यापक म्हणून गौरविले.

डॉ. गो.बं. देगलूरकर

देव, शांताराम भालचंद्र