Skip to main content
x

दीक्षित, कृष्ण गंगाधर

संजीव

     ‘त्तराचा फाया तुम्ही मला आणा राया’ किंवा ‘चाळ माझ्या पायात पाय माझे तालात’ या चित्रपटगीतांची माहिती नाही, असा मराठी रसिक सापडणार नाही. पण ‘कवी संजीव’ हे या गाण्यांचे गीतकार होते, हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नसेल. कवी संजीव १९३५ सालापासूनच कविता लिहीत होते. मात्र १९५५ सालापासून ते चित्रपटगीते लिहू लागले. केवळ चित्रपटगीतेच नव्हे, तर ‘सासर-माहेर,’ ‘भाऊबीज, ‘चाळ माझ्या पायात’, ‘पाटलाची सून’ अशा निवडक चित्रपटांच्या कथा आणि संवादही त्यांनी लिहिले. त्यापैकी ‘पाटलाची सून’ (१९६७) या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट कथेचा राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. १९८० मध्ये ‘गझल गुलाब’ या कवितांसाठी त्यांना शासनाने पुरस्कार दिला.

     कवी संजीव यांचे पूर्ण नाव होते कृष्ण गंगाधर दीक्षित. सोलापूरजवळच्या वांगी या गावी त्यांचा जन्म झाला. सोलापूर येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि पुढे मुंबईला जाऊन त्यांनी जी.डी.आर्ट्स ही पदवी संपादन केली. चित्रकार, छायाचित्रकार म्हणून सोलापुरात त्यांची कला बहरली. नवी पेठ या सोलापुरातल्या अत्यंत गजबजलेल्या भागात त्यांचा सुसज्ज स्टुडिओ होता आणि या स्टुडिओत अनेक कलाकारांची सतत ये-जा असे.

     १९३५-१९८८ या काळात संजीव यांचे बारा कवितासंग्रह प्रकाशित झाले. ‘सुख आले माझ्या दारी’, ‘मराठा तितुका मेळवावा,’ ‘रंगपंचमी,’ ‘सुधारलेल्या बायका,’ ‘वाट चुकलेले नवरे,’ ‘जन्मठेप,’ ‘हात लावीन तिथे सोने,’ ‘सौभाग्यकांक्षिणी’, ‘जखमी वाघीण’, ‘ठकास महाठक’, ‘हे दान कुंकवाचे’, ‘ग्यानबाची मेख’ या चित्रपटांचे गीतलेखन त्यांनी केले. याखेरीज अनेक गैरफिल्मी गीतांच्या ध्वनिमुद्रिकाही त्यांच्या नावावर सापडतात. ‘मराठा तितुका मेळवावा’ चित्रपटातील ‘अखेरचा हा तुला दंडवत’ हे गीत कवी संजीव यांनीच लिहिले होते. मात्र या गाण्याचे श्रेय अनवधानाने योगेश यांना दिले आहे. ७८ आर.पी.एम. ध्वनिमुद्रिकेवर संजीव यांचे नाव स्पष्ट दिसते.

     सोलापूरच्या लोकजीवनाची, लावणीची परंपरा कवी संजीव यांच्या गीतांनी कायम लक्षात राहील.

      त्यांचे वार्धक्याने सोलापुरातच निधन झाले.

- जयंत राळेरासकर

दीक्षित, कृष्ण गंगाधर