Skip to main content
x

दीक्षित, केशव जिवाजी

      भिजात  संस्कृत ललित साहित्याचे प्रेम आणि चोखंदळ रसिकत्व अंगी असणारे केशवराव दीक्षित एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते. केवळ संस्कृतच्या प्रेमापोटी ते घरी वर्ग घेत असत. त्या विशेष वर्गातील विद्यार्थ्यांकडून मासिक वा वार्षिक शुल्क तर सोडाच, कोणत्याही स्वरूपातील मानधनही ते स्वीकारत नसत. शास्त्रीय संगीताची चांगली जाण त्यांना होती.

     इ. स. १९३५ मध्ये सुरू झालेली के. जी. दीक्षित व सिटी हायस्कूल यांची संस्कृत शिष्यवृत्तीची उज्ज्वल परंपरा १९४६ अखेर चालू राहिली. या काळात १९३७ ते ४१ अशी चार वर्षे पहिली आणि १९३६, ४२, ४४, ४६ अशी चार वर्षे दुसरी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती दीक्षितांच्या विद्यार्थ्यांनी मिळविली. १९४१ मध्ये तर रामकृष्ण हरि गाडगीळ व गजानन रंगनाथ जोशी या त्यांच्या विद्यार्थ्यांनी पहिली व दुसरी शंकरशेठ साहित्य त्या वर्षीच्या संस्कृतच्या सर्व शिष्यवृत्त्या दोघातच विभागून पटकाविल्या. याखेरीज ‘बिडकर’, ‘यमुनाबाई दळवी’ संस्कृत शिष्यवृत्या जमेस धरून दीक्षितांनी त्या काळात एकूण २७ मानकरी घडविले. १९७२ मध्ये त्यांचे ज्येष्ठ पुत्र मुकुंद यांनी ‘पहिली जगन्नाथ’, ‘अकबरनवीस’ आणि ‘आचार्य पारितोषिक’ असे संस्कृतचे तीनही सन्मान मिळविले.

     त्यांचे सर्व विद्यार्थी विश्‍वविद्यालयीन परीक्षेत प्रथम श्रेणीत बहुधा प्रथम क्रमांकाने चमकलेले, भावी जीवनात उल्लेखनीय कर्तबगारीच्या बळावर सुप्रतिष्ठित झाले. सखोल ज्ञान आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्याची विलक्षण हातोटी या दोन्ही गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत. ते खरे शिक्षकाग्रणी होत, असे कवी कुलगुरू कालिदासांनी म्हटले आहे. दीक्षित या दुर्मिळ कोटीतले होते. व्याकरणासारखा रूक्ष, किचकट विषय ते अत्यंत सोपा करून व मनोरंजक पद्धतीने शिकवित असत. ते स्वतः व्याकरणावर काही सोपे संस्कृत श्‍लोक रचित. अधूनमधून गमतीदार चुटकेही असायचे. सूत्रांच्या अनुषंगाने सुंदर सुभाषिते ते खुलवून सांगायचे. त्यांनी म्हटलेली सूत्रे व सुभाषिते विद्यार्थ्यांना काही वेळा तिथल्या तिथे पाठ व्हायची. दीक्षितांचे घर जुन्या गुरुकुलाचे आधुनिक रूपच होते.

     ‘शंकरशेठ’ मानकऱ्यांचे कुशल शिल्पकार, सांगली शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य, कार्यवाह, सिटी हायस्कूलचे सुपरिंटेंडेंट, ‘सुबोध भारती’ या आदर्श संस्कृत पाठ्यपुस्तक मालिकेचे प्रमुख संपादक अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळत. ते १९६४ मध्ये सेवानिवृत्त झाले. के. जी. दीक्षित, जगन्नाथ शंकरशेठ आणि सिटी हायस्कूल यांचे नाव महाराष्ट्रभर गाजले. मेंदूच्या रक्तस्रावाने त्यांचे अकल्पित निधन झाले.

- विजय बक्षी

दीक्षित, केशव जिवाजी