Skip to main content
x

देवी, गणेश नारायणदास

     ‘‘प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात इतका विपुल भाषाविचार असतानाही आपल्या आजच्या भाषाशास्त्रज्ञांना त्याचा उपयोग कसा करायचा हे समजत का नाही? शिवाय भाषाशास्त्र केवळ अठराव्या शतकात युरोपमध्ये निर्माण झाले, असे ते का मानतात?’’ (‘वानप्रस्थ’ २००६, पृ. ३०)

     डॉ. गणेश देवी यांना पडणारा हा प्रश्न त्यांच्यातील भाषा अभ्यासकाची भूमिका प्रकाशात आणतो. ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ हा बृहद्प्रकल्प पूर्ण करून ७८० भारतीय भाषांचा माहितीपूर्ण खजिना सादर करण्याचे त्यांचे कार्य जागतिक पातळीवरही अजोड ठरले आहे.

     गणेश देवी यांचा जन्म भोर (जि. पुणे) येथे झाला. प्रतिभादेवी आणि नारायणदास हे त्यांचे आईवडील. भोर येथे शालेय शिक्षण घेतल्यावर ते सांगलीला गेले. तेथे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण व पीएच.डी. पूर्ण केले. गुजरात राज्यातील बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठ हे त्यांचे कार्यक्षेत्र राहिले. १९८० ते १९९६ या कालावधीमध्ये ते तेथे इंग्रजीचे प्राध्यापक व विभागप्रमुख होते. इंग्लंडमधील लीड्स आणि अमेरिकेतील येल विद्यापीठात त्यांनी काही काळ अध्ययन-अध्यापन केले. डॉ. देवी यांच्या ‘आफ्टर अ‍ॅम्नेशिया’ या इंग्रजी पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी इंग्रजी, गुजराती आणि मराठी या भाषांमध्ये पुस्तके लिहिली असून संपादनाचे कामही केले आहे. ‘इन अनदर टंग’, ‘पेंटेड वडर्सः लिटरेचर ऑफ आदिवासीज अँड डिनोटिफाईड ट्राईब्ज’, ‘इंडियन लिटररी क्रिटिसिझम  थिअरी अँड इंटरप्रिटेशन’, ‘ए नोमॅड कॉल्ड थीफ’, ‘द जी. एन. देवी रिडर’, ‘ऑफ मेनी हीरोज’ ही इंगजी पुस्तके, ‘आदिवासी जाने छे’, ‘विकास विचार’ ही गुजराती पुस्तके आणि ‘वानप्रस्थ’, ‘साठ वर्षांची गोष्ट’ ही मराठी पुस्तके त्यांच्यातील चिंतनशील लेखकाचे दर्शन घडवतात.

     डॉ. देवी यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी उत्तम अकादमिक स्थितीमध्ये नोकरीकडे पाठ फिरवली आणि आदिवासी भाषा संस्कृतीच्या जपणुकीसाठी स्वतःला झोकून दिले. त्यांनी तेजगढ येथे आदिवासींसाठी शांतिनिकेतन स्थापन करण्याचा ध्यास घेतला. आदिवासींसाठी त्यांनी ‘आदिवासी अकादमी’, ‘भाषा संशोधन प्रकाशन केंद्र’, ‘ग्रामविकास केंद्र’, ‘ढोल’ या नियतकालिकाची निर्मिती अशा कामांची उभारणी केली. अलक्षित अशा भाषा समूहांविषयीची सामाजिक उत्तरदायित्वाची भावना त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यातून त्यांनी २००९ मध्ये भारतीय भाषांच्या लोकसर्वेक्षणाचा प्रकल्प हाती घेतला. ८५ संस्थांच्या मदतीने अनेक शास्त्रज्ञ आणि स्वयंसेवक यांच्या सहभागातून ४ वर्षे चाललेल्या या प्रकल्पाचे डॉ. देवी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने धुरीणत्व स्वीकारले. त्यासाठी त्यांनी २०१२ मध्ये  व २०१३ मध्ये भाषा परिषदांचे आयोजन केले. त्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भाषा तज्ज्ञांचा समावेश होता. सामायिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी हे अवघड काम पूर्ण केले. त्यातून ७८० भारतीय भाषांची ३५००० पृष्ठे भरतील इतकी (अनेक खंडात्मक) माहिती सादर झाली आहे. (महाराष्ट्रातील भाषांच्या सर्वेक्षणाचा खंड अरुण जाखडे, पद्मगंधा प्रकाशन यांनी संपादित केला आहे.) समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आदींसाठीही ही माहिती उपयुक्त ठरेल. लिपी नसलेल्या अनेक भाषा बोलणार्‍या समूहांचे आवाज या प्रकल्पामुळे मुख्य प्रवाहापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यांनी पहाडी भाषेच्या आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी हिमालयात ‘हिमलोक’ ही संस्थादेखील स्थापन केली आहे.

     ‘वानप्रस्थ’ या पुस्तकातून त्यांच्यामधील तत्त्वज्ञ वृत्तीच्या कविमनाची आणि कृतिशील विचारवंताची ओळख पटते. गुजरात येथील दंगलीत आदिवासींचे समुपदेशन करतानाची त्यांची तळमळ त्यांच्यावरील म. गांधींचे शांतता आणि अहिंसा या मूल्यांचे संस्कार दर्शवणारी आहे. परंपरा आणि आधुनिकता या द्वंद्वाकडे पाहण्याची दृष्टी पोथीनिष्ठ नाही. चौकटीबाहेर जाऊन विचार करणे, उदात्त स्वप्न पाहणे आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी झटणे, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. बिन राजकीय कृतिप्रवणता आणि बिन आध्यात्मिक अपरिग्रह हा मिलाफ त्यामुळेच त्यांच्या जीवनात दिसतो. ‘आफ्टर अ‍ॅम्नेशिया’ या त्यांच्या इंग्रजी ग्रंथाचे उपशीर्षक आहे - ‘भारतीय साहित्यसमीक्षेची परंपरा आणि तिच्यातील परिवर्तन’. हा त्यांचा ग्रंथ देशीवादाचा एक अधिकृत दस्तऐवज मानला जातो. (डॉ. म. सु. पाटील यांनी हा ग्रंथ मराठीत अनुवादित केला आहे.)

     डॉ. देवी यांना लेखनासाठी अनेक पुरस्कार व सामाजिक कार्यासाठी अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. ‘वानप्रस्थ’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र फाउंडेशन आदी संस्थांचे सहा पुरस्कार मिळाले आहेत. ‘आफ्टर अ‍ॅम्नेशिया’ला १९९३ चा केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ हे त्यांचे काम स्वातंत्र्योत्तर कालखंडातील पहिले सर्वेक्षण ठरले. त्याबद्दल केंद्र सरकारने २०१४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब दिला आहे. युनेस्को, स्पेन या संस्थेने ‘लिंग्वापॅक्स’ हा जागतिक पातळीवरचा सन्मान त्यांना दिला आहे. भाषेच्या माध्यमातून शांती आणि सामंजस्य घडवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना मिळालेली ही सर्वोच्च पावती आहे. तीस राष्ट्रांतील अनेक संस्थांनी त्यांना निमंत्रित केले आहे. सार्क रायटर्स फाउंडेशन अ‍ॅवॉर्ड, गुन्थर सोन्थायमर अ‍ॅवॉर्ड, येल विद्यापीठाची फुलब्राइट फेलोशिप आणि प्रिन्स कलाऊज अ‍ॅवॉर्ड असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. आजही आदिवासी अकादमीच्या माध्यमातून ते आदिवासी विकास कार्याबरोबर शिक्षणविषयक नवनव्या उपक्रमांसाठी क्रियाशील आहेत.

     — डॉ. नीलिमा गुंडी

देवी, गणेश नारायणदास