Skip to main content
x

देवतारे, भास्कर

भास्कर देवतारे यांनी १९७५ मध्ये अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठामधून कृषी विषयातील एम.एस्सी. ही पदवी संपादन केली. त्यानंतर १९७६ ते १९८६ या दरम्यान ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्व विभागात संशोधन साहाय्यक या पदावर कार्यरत होते. तेथेच १९८६पासून पुरावनस्पति विज्ञान या विषयाचे व्याख्याता म्हणून १९८६पासून काम पाहू लागले. ते पुरातत्त्व विभागाचे प्रमुख व प्राध्यापक म्हणून संशोधन व अध्यापनाचे कार्य पूर्ण करून २०१३मध्ये सेवेतून निवृत्त झाले. तथापि पुरामृदरसायन विज्ञान, पुरावनस्पति विज्ञान, पुरापराग विज्ञान व पुरापर्यावरण या विषयांमध्ये त्यांचे संशोधन सुरू आहे.

भास्कर देवतारे यांनी १९८१मध्ये पुरातत्त्वविद्या या विषयात प्रा. रामचंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. प्राप्त केली. अनेक पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये व संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग होता.

प्राचीन वसाहतींच्या टेकड्यांचा रासायनिक अभ्यासहा विद्यापीठ अनुदान आयोगाचा व राजस्थानातील पुरापराग व त्या अनुषंगाने तत्कालीन हवामानाचा अभ्यासहा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प या दोन्हीमध्ये त्यांच्या संशोधनाचा मोठा सहभाग होता. पॅरिसची इन्स्टिट्यूट ही पॉलिओन्टॉलॉजी व मार्सेलीची लॅबोरेटरी डी जिऑलॉजी अॅण्ड क्वाटर्नरी या पुरातत्त्वविज्ञानातील महत्त्वाच्या प्रयोगशाळांना त्यांनी १९९३ मध्ये भेट दिली आणि तेथील संशोधनांत ते सहभागी झाले.

देवतारे यांनी सन २०००मध्ये विदर्भात पुरातत्त्वीय सर्वेक्षणाला व उत्खननांना प्रारंभ केला. ते व शीला मिश्रा यांनी मिळून सन २००१मध्ये अमरावती जिल्ह्यात असलेल्या कौडिण्यपूर या ठिकाणी उत्खनन केले. या पुरातत्त्वीय स्थळावर त्यांना तांदळाचे अवशेष मिळाले, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. यानंतर अगोदर पद्धतशीर सर्वेक्षण करून २००२ या वर्षी देवतारे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा या पुरातत्त्वीय स्थळाचे उत्खनन केले. पूर्णा नदीच्या खोर्यातील या स्थळामध्ये त्यांना प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील वसाहतीचे अवशेष मिळाले. विदर्भातील अन्नधान्याच्या प्राचीन लागवडीच्या अधिक संशोधनासाठी त्यांनी २००३ ते २००७ अशी सलग पाच वर्षे बुलढाणा जिल्ह्यातील भोन या पुरातत्त्वीय स्थळाचे उत्खनन केले. या ठिकाणी त्यांना प्राचीन वसाहतीबरोबरच एका स्तूपाचे अवशेष मिळाले. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्राचीन कालखंडातील विटांनी व्यवस्थित बांधलेल्या जलवाहिनीच्या अथवा सांडपाण्याच्या नाल्याच्या बांधकामाचा महत्त्वाचा पुरावा मिळाला. विदर्भातील प्राचीन पर्यावरण व पिके या संबंधातील अभ्यासाचा पुढचा टप्पा म्हणून देवतारे यांनी  २००७ ते २००९ या काळात अमरावती जिल्ह्यात खोलापूर या पुरातत्त्वीय स्थळाचे उत्खनन केले.

देवतारे यांचे संशोधनावर आधारित पाच पुस्तके व ४५ शोधनिबंध विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांनी पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवा काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक चर्चासत्रांमध्ये कृतिशील सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत.

- डॉ. प्रमोद जोगळेकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].