देवधर, बाळकृष्ण रघुनाथ
बाळकृष्ण रघुनाथ देवधर हे पं. विष्णू दिगंबर पलुसकर आणि पं. विष्णू नारायण भातखंडे या दोन महान संगीतकारांच्या कार्याची दिशा कायम ठेवून, आधुनिक काळाचा रोख ओळखून परंपरा आणि नवता यांच्या संयोगाने विसाव्या शतकात संगीत क्षेत्रात भरीव पायाभूत योगदान केलेले, पं. विष्णू दिगंबरांचे एक आगळे शिष्य होत. देवधर म्युझिक स्कूलचे संस्थापक, संगीतकार, मार्गदर्शक गुरू, उत्तम संघटक, संपादक, लेखक व आवाज जोपासना शास्त्राचे भारतातील प्रथम अभ्यासक व प्रचारक अशा अनेकविध आघाड्यांवर देवधर अखंडित कार्यरत राहिले.
बाळकृष्ण रघुनाथ देवधर यांचा जन्म महाराष्ट्रातील मिरज या गावी वैदिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या बालपणीच माता-पित्यांचे छत्र हरविले. थोरले बंधू दत्तात्रेय शास्त्री संगीत शिक्षक होते व पौरोहित्यही करत, तसेच त्यांना भजन, कीर्तन करण्याचीही आवड होती. त्यांच्या सहवासात बाळकृष्णांना गाण्याची आवड निर्माण झाली.
देवधरांचे प्राथमिक शालेय शिक्षण मिरजेमध्येच झाले. संगीताचे प्रारंभिक शिक्षण मिरजेत, पं. नीळकंठबुवा जंगम यांच्याकडे सुरू झाले. वामनबुवा चाफेकर यांच्याकडेही ते काही काळ संगीत शिकत. त्यानंतर पं. विनायकराव पटवर्धन यांच्या गणेश संगीत विद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. या विद्यालयात विष्णू दिगंबर पलुसकर येत. देवधरांचे गाणे ऐकून व संगीत शिकण्याची आस्था पाहून विष्णू दिगंबरांनी त्यांना मुंबईला गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकण्याकरिता येण्यास सांगितले. शालेय शिक्षणात खंड पडणार नाही असे अभिवचन देवधरांच्या थोरल्या बंधूंना देऊन १९१८ साली पलुसकर देवधरांना आपल्याबरोबर मुंबईला घेऊन आले.
त्यांचे शिक्षण १९१८ ते १९२२ पर्यंत गांधर्व महाविद्यालयात झाले. पंडितजींच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे, विद्यालयातील अन्य वरिष्ठ विद्यार्थ्यांकडूनही त्यांचे संगीत शिक्षण झाले. संगीत शिक्षणाबरोबरच गिरगावच्या आर्यन एज्युकेशन सोसायटी या शाळेमध्ये त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांनी १९२३ मध्ये मुंबईतील विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेऊन नंतर पुढे १९३० मध्ये वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी.ए. ही पदवी त्यांनी संपादन केली. शैक्षणिक कालखंडात असहकार चळवळीतही त्यांचा सहभाग होता.
देवधरांनी १९२२ मध्ये गांधर्व महाविद्यालय सोडल्यावर संगीत शिक्षक म्हणून व्यवसायास सुरुवात केली. गांधर्व महाविद्यालयात शिकत असतानाच पंडितजींनी देवधरांची निवड पाश्चात्त्य संगीत शिक्षणाकरिता केली. ते १९२१ पासून प्रो. जिओवानी स्क्रिंजी या इटालियन संगीतकारांकडून पाश्चात्त्य संगीत व पिआनोवादनाचे धडे घेऊ लागले. जिओवानी स्क्रिंजी हे टाइम्स ऑफ इंडियामधून संगीतसमीक्षा-देखील करीत. देवधरांनी १९२५ पर्यंत पाश्चात्त्य संगीताचे शिक्षण घेतले. नंतर प्रो. स्क्रिंजी यांच्याच सूचनेनुसार त्यांनी हा अभ्यास थांबविला. मात्र स्क्रिंजींच्या सहवासातून देवधरांचा संगीतविषयक दृष्टिकोन उदार आणि व्यापक झाला.
प्रा. स्क्रिंजी देवधरांना पाश्चात्त्य कलाकारांचे ‘ऑपरा’ पाहण्यास घेऊन गेले. त्या ऑपरातील कलाकारांच्या गायनांनी ते भारावून गेले. त्या आवाजांची देवधरांनी स्तुती केल्यावर प्रो. स्क्रिंजी यांनी भ़ारतीय गवयांच्या आवाजांचे विश्लेषण केले. यातूनच देवधरांची आवाज जोपासनाशास्त्राबद्दलची जिज्ञासा बळावली. पुढे आवाज जोपासनाशास्त्र हा विषय देवधरांच्या सांगीतिक कारकिर्दीतील एक महत्त्वाचा ध्यास ठरला.
देवधरांनी १९२५ साली पं. विष्णू दिगंबरांच्या आज्ञेनुसार ‘स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ची स्थापना केली. सँडहर्स्ट रोडवरील गांधर्व महाविद्यालयाचा १९२४ साली लिलाव झाला. या दरम्यान देवधर पंडितजींना भेटायला गेले असताना, ‘‘तुम्ही पाच- सहा शिष्य कायमचे मुंबईत राहत असताना माझं संगीतप्रचाराचं कार्य पुढे नेण्याची धमक कुणातच नाही का?’’ असे पंडितजी बोलले. या पंडितजींच्या उद्गाराच्या परिणामातूनच ‘स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ची निर्मिती झाली.
देवधरांनी १ जुलै १९२५ रोजी हे विद्यालय सुरू केले. श्रीमती सरोजिनी नायडू यांंनी हे नाव सुचवले होंते. सुरुवातीला हे विद्यालय प्रार्थना समाजात होते. विद्यालयाची लोकप्रियता, व्याप व विद्यार्थी संख्या जसजशी वाढत गेली, तसतसे या विद्यालयाचे स्थलांतर होत गेले. ते १९३० साली बनाम लेनमधील नारायण चंदावरकर प्राथमिक शाळेत आले. नंतर बनाम लेनमधून वल्लभभाई पटेल रस्त्यावरील जागेत व तिथून १९४१ मध्ये मोदी चेंबर्स येथे विद्यालयाचे स्थलांतर झाले. या संस्थेची १९५८ साली नोंदणी झाली व ‘देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक’ असे तिचे नामकरण झाले.
हे विद्यालय म्हणजे गांधर्व महाविद्यालयाचीच आधुनिक आवृत्ती होती. ते एक सांस्कृतिक केंद्रच बनले होते. फक्त गायन-वादन शिकवण्याची ही संस्था नव्हती, तर गायन-वादनाची चर्चा, सप्रयोग व्याख्याने अशा अनेक सांगीतिक घटना तेथे होत. संगीतातील बुजुर्ग, कलावंतांना इथे आमंत्रित केले जाई व देवधरांच्या प्रेमामुळे तेही या विद्यालयात येत. शिकाऊ विद्यार्थ्यांनादेखील गायला प्रोत्साहन मिळे. समाजातील सुशिक्षित, प्रतिष्ठित व्यक्तीदेखील या विद्यालयाला भेट देत. सरोजिनी नायडू, बिपीनचंद्र पॉल, अॅनी बेझंट, मदन मोहन मालवीय अशा अनेकांनी या विद्यालयाला भेटी दिल्या. सर्वच घराण्यांचे उस्ताद, पंडित, गवय्ये-बजवय्ये या विद्यालयात आपली कला सादर करण्यास उत्सुक असत. रजबअली, अल्लाउद्दीन खाँसाहेब, पं. रविशंकर, सिंदेखाँ, बुंदू खाँ, विलायत हुसेन, खादिम हुसेन, अजमत हुसेन, मोगूबाई कुर्डीकर, मा. नवरंग, बापूराव पलुसकर अशा अनेकांनी या विद्यालयात येऊन आपले गायन-वादन सादर केले.
या विद्यालयातील महत्त्वाच्या घटना म्हणजे देवधरांनी पं. पलुसकर व पं. भातखंडे या दोन्ही विष्णूंना विद्यालयातील कार्यक्रमासाठी १९२९ साली एकाच व्यासपीठावर आणले. पलुसकर पुण्यतिथीनिमित्त १९४२ साली सतारवादक रविशंकर आणि सरोदवादक अली अकबर खाँ यांची महाराष्ट्रात प्रथमच एकत्र मैफल झाली.
भारतातील अत्यंत प्रतिभावान गायक पं. कुमार गंधर्वांच्या उपजत प्रतिभेला फुलवण्याकरिता देवधर मास्तर आणि देवधर स्कूलचे वातावरण नि:संशय कारणीभूत आहे. या विद्यालयातून अनेकांनी संगीताचे धडे घेतले. उद्योगपती मदनमोहन रुइया, राधाकृष्ण रुइया, लीलावती मुन्शी, सुमती ओक, शांता अमलाडी, कांचनमाला शिरोडकर अशा बर्याच व्यक्तींनी या विद्यालयातून संगीताचे धडे घेतले. मुंबईचे मेयर बोमन बेहराम हे देवधरांपाशी खास वर्गात गाणे शिकत होते. सुभाषचंद्र बोसांची त्यांच्याशी खास मैत्री झाली होती. पुढे त्यांची मैत्री घट्ट झाली व त्या दोघांत पत्रव्यवहारही झाला होता.
देवधरांनी भारतीय संगीताच्या प्रचारार्थ देशा-विदेशांत अनेक भेटी दिल्या. एप्रिल १९३३ मध्ये भारतीय प्रतिनिधी म्हणून इटलीमधील फ्लॉरेन्स येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय संगीत संमेलनात त्यांनी हजेरी लावली होती. याच वर्षात सप्टेंबरमध्ये फ्रान्स येथील स्ट्रॉसबर्ग येथील समकालीन संगीत संमेलनालादेखील ते हजर होते. याशिवाय युरोप व आशिया खंडांतील अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या. युनेस्कोने १९५५ मध्ये आयोजित केलेल्या मनिला येथील ‘साउथइस्ट एशिया’ संमेलनाकरिता संगीतशास्त्रज्ञ म्हणून भारत सरकारने त्यांना पाठवले होते. जपान, हाँगकाँग आणि बँकॉक येथे भारतीय संगीतातील तत्त्वांच्या प्रसारार्थ त्यांनी भेटी दिल्या. त्यांनी १९५८ साली विविध कलाक्षेत्रांतील पाच अन्य व्यक्तींसमवेत भारतीय संगीताचे प्रतिनिधी म्हणून रशिया, पोलंड, युगोस्लाव्हिया, झेकोस्लोव्हाकिया या देशांना भेटी दिल्या.
प्रो. स्क्रिंजींकडे शिकत असताना देवधरांना आवाज जोपासनाशास्त्राची आवड निर्माण झाली होंती व त्याचे महत्त्व त्यांना पटले होते. भारतीय कंठसंगीतात आवाज जोपासनाशास्त्र शिकण्याची नितांत गरज आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी या विषयावरील अनेक पुस्तके वाचून काढली. आवाजशास्त्राचे महत्त्व आणि देवधरांचा अभ्यास पाहून संगीत अकादमीने त्यांना अमेरिकेत जाऊन ‘व्हॉइस कल्चर’चा अभ्यास करण्याकरिता खास शिष्यवृत्ती प्रदान केली. ते १९५६ मध्ये वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी आवाजशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याकरिता अमेरिकेला गेले. डॉ. सिलास एच. एंगम या आवाजशास्त्रातील तज्ज्ञाकडे त्यांनी दोन ते तीन वर्षे विधिवत शिक्षण घेतले. अमेरिकेहून परत आल्यावर देवधरांनी या शास्त्राचा प्रचार/प्रसार करण्यास सुरुवात केली. देवधरांनी स्वत:वरच व नंतर इतरांवरही प्रयोग केले. सुरुवातीला अनेकांकडून हेटाळणीच झाली; पण पुढे या शास्त्राचे फायदे व सुपरिणाम दिसायला लागल्यानंतर अमीर खाँसारख्या गुणिजनांनीही देवधरांच्या अभ्यासाला मोकळेपणी दाद दिली. निर्मला गोगटे, अशोक रानडे, वामनराव देशपांडे इत्यादींनी त्यांच्याकडून आवाज जोपासनाशास्त्राचे धडे घेतले. ‘आवाज साधना शास्त्र’ नावाचे एक पुस्तकही त्यांनी लिहिले. आज आवाज जोपासनाशास्त्राचा जो प्रचार झाला आहे, त्याचे श्रेय देवधरांच्या प्रयत्नांना नि:संशय जाते.
अमेरिकेहून परत आल्यावर १९६१-१९६४ या काळात बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी संगीत आणि ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संगीत विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले, तर १९६४ ते १९६८ पर्यंत राजस्थान येथील वनस्थली विद्यापीठात संगीत विभागाचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. इंडियन म्यूझिकॉलॉजिकल सोसायटीच्या स्थापनेत १९७१ साली त्यांचा सहयोग होता. त्यांना अध्यक्ष म्हणूनही नेमण्यात आले होते. त्यांना १९६९ मध्ये लंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या आवाज चाचणी परीक्षेकरिता तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केले होते.
देवधरांनी १९२९ साली मुंबईत संगीत विद्यालय स्थापल्यानंतर वाद्यवादनात निपुण असलेल्या व्यावसायिकांना घेऊन काफी व सारंग या दोन रागांतील ध्वनिमुद्रिका ग्रमोफोन कंपनीकरिता दिल्या. या दोन ध्वनिमुद्रिका मूकपटाच्या प्रक्षेपणाच्या वेळी वाजवण्यात येत असत. ‘आलम आरा’ या चित्रपटाअगोदर १९३० मध्ये ‘नकली तानसेन’ हा बोलपट रिआल्टो थिएटरमध्ये लागला व या चित्रपटाचे संगीत बी.आर. देवधरांचे होते, अशी नोंद आहे. त्यामुळे भारतीय मूकपट व बोलपटांचेही ते पहिले संगीतकार ठरतात. कृष्णा आणि इंपीरिअल चित्रपट कंपन्यांच्या सांगण्यावरून प्रदर्शनासाठी विविध संगीत कार्यक्रम देवधरांनी चित्रित करून दिले. हे कार्यक्रम १९३१ साली निरनिराळ्या चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येत होते.
पं. देवधर १९३०-३१ नंतर कृष्णाटोन कंपनीत भरती झाले. त्यांनी १९३२ ते १९४३ या काळात जवळजवळ दहा चित्रपटांना संगीत दिले. काहींची नावे अशी : ‘हीर रांझा’ (१९३१), ‘शशी पुन्नू’, ‘शिकारी’ (१९३२), ‘पतितपावन वा अहिल्योद्धार’, ‘जहरे इश्क’ (१९३३), ‘मास्टरजी’ (१९४३) इत्यादी. देवधरांनी १९३५ साली स्वत:च ‘नीला’ या चित्रपटाची हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांत निर्मिती केलीहोती. त्यांनी संगीत दिलेल्या एकंदर ९० गीतांपैकी आज एकही उपलब्ध नाही. याशिवाय ‘नीला’ या मुख्य चित्रपटाआधी दाखविण्याकरिता त्यांनी दोन लघुपटांची निर्मिती केली होती. यात भारतीय वाद्यवृंदरचना, सरोद, सितारवादन, तबलातरंग, मेंडोलिनवादन असे कार्यक्रम होते. ‘नीला’ या चित्रपटामुळे मात्र त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे चित्रपटसृष्टीला त्यांनी कायमचा रामराम ठोकला.
प्रो. देवधरांनी १९४८ साली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ‘संगीत कला विहार’ या मासिकाचे संपादकत्व स्वीकारले व १९७३ पर्यंत, जवळजवळ २५ वर्षे त्यांनी ही जबाबदारी अनेक अडचणींना तोंड देऊन धैर्याने सांभाळली. या पंचवीस वर्षांतील ‘संगीत कला विहारा’चे अंक पाहता, ते सर्व मिळून संगीताचा ज्ञानकोशच होईल एवढे सांगीतिक साहित्य त्यांच्यात ठासून भरले आहे. देवधरांनी स्वत: तर लेखन केलेच, पण इतरांनाही लिहिते केले. इतिहास, सौंदर्यशास्त्र, ध्वनिशास्त्र, संगीतशास्त्र, दुर्मीळ ग्रंथांची भाषांतरे, अशा अनेक विषयांवरील लेखमालिकांचा यांत समावेश आहे. शिवाय स्वत: देवधरांनी अनेक ज्ञात-अज्ञात संगीतकार, गायक, वादक यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन वा माहिती मिळवून लेखन केले आहे. या लेखांतून देवधरांनी तत्कालीन संगीत जगतावर प्रकाश टाकला.
घराण्यांचा अभिमान, कडवेपणा, संगीत शिक्षणाकरिता सोसलेल्या हालअपेष्टा, गुरूवरील श्रद्धा, आर्थिक अडचणी, गायक-वादकांचे जगणे आणि गुणदोष, अशा अनेक घटनांनी हे लेख भरलेले आहेत. कितीतरी गायक-वादकांची चरित्रे/आत्मवृत्ते देवधरांनी साध्या, सरळ सहानुभूतीने अनलंकृत भाषेत वाचकांसमोर मांडली आहे. हे दस्तऐवजीकरणाचे फार मोठे कार्य देवधरांनी केले आहे. ‘थोर संगीतकार’ व ‘थोर संगीतकारांची परंपरा’ या दोन पुस्तकांतून हे लेख पुन:प्रकाशित झाले आहेत. याशिवाय पं. विष्णू दिगंबर पलुसकरांचे चरित्र, ‘राग बोध’ (एकूण पाच भाग) व ‘आवाज साधना शास्त्र’ ही पुस्तकेही त्यांनी लिहिली. देवधरांनी ‘बंदिश संग्रहका’चे एक अतिशय मौलिक कार्य केले. विविध घराण्यांच्या गायकांकडून त्यांनी प्रचलित-अप्रचलित रागांतील बंदिशींचा संग्रह केला. त्यांचा १९२४ सालच्या आसपास भातखंड्यांशी परिचय झाला व नंतर १९२६ ते १९३० या कालखंडात त्यांचा भातखंड्यांशी दृढ स्नेह झाला. भातखंड्यांच्या सूचनेनुसार व प्रेरित होऊनच १९३५ पासून त्यांनी बंदिशींचा संग्रह करण्यावर भर दिला. संग्रह करताना देवधरांनी आपली दृष्टी उदार ठेवली आणि कुठल्याही घराण्याबाबत दुराग्रह न ठेवता, वेगवेगळ्या उस्तादांशी मैत्री करून, काही वेळा स्वत:च्या खिशातील पैसाही खर्च करून, चातुर्याने त्यांनी अत्यंत दुर्मीळ व वेगवेगळ्या ढंगाच्या बंदिशींचा व अनवट रागांचा संग्रह केला. सिंदे खाँसारख्या फकीर व लहरी गायकांकडूनही ते बंदिशी मिळवण्यात यशस्वी झाले. स्वत: देवधरांनीही चंद्रकंस, बंगाल भैरव, भूपाल तोडी इ. रागांत बंदिशी बांधल्या आहेत.
देवधर हे मैफली-गायक नव्हते व तसे त्यांचे ध्येयही नव्हते. मात्र बंदिशींचे प्रस्तुतीकरण ते फार उत्तम प्रकारे करत. एकच बंदिश वेगवेगळ्या घराण्यांतून व गायकांकडून कशी गायली जाते याचे ते उत्तम सादरीकरण करत. त्या-त्या घराण्यातील स्वरलगाव, गायकी आणि बंदिशीतील सौंदर्यस्थळे यांतील भेद दाखवून त्यांचे ते उत्तम विश्लेषण करीत. बंदिश भरण्याचा त्यांचा एक स्वत:चाही ‘अंदाज’ होता. आकाशवाणीवरून ते गात असत, शिवाय प्रात्यक्षिकांसह रागसंबंधी विवरण करत असत. बंदिशीतील शब्दांचा अर्थ जाणून केलेला उच्चार, आवाजाचा सुरेल लगाव, एकंदर आकृतिबंधाचा कल्पक व नेमका आविष्कार असे त्यांच्या गायनाचे काहीसे प्रात्यक्षिकासारखे रूप असे.
उत्तम गुरू म्हणून देवधरांचे फार मोठे योगदान आहे. संगीत क्षेत्रातील अतिशय सर्जनशील व दैवी देणगी लाभलेल्या, पं. कुमारगंधर्व या प्रतिभासंपन्न गायकाच्या व्यक्तिमत्त्वासह त्यांस घडवण्यात देवधरांचा अमोल वाटा आहे. अवघ्या अकरा-बाराव्या वर्षीच प्रसिद्धीस पावलेल्या कुमारांच्यावर देवधरांंनी जवळ-जवळ बाराव्या वर्षापासून ते तेविसाव्या वर्षापर्यंतच्या काळात देवधरांचे आणि देवधर्स स्कूल ऑफ म्युझिकच्या निष्पक्ष व निर्भेळ वातावरणाचे जे संस्कार झाले व जी जाणीवपूर्वक तालीम लाभली, त्यांतूनच ‘कुमार गंधर्व’ नावाचे शिल्प घडले. याशिवाय श्याम गोगटे, चंद्रशेखर रेळे, शरद साठे, पंढरीनाथ कोल्हापुरे, वसुंधरा श्रीखंडे-कोमकली, कांचनमाला शिरोडकर, लक्ष्मी शंकर, पाश्चात्त्य संगीतकार वॉल्टर कॉफ्मन, चित्रपटसंगीत दिग्दर्शक वनराज भाटिया आदींनीही त्यांच्याकडून संगीताची तालीम घेतली. संगीत क्षेत्रातील एक विद्वान व्यक्तिमत्त्व, डॉ. अशोक दा. रानडे यांनी देवधरांकडून संगीतातील तालीम / बंदिशी तर घेतल्याच, शिवाय आवाज जोपासनाशास्त्राचे धडेही घेतले.
देवधरांना अनेक सन्मान मिळाले. संगीत नाटक अकादमीच्या सल्लागार समितीत ते एक सदस्य म्हणून होते. देवधरांच्या सांगीतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल १९६१ साली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे ‘संगीत महामहोपाध्याय’ ही पदवी त्यांना देण्यात आली. त्यांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप (१९६४), भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार (१९७५), मध्यप्रदेश सरकारचा ‘तानसेन’ पुरस्कार (१९८३) असे विविध पुरस्कार मिळाले. त्यांच्या ‘थोर संगीतकार’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक मिळाले.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या मिरज येथील कार्यालयात त्यांचे ध्वनिमुद्रण संग्रहित केले आहे, तसेच ‘संवाद फाउण्डेशन’नेही देवधरांच्या गायनाचे ध्वनिमुद्रण संग्रहित केले आहे. संगीत नाटक अकादमीमध्येही देवधरांनी काही अप्रचलित रागांचे ध्वनिमुद्रण दिले आहे. ते १९३० साली ‘बनाओ बतिया’ (भैरवी) व ‘सावन आयो आज’ (सावन) व १९३७ साली ओडियनच्या एका ध्वनिमुद्रिकेत ‘सजसज आवत’ (सिंधूरा) व ‘कोयलिया बोले’ (हिंडोल बहार) हे राग गायले होते.
देवधरांनी संगीत क्षेत्रात एखाद्या मिशनरीसारखे काम केले. कुमारांच्या सांगीतिक जडणघडणीत त्यांचा वाटा होताच; पण बडे गुलामअली खाँ, उ. बिस्मिल्ला खाँ, पं. रविशंकर यांचा परिचय महाराष्ट्राला करून देण्यातही त्यांचा पुढाकार होता. संगीत क्षेत्रात बहुविध कार्य करणार्या देवधरांचे वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मुंबईत निधन झाले.