Skip to main content
x

देवरे, प्रभाकर अनंत

       शुवैद्यकीय किंवा पशु-संवर्धन क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने पाच दशके सातत्याने तळपत राहिलेल्या प्रभाकर अनंत देवरे या सामान्यातील असामान्य पशुवैद्याचा जन्म जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या गावी झाला, परंतु त्यांची कर्मभूमी पुणे व महाराष्ट्र होती. कुशाग्र बुद्धिमत्ता, मानवतावादी दृष्टिकोन व तीव्र निरीक्षण क्षमता ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. ‘गवताच्या एका पात्याच्या जागी दोन  पाती उगवू शकणाराच माझ्या मते श्रेष्ठ भूमिपुत्र होय,’ असे जोनाथन स्विफ्ट यांचे म्हणणे डॉ. देवरेंना तंतोतंत लागू पडते. त्यांचा १९७०नंतरच्या तीन दशकांत महाराष्ट्राच्या धवलक्रांतीमध्ये महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी ‘दै.सकाळ’ या वर्तमानपत्रात व ‘बळीराजा’, ‘श्‍वेतक्रांती’ या मासिकांतून पशु-संवर्धनविषयक लेखमाला सोप्या व साध्या भाषेत लिहिली. त्यांनी सर्व पशुपालकांना व शेतकऱ्यांना समजेल अशा मराठी भाषेत शास्त्रीय विषयावर अनेक लेख लिहून शेतकरी वर्गाचे प्रबोधन केले.

        डॉ.देवरे यांनी पशु-संवर्धन व पशु-वैद्यकीयशास्त्रावर  अनेक पुस्तके लिहिली; त्यापैकी ‘संकरित गाय नवसाक्षरांसाठी’ या पुस्तकाला केंद्र सरकारचे पारितोषिक मिळाले, तर ‘गोपालन-शेतकऱ्यांशी ’ या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट शास्त्रीय पुस्तक’ म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच त्यांचा पुणे महानगरपालिकेकडून गौरव झाला व इंडियन सोसायटी फॉर व्हेटरनरी सर्जन्स या देशव्यापी संघटनेकडून त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. त्यांच्या कर्मभूमीतच २००६मध्ये ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, या राज्यव्यापी संस्थेचा पहिला जीवनगौरव पुरस्कार डॉ.देवरे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

        डॉ.देवरे यांनी महाराष्ट्र शासनाचा पशु-संवर्धन विभाग, भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान, व्यंकटेश्‍वरा हॅचरीज, श्रीरामपूरस्थित महाराष्ट्र पशु-संवर्धन संघटना या संस्थांच्या माध्यमातून असंख्य शेतकरी, दुग्धोत्पादक, पशुपालक व महिलांना पशु-संवर्धनाच्या प्रगत पद्धती, पशू संशोधनाचे अद्ययावत तंत्रज्ञान व दुग्ध व्यवसायाचे अर्थशास्त्र यांवर प्रशिक्षण कार्यक्रम, मेळावे, सभा, व्याख्याने घेऊन मार्गदर्शन केले. कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने आजारी असताना प्रशिक्षणासाठी  सहभाग व ज्ञान देण्याची त्यांची तळमळ उल्लेखनीय होती.

        डॉ.प्रभाकर देवरे हे इंडियन सोसायटी फॉर व्हेटरनरी सर्जन्स या संघटनेचे, तसेच ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र- पुणे या संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र पशु-संवर्धक संघटना, श्रीरामपूर या संस्थेच्या कार्यकारिणीचे ते एक अभ्यासू व सक्रिय सदस्य होते. त्यांनी वेंकटेश्‍वर हॅचरीजमध्ये असताना पहिल्या आंतरराष्ट्रीय कुक्ुकट परिषदेकरता अनेक लेखांचे तांत्रिक परीक्षण केले. ‘असे आम्ही पशुवैद्य’ हे डॉ.प्रभाकर देवरे यांचे शेवटचे पुस्तक होय. हे पुस्तक म्हणजे डॉ.देवरे यांनी समस्त पशुवैद्यांच्या जीवनावरील वास्तवपूर्ण केलेले लेखन होय.

        डॉ.देवरे केवळ शेतकरी व पशुपालकांचेच प्रबोधन करून थांबले नाहीत, तर त्यांनी विविध शाळांमधील मुलांनासुद्धा पशु-संवर्धनाचे धडे दिले. आजन्म समाजहित ध्यानात ठेवून जनप्रबोधनासाठी ते सतत कार्यरत राहिले.

- डॉ. नागोराव विश्‍वनाथ तांदळे

देवरे, प्रभाकर अनंत