Skip to main content
x

दिक्षित, शंकर बाळकृष्ण

शंकर बाळकृण दीक्षित यांचा जन्म दापोली तालुक्यातील मुरूड गावी झाला व तेथेच त्यांचे प्राथमिक मराठी शिक्षण झाले. त्या वेळी संस्कृत व वेद यांचेही बेताचे शिक्षण त्यांनी घेतले. पुढे दोन वर्षे दापोली कोर्टात उमेदवारी करण्यात व इंग्लिश शिकण्यात गेली. सन १८७०पासून तीन वर्षे हे पुणे ट्रेनिंग कॉलेजात होते. पुढे हे मॅट्रिक झाले (१८७४). नंतर रेवदंडा, ठाणे, बार्शी, धुळे येथे शाळेमध्ये व ट्रेनिंग कॉलेजमध्ये काम केल्यावर शेवटची चार वर्षे यांनी पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये काढली. त्यांना पहिल्यापासून गणित विषयाची आवड होती. परंतु ज्योतिषाचा नाद लागण्यास वर्तमानपत्रातील लेखांचे वाचन कारणीभूत झाले. रेवदंड्याला असताना कै. विसाजी कृष्ण लेले यांचे स्फुट वक्ता अभियोगीया सहीने सायनवादावर वर्तमानपत्रात लेख येत असत. ते वाचून शंकर दीक्षित यांचे लक्ष ज्योतिषाकडे वेधले गेले.

पुढे ठाण्याला जर्नादन बाळाजी मोडक यांच्याशी स्नेह झाल्याने यांचा ज्योतिषाचा अभ्यास वाढला. शेवटी तर ते मोडक यांना आपले गुरू मानू लागले. लेल्यांप्रमाणे सायनवादी बनून या तिघांनी सायनपंचांग प्रसिद्ध करण्याचा उपक्रम केला तो यांनी १०-१२ वर्षे चालवला, पण तो त्यांच्या पश्चात बंद पडला.

डॉ. फ्लीट यांनी आपल्या गुप्त इनस्क्रिप्शन्सया ग्रंथात यांची मदत नसती, तर मला गुप्तांचा शककाल निश्चित करता आलाच नसता’; अशी स्पष्ट कबुली दिली आहे. त्याचप्रमाणे इंडियन कॅलेंडरया ग्रंथाची योजना ठरवून त्याचे गणित पुरे करण्यापर्यंत सुएलने मजल गाठली असता त्यांची व यांची भेट झाली. त्याबरोबर मेष संक्रांतीचे व इतर काही आकडे देऊन सदर ग्रंथाची उपयुक्तता वाढवण्याची युक्ती दीक्षितांनी दाखवली व ती सुएललाही इतकी महत्त्वाची वाटली की, ‘तो भाग दीक्षितांनी तयार करावा व ग्रंथ दोघांच्याही नावाने प्रकाशित व्हावाअसे ठरले. या ग्रंथाच्या प्रास्ताविक भागात बहुतेक टीपा S.B.D.या त्यांच्या सहीच्या आहेत. त्यातील काही माहिती अगदी नवी व प्रचलित विचारांना धक्का देणारी होती. ती माहिती यांनी निर्भयपणे नमूद केली आहे.

भारतीय ज्योतिषशास्त्र’, या ग्रंथाच्या प्रस्तावनेत हे लिहितात- ‘आमच्यातील काही-काही विद्वानांनादेखील युरोपियनांचे वाक्य म्हटले की, ते कसेही असले तरी वेदवाक्य वाटते. ही गोष्ट स्वत:च्या योग्यतेचा भरवसा व विद्वत्तेची खात्री नाही, असे दाखवणारी आहे.’

भारतीय ज्योतिषशास्त्रहा त्यांचा मराठी भाषेतील ग्रंथ अत्यंत उच्च दर्जाचा ग्रंथ आहे. वैदिक कालापासून त्यांच्या वेळेपर्यंतच्या अनेक भारतीय ग्रंथांतून आढळणारी ज्योतिषविषयक माहिती एकत्र करून तिच्यावरून निघणारी अनुमाने या ग्रंथात ऐतिहासिक पद्धतीने आणि अत्यंत थोडक्यात मांडलेली आढळतात. याकरता यांनी पाचशेपेक्षा अधिक संस्कृत ग्रंथांचे बारकाईने वाचन केले. शेकडो दुर्बोध स्थळे सुबोध केली. आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य वगैरे ग्रंथकारांचा परिचय करून घेण्याचे सुलभ साधन मराठीत निर्माण केले.

पंचांगशोधन विषयक माहिती व पक्षोपक्षांचे मुद्दे या ग्रंथात संग्रहित केले. तसे करताना १. सायन पंचांगाची ग्रह्यता, . वेदांचे प्राचीनत्व, . ज्योतिषशास्त्रातील गणित भागाचे भारतीयत्व, इत्यादी आपली मतेही नमूद केली. यांपैकी दुसऱ्या व तिसऱ्या विषयांचे प्रतिपादन करताना त्यांना युरोपियनांचे सिद्धान्तवत मानलेले अभिप्राय कसे चुकीचे आहेत, हे दाखवावे लागले आणि कृत्तिका पूर्व दिशेस उगवतात, तेथून त्या चळत नाहीत.’ या अर्थाच्या शतपथ ब्राह्मणातील उतार्यावरून इ..पूर्व दोन हजार वर्षे; हा जो त्या ग्रंथाचा काल त्यांनी ठरवला, तो कसा खोडावा हे युरोपियनांना कोडे पडले. तसेच ग्रीक ज्योतिषांची मूळतत्त्वे हिंदुस्थानात आलीया थिबोच्या मताचे त्यात कोठेही साम्य नसल्याचे दाखवून यांनी खंडन केले. (भा. ज्यो. पा. ५१३). ‘टॉलेमीपासून हिंदूंना ज्योतिषांचे सर्वस्व मिळाले.’ या बर्जेसच्या प्रतिपादनाचे खंडन करताना टॉलेमीपूर्वीच्या वासिष्ठ सिद्धान्तात अंशांचे साठ भागसापडतात हे दाखवून दिवसाचे ६० विभाग ही कल्पना टॉलेमीने आमच्यापासून घेतल्याचे त्यांनी दाखवून दिले.

ज्योतिषविषयक प्रश्नांच्या वादात ते अधिकारयुक्त वाणीने बोलू शकत, कारण यांनी पाश्चात्य व पौर्वात्य दोन्ही ग्रंथांचे परिशीलन व मनन करून तो अधिकार प्राप्त केला होता. हे सव्यसाचित्व यांच्या विद्वत्तेचे अंग होते.

सायन-निरयन वादावरून त्यांचे लक्ष ज्योतिषाकडे गेल्यावर ज्योतिषाचा प्राचीन काळाचा शोध करण्यास त्यांनी आरंभ केला. इतक्यात ज्योतिषाच्या इतिहासावर ग्रंथ लिहिण्यास बक्षीस अशी जाहिरात दक्षिणा प्राइज कमेटीने दिली. त्यामुळे त्यांनी ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. याच सुमारास अशाच प्रकारच्या ग्रंथास गायकवाड सरकारनेदेखील बक्षीस लावले होते. गायकवाड सरकारास हिंदू पंचांगाचे पुस्तक पाहिजे होते. यासंबंधीची माहितीही पुस्तकात समाविष्ट केली असल्यामुळे त्यांना ही बक्षिसे मिळाली.

त्यांच्या या ग्रंथांची योग्यता फार मोठी आहे. ज्याच्या अभ्यासाकरता अन्य देशांतील लोकांनाही मराठी ज्ञान मिळवण्याची स्फूर्ती उत्पन्न व्हावी अशा योग्यतेचा त्यांचा हा ग्रंथ आहे. वैदिक वाङ्मयाच्या समावेशाची परिपूर्णता, वेदाङ्गकालीन ज्योतिषाचे विवेचन व इतर विद्वानांना कुंठित करणार्या गूढ गोष्टींचा उलगडा, यांमुळे यांच्या या ग्रंथास विद्वानांची मान्यता मिळाली आहे. परिपूर्णता आणि उपयुक्तता हा त्यांच्या ग्रंथांचा विषय आहे.

पाश्चात्य व पौर्वात्य या ज्ञानाच्या दोन्ही शाखांत मिळवलेल्या प्रावीण्यामुळे यांच्या बारीकसारीक ग्रंथालाही एक प्रकारचे वजन प्राप्त होई.

त्यांचे ग्रंथ - ज्योतिषशास्त्र - . ज्योतिर्विलास २. हिंदु पंचांग, . भारतीय ज्योति:शास्त्र अथवा भारतीय ज्योतिषाचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास (पहिली आवृत्ती सन १८९६, दुसरी आवृत्ती सन १९३१). . धर्ममीमांसा (-२ भाग, १८९५ मॅक्स मूलरच्या पुस्तकाचे भाषांतर). भूगोल ५. भारतभू वर्णन (भाषांतर १८९९), . विद्यार्थि बुद्धिवर्धिनी (शालेय), . सोप्रत्तिक अंकगणित (शालेय), . चमत्कार (शालेय)

संपादक मंडळ

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].