Skip to main content
x

दोरगे, संभाजी कृष्णराव

           संभाजी कृष्णराव दोरगे यांनी १९५२ मध्ये बी.एस्सी.(कृषी) व १९५४ मध्ये कीटकशास्त्रात एम.एस्सी. (कृषी) या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर १९५९ मध्ये पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९६० मध्ये कॅन्सस विद्यापीठात (अमेरिका) कीटकशास्त्रातील प्रशिक्षण घेतले.

           महाराष्ट्र सरकारचे कीटकशास्त्रज्ञ व पुणे कृषी महाविद्यालयात कृषी कीटकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून १९५६ मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी चढत्या क्रमाने सहसंचालक व प्राचार्य कृषी महाविद्यालय, दापोली; अधिष्ठाता- म.फु.कृ.वि.,राहुरी; अतिरिक्त संचालक-कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, सदस्य सचिव; कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि शेवटी कुलगुरू म.फु.कृ.वि., राहुरी अशा विविध पदांवर काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवला. अखिल भारतीय कृषी विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष आणि भा.कृ.अ.प.च्या विविध शास्त्रीय समित्यांचे सदस्य अशी अशासकीय पदेही भूषवली.

           शिक्षण, संशोधन विस्तार यांचा समन्वय साधून उपयुक्त संशोधनावर त्यांनी भर दिला व हे संशोधन शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवले. मोठ्या प्रमाणावर किडींचे नियंत्रण करण्यासाठी हवाई फवारणीचे तंत्रज्ञान विकसित करून त्याची अंमलबजावणी केली. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जुने शैक्षणिक कार्यक्रम बंद करून प्रात्यक्षिक शिक्षणावर भर असलेला व सामाईक चाचणी पद्धतीचा अंतर्भाव असलेला नवीन कार्यक्रमही त्यांनी राबवला. शिक्षकांसाठी प्रशिक्षणाच्या योजनांची अंमलबजावणी त्यांनी केली.

           म.फु.कृ.वि.च्या कार्यक्षेत्रात २५ संशोधन केंद्रे असून ती विविध विषयांवर संशोधन करत आहेत. यात पिकावरील नवीन वाण; गाई, शेळ्या, मेंढ्या यांचे उन्नत वाण, उपयुक्त अवजारांचा विकास इ. संशोधनास त्यांनी उत्तेजन दिले.

           डॉ. दोरगे यांनी म.फु.कृ.वि.च्या पडीक जमिनीचा वृक्ष लागवडीद्वारे विकास घडवून आणला. या विस्तृत वृक्ष लागवडीमुळे विद्यापीठाला महाराष्ट्र शासनाचे वनश्री पारितोषिक मिळाले. डॉ. दोरगे यांनी पदव्युत्तर शिक्षक या नात्याने एम.एस्सी. व पीएच.डी.च्या २१ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून २१ शोधनिबं प्रसिद्ध केले आहेत. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाने डॉ. दोरगे यांचा ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ देऊन त्यांचा सन्मान केला.

- संपादित

दोरगे, संभाजी कृष्णराव