Skip to main content
x

देवकुळे, अनंत गणेश

               ग्रामविकास आणि त्यातून स्वयंपूर्णता यासाठी मूलतः शेतीचाच आधार घेतला पाहिजे, असे मानून अनंत गणेश देवकुळे यांनी आपले कार्य केले. शेतीकामाची गोडी ही त्यांच्या आजोळची देणगी होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कृषी विज्ञानाचेच. त्यांनी संघकार्यासाठी खेडोपाडी हिंडताना शेतीचे पारंपरिक ज्ञानही मिळवले. शेतीज्ञान, तंत्रज्ञान आणि साधने याबद्दलच्या त्यांच्या अभ्यासातून त्यांनी त्यातील त्रुटी ओळखल्या आणि स्वतः प्रयोग करून उपाययोजना सुचवल्या. महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या डॉ. गो.बा. देवडीकर यांच्या तेल्यामाड लागवडीच्या प्रकल्पांमध्ये ते सहभागी होते. त्यांनी कंद भाज्यांवर विशेष प्रयोग केले. पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी अनंत देवकुळे यांनी खूप परिश्रम घेतले. पपई, कंदमुळे, विशेषतः रताळ्यांच्या जाती, उपजाती, हा त्यांचा एम.एस्सी.साठी संशोधनाचा विषय होता. तसेच औषधी वनस्पती लागवडीतही त्यांना रस होता. अनेक विषयांत त्यांचे प्रयोग चालू असायचे. प्रख्यात वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. वा.द. वर्तक यांच्या ‘देवराया’ या अभ्यासविषयात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

              शेतीविषयक लेखन हा देवकुळे यांच्या आवडीचा व तळमळीचा विषय होता. त्यांनी ‘आपली शेती’ हे मासिक सुरू केले. ‘जी. अनन्तन’ या टोपणनावाने त्यांनी ते ३८ वर्षे चालवले. त्याचा पहिला ३२ पृष्ठांचा अंक जुलै १९४७मध्ये प्रसिद्ध झाला. स्वतःच्या शेती प्रयोगांची अनुभवपूर्ण माहिती, बाहेरच्या जगातील कृषी संशोधन व कृषी पद्धती, पिके, कृषी व्यवस्थापन, इत्यादी बहुआयामी मजकूर मासिकात असे. कृषी संशोधनासाठी त्यांनी चित्रशाळेचे वासुकाका जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावे एक कृषी संशोधन संस्थाही स्थापन केली. त्यांनी १९४७मध्ये सुरू केलेल्या ‘आपली शेती’चा १९८५मधील गुढीपाडव्याचा अंक शेवटचा ठरला.  बटाटा, भुईमूग, शेळ्यांची पैदास, कोंबड्यांची पैदास, मेंढी व लोकर, मध आणि मधमाशापालनविषयक ‘जादूची पेटी’, ‘रेशीम पैदास’ अशी संपन्न ग्रंथसंपदा आहे. त्यांनी रेशीमनिर्मिती व मधमाशापालन यावर अनेक प्रयोग केले. ते या दोन्ही व्यवसायांच्या महाराष्ट्रातील पायाभरणीसाठी उपयोगी ठरले.

- डॉ. कमलाकर क्षीरसागर

देवकुळे, अनंत गणेश