Skip to main content
x

दोडिया, अंजू अतुल

           ‘स्त्री’ला केंद्रस्थानी ठेवून, एकाच वेळी आत्मचरित्रात्मक व एकूणच मानवी नात्यांसंबंधी व्यक्त होणाऱ्या प्रतिमा हे अंजू दोडिया यांच्या चित्रकृतींचे वैशिष्ट्य आहे.

         अंजू दोडिया यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून 1986 मध्ये पेंटिंगची पदवी (बी.एफ.ए.) प्राप्त केली. अगदी सुरुवातीच्या काळातील त्यांची कलानिर्मिती ही अमूर्त शैलीमध्ये होती. परंतु मानवी मन व मनोव्यापार यांमध्ये कायम रस वाटत असल्याने त्यांचा ओढा नंतरच्या काळात मानवाकृती चित्रणाकडे राहिला. ‘अ फिक्शनल ऑटोबायोग्रफी’ या त्यांच्या पहिल्या चित्रप्रदर्शनामध्ये रेल्वे स्थानक, रस्त्याच्या कडेकडील दृश्ये यांचा उपयोग करून केलेली चित्रणे दिसतात. यानंतरच्या काळात स्वत:चा शोध घेत, स्वत:च्या विचारांना अधिक सशक्त करत त्यांनी  त्यांच्या जीवनाशी संबंधित अनुभव चित्रांमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

         अंजू दोडिया यांच्या कलाकृती भारतातील सर्व प्रमुख शहरांत व न्यूयॉर्क, सिंगापूर, पॅरिस, लंडन, शांघाय इत्यादी देशांतील जागतिक दर्जाच्या प्रदर्शनांत प्रदर्शित झाल्या आहेत. ‘द थ्रोन ऑफ फ्रॉस्ट’ (2007) ‘ऑल नाइट आय शॅल गॅलॉप’ (2008), ‘नेकलेस ऑफ एकोज’ (2010), ‘फेस ऑफ’ ही त्यांची काही महत्त्वाची कलाप्रदर्शने आहेत. अंजू दोडिया यांना 1999 मध्ये ‘हार्मनी’ या रिलायन्स इंडियातर्फे आयोजित कलाप्रदर्शनाचे पारितोषिक, 2001 मध्ये इंडो-अमेरिकन सोसायटीचे ‘यंग अचीव्हर’ पारितोषिक व 2007 चे ‘झी अस्तित्व’ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

         अंजू दोडिया यांच्यावर रॉबर्ट रॉशेनबर्ग व जिओत्तो मसाचिओ इत्यादी इटालियन चित्रकारांचा, तसेच इंगमार बर्गमनच्या चित्रपटांचा प्रभाव आहे. भारतीय साहित्यामधील मध्ययुगीन भक्तिकाव्य, गुजराती लोककथा व जगभरची मिथके यांनीही त्यांना प्रभावित केले आहे. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम त्यांच्या चित्रशैलीवर दिसतो.

         समकालीन घडामोडी, समाजकारण, अर्थकारण व संस्कृती यांविषयीचा अभ्यास त्यांच्या कलानिर्मितीला पूरक ठरला आहे. वर्तमानपत्रांतील बातम्या, छायाचित्रे, फॅशन मॉडेल्सची छायाचित्रे, चित्रपट हे त्यांच्या चित्रकृतींचे संदर्भसाहित्य असते. त्यांच्या चित्रांमधले तपशील वास्तवाचे बाह्यरूप तर दाखवतातच; पण त्याच वेळेस त्यांना प्रतीकात्मक अर्थाचे पदरही असतात. यांमधूनच त्यांची चित्रप्रतिमा जन्म घेते. एक स्त्री म्हणून झालेली जडणघडण व संस्कार यांतूनही या कलाविचारांना वेगळे परिमाण मिळालेले दिसते. चित्राचे माध्यम म्हणून त्या अनेकदा कापडाचा उपयोगही विविध प्रकारे करतात. ‘स्त्री’ला कापडाविषयी वाटणारी आत्मीयता तर यामागे आहेच; पण विणलेल्या, एम्ब्रॉयडरी असलेल्या कापडावर केलेल्या चित्रकृतींचे पोत, त्याचा शरीरस्पर्श त्यांना सर्जनाच्या अनेक शक्यता असलेल्या गर्भार चित्रासारखा वाटतो.

         बऱ्याच वेळा अंजू दोडिया यांच्या चित्रांतील स्त्रिया पुढाकार घेणाऱ्या आणि पुरुष दुय्यम भूमिका निभावणारे असतात. लव्हर्स (1998) हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. त्यात स्त्रीची ओढणी  आणि इव्ह गोष्टीतल्या सर्पासारखी दोघांभोवती लपेटली गेली आहे. ‘द नॉटेड पॉझ’ (2008) या जलरंग आणि चारकोलमध्ये केलेल्या चित्रात स्त्रीचा चेहरा केंद्रस्थानी आहे. तिच्या दोन्ही हातांची कमान केसांत गुंफलेली आहे. किमोनोसारख्या वस्त्राच्या चुण्यांमधून जे आकार तयार होतात, त्यांत अनेक कोन दडलेले आहेत. शीर्षकातल्या ‘गाठ’ या शब्दाला ‘लग्नगाठ’, ‘तिढा’, ‘बंधन’ अशा अनेक अर्थच्छटा आहेत. ‘युकियो—ई’ शैलीच्या चित्रांमध्ये असलेली जपानी स्त्रियांची वेषभूषा, केशरचना ही एका समृद्ध, संथ आणि आत्ममग्न वातावरणात नेणारी होती. अंजू दोडिया यांच्या या चित्रावर युकियो-ई चित्रशैलीचा ठसा आहे.

         ‘स्त्री’ची संवेदनशीलता आणि आयुष्याला सामोरे जाताना बाणवावी लागणारी कठोरता यांना चित्रविचारांतून मांडताना अंजू दोडिया केवळ स्वत:पुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर एका अर्थाने त्या पूर्ण ‘स्त्रीत्वाचे’ आत्मचरित्र मांडतात. चित्रकार अतुल दोडिया यांच्या त्या पत्नी असून या दोघाही पति-पत्नींनी समकालीन भारतीय चित्रकलेत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

- माणिक वालावलकर

संदर्भ
संदर्भ: 1. घारे, दीपक; ‘विस्तारणारी क्षितिजे’ कॅटलॉग; संयोजन : पटवर्धन, सुधीर; बोधी आर्ट, 2008. 2. संकेतस्थळ :www.gallerychemould.com संकेतस्थ : www.saffronart.com
दोडिया, अंजू अतुल