Skip to main content
x

दीक्षित, जिवाजी भिकाजी

              धार्मिक व पौराणिक विषयां-वरील सात्त्विक, भावपूर्ण व पवित्र वातावरण निर्माण करणाऱ्या आणि साधू, संत व महात्म्यांच्या चित्रांसाठी दीक्षित प्रसिद्ध होते. धार्मिक चित्रांतील देवदेवता असोत की संत महात्मे किंवा सामान्यजन, दीक्षित आपल्या सूक्ष्म अवलोकनाद्वारे आणि परिश्रमपूर्वक मिळविलेल्या आरेखनावरील प्रभुत्वातून असे प्रसंग अत्यंत प्रभावीपणे साकार करीत. म्हणूनच त्यांच्या इलस्ट्रेशन्समधून व तैलरंगातील चित्रांमधून आध्यात्मिक वातावरण व मांगल्याचा अनुभव येतो. त्यांचे व्यक्तिमत्त्वही सात्त्विक, आध्यात्मिक व ईश्‍वरपूजन आणि भजनात रंगणारे होते. याचे प्रत्यंतर त्यांच्या चित्रांमधून येते.

              जिवाजी भिकाजी दीक्षित यांचा जन्म सांगली येथे झाला. त्यांच्या आईचे नाव मनोरमा होते. त्यांचे शालेय शिक्षणही सांगलीतच झाले. वडील पेशाने वकील होते व आपल्या मुलानेही वकिली करावी ही त्यांची इच्छा होती. परंतु जिवाजीला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यामुळे शालेय शिक्षणानंतर त्यांनी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला व १९२८ ते १९३२ या काळात तेथील शिक्षणक्रम उत्तम प्रकारे पूर्ण केला. चित्रकार ज.द. गोंधळेकर, गोपाळ देऊसकर हे पुढील काळात गाजलेले चित्रकार व सांगलीचे जांभळीकर हे त्यांचे जे.जे.तील वर्गमित्र होते.

              जे.जे.मधील कलाशिक्षणात दीक्षितांनी निसर्गचित्रण व व्यक्तिचित्रण या विषयांत उत्तम प्रावीण्य संपादन केले. या दरम्यान त्यांचा विवाह सोलापूरच्या मालती बडे यांच्याशी झाला. शिक्षण संपल्यानंतर प्रापंचिक अडचणींमुळे त्यांना अर्थार्जन करणे भाग होते व केवळ चित्रे काढून जगणे कठीण असल्यामुळे त्यांनी पुण्याच्या ‘प्रभात फिल्म कंपनी’त कलादिग्दर्शक एस. फत्तेलाल यांच्या मार्गदर्शनाखाली १९३४ ते १९३९ या काळात नोकरी केली. त्यानंतर ‘सरस्वती सिनेटोन’ (१९३९ ते १९४१) व ‘नवयुग फिल्म कंपनी’तील कलाविभागात १९४१ ते १९४७ या काळात ते कार्यरत होते.

              चित्रपटांच्या सेटसाठी आवश्यक असलेल्या कामासोबतच चित्रपटाच्या जाहिरातींसाठी आवश्यक असलेली पोस्टर्स व मोठ्या आकाराचे बॅनर्सही त्यांच्या नेतृत्वाखाली तयार होत. प्रभात फिल्म कंपनीच्या ‘अमरज्योती, ‘कुंकू’, ‘गोपालकृष्ण’, ‘माणूस’ या चित्रपटांसाठी त्यांनी केलेली कामे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर गाजली.

              यानंतरच्या काळात मात्र ते चित्रपटातील काम सोडून प्रकाशन व्यवसायाशी संबंधित अशा कामांकडे वळले. धार्मिक पुस्तके, पोथ्या, नियतकालिके, मासिके, विद्यार्थ्यांसाठी क्रमिक पुस्तके यांतील इलस्ट्रेशन्स व मुखपृष्ठे काढण्याचे काम ते करू लागले. विद्यार्थिदशेत व त्यानंतरही त्यांनी रेखाटने व निसर्गचित्रे रंगविण्याचा सराव ठेवलाच होता. सूक्ष्म अवलोकन, रेखाटनातील प्रमाणबद्धता, वर्णित प्रसंगातील नाट्य व त्या सोबत भावदर्शन करत त्यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली. शिवाय ते करीत असलेल्या कामांचे स्वरूप धार्मिक स्वरूपाच्या प्रकाशनांचे असल्यामुळे, त्यातील  पावित्र्य व मांगल्यही ते अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करीत. या कामी त्यांची स्वतःची धार्मिक व आध्यात्मिक वृत्ती कारणीभूत ठरली असावी. अशा कामातून ही वृत्ती वाढीस लागली व  त्यांच्याकडे याच प्रकारची कामे येऊ लागली. कलावंत म्हणून हे योग्य नाही हे जाणवत असूनही दीक्षितांनी आयुष्यभर याच मार्गाचा अवलंब केला.

              त्यांनी १९४९ च्या दरम्यान य.गो. जोशी यांच्या ‘प्रसाद’ या मासिकाचे काम करण्यास सुरुवात केली व पुढील अनेक वर्षे ‘प्रसाद’ मासिक व त्यातील जि.भि. दीक्षितांची सात्त्विक चित्रे हे समीकरण कायम राहिले. त्यांची ही चित्रे अचूक भावदर्शन करणारी व बोलकी असत. तत्कालीन ग्रंथमुद्रण व निर्मितीच्या मर्यादा लक्षात घेऊन दीक्षित यांनी रेषा व जरूर  पडल्यास सूक्ष्म बिंदूंचा (स्टिप्लिंग तंत्राचा) वापर करून इलस्ट्रेशनची अनुरूप शैली विकसित केली होती. हीच चित्रे त्यांनी राजा रविवर्मा किंवा मुल्लर यांच्याप्रमाणे जर मोठ्या आकारात व इतर माध्यमांत केली असती, तर त्यांच्या चित्रांचे परिमाण बदलले असते आणि एक वेगळा कलात्मक दर्जा त्यांच्या चित्रांना मिळाला असता. परंतु तशी संधी त्यांना मिळाली नसावी.

              याशिवाय त्यांनी अनेक व्यावसायिक व्यक्तिचित्रे रंगविली. त्यांत अपारदर्शक जलरंगांत केलेली व्यक्तिचित्रे, फोटोंवर तैलरंग वापरून केलेली चित्रे तसेच कॅनव्हासवरील पूर्णाकृती व्यक्तिचित्रांचा समावेश आहे. पुण्यातील अनेक शिक्षणसंस्था, संशोधन संस्था, धार्मिक संस्था, मंदिरे व खाजगी संग्रहांत ती व्यक्तिचित्रे आहेत. यांत प्रामुख्याने संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत रामदास, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, गोेंदवलेकर महाराज, गजानन महाराज असे संत, तसेच सोनोपंत दांडेकर, स्वामी विवेकानंद अशा व्यक्तिमत्त्वांचीही व्यक्तिचित्रे आहेत. भारत सरकारने १ मे १९८८ रोजी समर्थ रामदास स्वामींचे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. त्यावरील चित्र दीक्षित यांचे होते.

              आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी ‘चित्रमय गुरुचरित्र’ रंगविले व ते छापले जाऊन घराघरांत पोहोचले. त्यातील भावदर्शनामुळे अनेक श्रद्धाळूंना ते आजही समाधान व सामर्थ्य देते. त्यांची वृत्ती धार्मिक व आध्यात्मिक होती. ते भजन, पूजन, अभंग, कीर्तन यांत रमत. त्यामुळे त्यांचे जिवलग मित्र ज.द.गोंधळेकर यांच्यासारख्या प्रयोगशील व जग बघितलेल्या कलावंताच्या सहवासात असूनही त्यांचा स्वतःच्या चित्रनिर्मितीवर दीक्षितांनी परिणाम होऊ दिला नाही. परिणामी, स्वतःच्या कलानिर्मितीतही ते प्रयोगशीलतेपासून व आधुनिक विचारांपासून दूर राहिले. मात्र आधुनिक पद्धतीची कलानिर्मिती ते आवर्जून बघत. त्याबद्दल संयमित चर्चाही करीत. 

              शिवाय ते ज्ञानेश्वरीवर प्रवचने करीत. असे असूनही तरुणपणी त्यांनी रंगविलेल्या काही चित्रांतून मात्र त्यांच्या चित्रकार म्हणून असलेल्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो. पुण्यातील अभिनव कला विद्यालयाच्या संग्रही असलेले त्यांचे क्रॉफर्ड मार्केटमधील एका पक्षी-विक्रेत्याचे चित्र याची साक्ष देते. या चित्रातील पक्षी-विके्रता पोटासाठी पक्षी विकणारा आहे. पिंजऱ्यातील बागडणारे पक्षीही सुंदर आहेत, पण ते करुण वाटतात. दीक्षितांनी हे चित्र अत्यंत भावपूर्ण पद्धतीने रंगविले असून, मानवी जीवनाचीच नव्हे, तर प्राणिमात्रांची मर्यादा व नियतिशरणताच त्यातून व्यक्त होते. या पार्श्‍वभूमीवर पुण्याच्या खुन्या मुरलीधराच्या मंदिरातील त्यांच्या संत तुकारामांच्या चित्रात मात्र तुकारामांचे साधेभोळे व निर्व्याज व्यक्तिमत्त्व व्यक्त झाले आहे. तुकारामांच्या अंगाखांद्यांवर खेळणारे पक्षी व आसपास बागडणारे खार व हरिणांसारखे स्वच्छंद व भयरहित पक्षी-प्राणी त्यांनी समर्थपणे रंगविले आहेत. विशेष म्हणजे, या चित्रातून त्यांची कारागिरी, कौशल्य व प्रभुत्व यांपेक्षा त्यातून निर्माण होणारा भावच चित्राला प्रभावीपणे व्यापून टाकतो.

              आपल्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वामुळे अभिव्यक्तीच्या विविध शक्यता शोधायच्या भानगडीत दीक्षित कधीच पडले नाहीत. तरीही त्यांनी अगदी लहानसा मोनोग्रम बनविण्यापासून ते छोटेसे इलस्ट्रेशन, मुखपृष्ठ, पोस्टर ते मोठ्या आकाराच्या बॅनरपर्यंतचे काम सहजपणे केले. पण हे सर्व करीत असताना त्यांचा आविष्कार शांत व संयत असे. त्यामुळेच त्यांनी काढलेली वेश्याही उच्छृंखल वाटत नसे. फार तर ती कमी सात्त्विक भासे! यावर गोंधळेकरांसारख्या मित्रांनी डिवचल्यास ते म्हणत, ‘‘पिण्डी ते ब्रह्माण्डी.’’ शिवाय चित्राच्या लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत काम कसे  करावे हे सांगताना ते म्हणत, ‘‘छोटे चित्र काढताना बोटाची, तर त्यापेक्षा मोठे चित्र काढताना मनगटाची हालचाल करायची. फार मोठे असेल तर खांद्याची. म्हणूनच लहान चित्रातला छोटा ठिपका मोठ्या चित्रात भोपळ्याएवढा होतो. फक्त मनाला आणि शरीराला सवय लावावी लागते. मग जमते, ‘पिण्डी ते ब्रह्माण्डी.’

              १९७३ नंतर ते अनेक वर्षे वाई येथील विश्वकोशाच्या कार्यालयात अभ्यागत चित्रकार म्हणून जात असत. त्या काळात तिथे काम करणाऱ्या अनेक तरुण चित्रकारांवर त्यांनी आपल्या शांत व संयत व्यक्तिमत्त्वाचे व सात्त्विक चित्रशैलीचे संस्कार केले.

              सहा फुटांपेक्षा जास्त उंच असलेले दीक्षित कायम पांढरे स्वच्छ धोतर नेसत. त्यावर सदरा, काळा कोट व डोक्यावर काळी टोपी अशा वेषात असत. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी त्यांच्या श्रद्धेनुसार आपले बोलणे, वागणे व कलानिर्मितीतील सात्त्विकपण जोपासले.

              ‘सुबोध ज्ञानेश्‍वरी’, ‘चित्रमय गुरुचरित्र’ व य.गो.जोशी यांच्या ‘प्रसाद’ या मासिकातील त्यांच्या सात्त्विक चित्रांनी सर्वसामान्यांच्या मनांवर चांगले संस्कार केले, सदाचरण व जीवनातील धार्मिक मूल्यांबद्दलची श्रद्धा वृद्धिंगत केली.

- प्रभाकर दिवाकर, सुहास बहुळकर 

दीक्षित, जिवाजी भिकाजी