Skip to main content
x

डोंगरे, रामचंद्र केशवदेव

      रामचंद्र केशवदेव डोंगरे यांचे घराणे मूळचे कर्नाटकातील कोकणस्थ ब्राह्मण! डोंगरे कुटुंबात तीन पिढ्या संस्कृत साहित्याची आणि धर्मग्रंथांची उपासना झाली होती. त्यांचे आजोबा हरिभक्त परायण श्री गणेशजी अग्निहोत्री होते. कर्नाटकातून ते गुजरात राज्यात बडोदा येथे गेले. तेथे ते भागवतावर प्रवचने करू लागले. हा नावलौकिक ऐकून बडोदा संस्थानाच्या महाराजांनी त्यांना राजमान्यता दिली व त्यांना वर्षासन मिळू लागले. पण पुढे ते बंद झाल्यानंतर अयाचित वृत्तीवर राहून त्यांनी उपजीविका केली.

श्री. गणेश यांचे चिरंजीव केशवदेव यांच्यावर घरातील धार्मिक व पवित्र संस्कार झाले. त्यांनीही श्रीमद्भागवत, महाभारत, रामायण वगैरे ग्रंथांवर प्रभुत्व मिळवले होते. त्यांचाही उत्तम प्रवचनकार म्हणून लौकिक होता. त्यांचे चिरंजीव हे रामचंद्र. त्यांचा जन्म फाल्गुन शुद्ध तृतीयेला झाला.

आई-वडिलांच्या तोंडून स्तोत्र, श्लोक व अभंग यांचे पुष्कळ श्रवण झाले. लहानपणीच घरातील धर्मग्रंथ हीच त्यांना संपत्ती वाटू लागली. त्यांचे मन खेळणे, बागडणे यांत कधीच रमले नाही.

श्री रामचंद्रजींची मुंज आठव्या वर्षी झाली. पुढील शिक्षणासाठी ते पंढरपूरला नारद वेदपाठशाळा (आज अस्तित्वात नाही) येथे गेले. पहाटे चंद्रभागास्नान, व्यायाम, पांडुरंगाची पूजा, अध्ययन, पाठांतर हे चाले. तेथे वेदान्ताचा व पुराणांचा अभ्यास झाला. ते श्रीमद्भागवत व श्रीरामायण यांत रमून गेले. तेथे सात वर्षे राहून ते काशी क्षेत्री गेले. तेथे उपनिषद वगैरेचा सखोेल अभ्यास झाला. याबरोबर ज्ञानेश्वरी, संत तुकोबांचे अभंग, नामदेव, समर्थांचा दासबोध यांचे सखोल चिंतन झाले. ते आळंदी-देहू-सज्जनगड येथे जाऊ लागले. त्यांचे श्रीमद्भागवतावरचे पहिले प्रवचन पुण्यात झाले. त्यानंतर त्यांची हजारो प्रवचने व सप्ताह संपूर्ण भारतभर झाले.

आई-वडिलांच्या आग्रहास्तव त्यांनी, ‘जी मुलगी माझ्याशी विवाह केल्यावर ब्रह्मचर्यवृत्ती पाळण्यास तयार होईल, तिच्याशीच विवाह करीनया अटीवर विवाह केला. त्याप्रमाणे शालिनीदेवी या ब्राह्मण साधक उपवर कन्येशी त्यांचा विवाह झाला व तिचे नाव सीतादेवीठेवण्यात आले. पुढील काळात त्यांनी अबू पहाडावर साधना केली. पू. डोंगरे महाराज तेथे त्यांना भेटावयास जात असत. ते हिंदी, गुजराती व मराठीत प्रवचन करीत असत. सप्ताह व प्रवचनमाला होत असे. त्याचे मिळालेले उत्पन्न ते संस्थांना वाटत असत. खेडोपाडी लहान मंडळे असतील तर ते त्यांना काही रकमा देऊन व्याजात समाजकार्य, धर्मकार्य करावयास सांगत. त्यांनी कोणाकडून सत्कार, मानपत्र वगैरे काहीही स्वीकारले नाही. थोर अमानित्व, शांत, निर्मोही, निरामय व दैवी गुणसंपन्न असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

भगवान श्रीकृष्ण-श्रीरामावर त्यांची अचल प्रेम व निष्ठा होती. त्यांच्या प्रवचनाची, भागवताची पुस्तके प्रसिद्ध आहेत. सन १९८०-८१ मध्ये त्यांच्या पत्नीचे देहावसान झाले आणि त्यानंतर दहा वर्षांच्या कालांतराने ईश्वरभक्तीच्या दिव्य प्रेमानंदात रंगले असताना पू. डोंगरे महाराजांचे देहावसान झाले.

  डॉ. अजित कुलकर्णी

 

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].