Skip to main content
x

धारप, नारायण गोपाळ

   नारायण गोपाळ धारप यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी घेतल्यानंतर रसायन तंत्रज्ञानात पदव्युत्तर बी.एस्सी.(टेक) ही दुसरी पदवी मिळवली. काही काळ त्यांनी भारतात नोकरी केल्यावर नोकरीच्या निमित्ताने ते आफ्रिकेत गेले. तिथून परतल्यावर त्यांनी नागपूर येथे व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, पण पुढे नागपूर सोडून ते पुण्याला परतले; आणि बदलीच्या निमित्ताने किंवा शिकायला पुण्यात आल्यावर लोकांना जे सामान अत्यावश्यक वाटते अशा वस्तू किमान भाड्याने देण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. कॉट, खुर्च्या, टीपॉय आणि छोटी कपाटे ह्या गोष्टी ते भाड्याने देत. अर्थात त्यांच्या या पोटापाण्याच्या व्यवसायासाठी धारप प्रसिद्ध नव्हते.

नागपूर येथे असतानाच धारप यांनी विज्ञानकथा-लेखनास प्रारंभ केला. मात्र त्या काळात मराठीमध्ये विज्ञान-साहित्यास फारसा वाचक नव्हता. तरीही केवळ कादंबर्‍याची आणि कथासंग्रहांची संख्या बघता, नारायण धारपांची गणना आघाडीच्या विज्ञान कथा-लेखकांत करावी लागते.

धारपांनी १९५१मध्ये लेखनाला सुरुवात केली आणि पन्नास वर्षांहून अधिक काळ लिहीत राहिले. सुरुवातीच्या काळात त्यांच्या भयकथा, विज्ञानकथा यांची उपेक्षाच झाली. परंतु पुढे मात्र त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या लेखनाचा वाचकवर्ग तयार झाला. त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. ‘अनोळखी दिशा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ‘चंद्राची सावली’, ‘लुचाई’, ‘वेडा विश्वनाथ’, ‘दुहेरी धार’, ‘पानघंटी’, ‘४४० चंदनवाडी’, ‘देवाज्ञा’, ‘आनंद महल’, ‘संक्रमण’, ‘नवे दैवत’, ‘स्वाहा’, ‘चेटकीण’ अशा कादंबर्‍या; ‘चंद्रहास आणि इतर विलक्षण माणसं’, ‘समर्थांचिया सेवका’, ‘अनोळखी दिशा’चे ३ खंड, असे काही कथासंग्रह; पंधरा विज्ञान कादंबर्‍या; आणि तीन विज्ञान कथासंग्रह त्यांच्या नावावर जमा आहेत; म्हणजे त्यांच्या विज्ञान कादंबर्‍यांची संख्या इतर कुठल्याही विज्ञान साहित्यिकांच्या विज्ञान कादंबर्‍यांपेक्षाही जास्त आहे. विज्ञान साहित्यात वाचकांचा आणि त्याहीपेक्षा संपादकाचा, प्रकाशकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, हे लक्षात येताच धारपांनी त्यांचे लक्ष गूढकथा, या भयकथा यांवर केंद्रित केले.

जरी धारपांनी त्यांचे लक्ष गूढकथांवर भयकथांवर केंद्रित केले, तरी सुरुवातीच्या काळात त्यांनी चार आणि उत्तरायुष्यात एक अशा पाच सामाजिक कादंबर्‍या लिहिल्या. त्या कादंबर्‍यांनाही वाचकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. याचे कारण धारपांची खास लेखनशैली ही गूढ व भय कथांसाठी योग्य असली तरी ती सामाजिक कादंबर्‍यांसाठी योग्य नव्हती, असेच म्हणावे लागते. संथपणे उत्सुकता वाढवत नेणारे त्यांचे लेखन सामाजिक कादंबर्‍यांत अनपेक्षित धक्का देणारे प्रसंग नसल्यामुळे सपक वाटते.

धारपांनी आणखी एक प्रयोग केला. एका प्रकाशकाच्या आग्रहाला बळी पडून त्यांनी दर महिन्यास एक अशा सहा रहस्य-कथांचे लेखन केले. चक्रवर्ती चेतन हा त्यांच्या रहस्य-कथांचा नायक होता. लेसली शार्तरीज रहस्य कथा लेखकाच्या कथांचे हे भारतियीकरण होते. त्या काळात गुरुनाथ नाईक, शरच्चंद्र वाळिंबे यांच्यासारखे रहस्यकथाकार प्रचंड लोकप्रिय होते. दिवाकर नेमाडे हे रहस्य कथा क्षेत्रात आघाडीवर होते. हे सर्व रहस्य कथा लेखक जनसामान्यांच्या भाषाशैलीत वाचकांना विचार करायला वेळ मिळणार नाही, अशा झपाट्याने घडणार्‍या घटनांची मालिका वाचकांपुढे ठेवत असत. शिवाय त्यांच्या लेखनाचा झपाटा दांडगा होता. दर महिन्याला त्यांच्या वेगळ्या नायकांच्या कर्तृत्वाच्या कहाण्या लिहीत. धारपांना हा वेग पेलवणारा नव्हता. सहाव्या कथेनंतर ते या शर्यतीतून बाहेर पडले.

‘छाया’, ‘उत्तररंग’ यांसारख्या कौटुंबिक कादंबर्‍या; ‘एक पापणी लवली’, ‘विज्ञानकथा यात्रा’ यांसारखे विज्ञानकथा संग्रह लिहिले; या संग्रहाला विज्ञानकथेची समज असणारी सुजाण प्रस्तावना आहे. अवकाश-प्रवास, काल-प्रवास, संगणक, समांतर विश्व, वेगळ्या मिती, यंत्रमानव, वेगवेगळे ग्रह, असीमित अवकाश आणि अनंतकाळ अशा वेगवेगळ्या विषयांमुळे त्यांच्या विज्ञानकथेत विविधता आली आहेच, पण अनाकलनीय वाटणार्‍या घटनाही ते शास्त्राच्या चौकटीत बसवून दाखवतात.

भयकथाकार म्हणून तर त्यांनी जनमानसावर गारुड केले आहे. ओसाड जागा, तळघरे, झपाटलेल्या भग्न वा भव्य वास्तू, निसर्गातली भयप्रद स्थळे, अतिप्राचीन अघोरी शक्ती, नकळतपणे वा लालसेने त्यांची केलेली उपासना, त्यांना हवा असणारा त्यांचा वाटा, अंतहीन नैवेद्य यांनी त्यांची कथासृष्टी गजबजलेली आहे. चक्काचूर, आशा, अपुर्‍या इच्छा (खिडकी); भंगलेली स्वप्ने (पिसाट) सतत येणारे अपयश- नकार, दुसर्‍यांकडून मन-शरीर चुरमडून जाईल असा छळ, असफल प्रेमाचे दारुण दुःख, अन्यायाची परिसीमा, अपत्य सुखाची लालसा वा त्यांच्यात जीव गुंतवणारे पाश, मृत्यूचा घाला या सार्‍यांतून काही आकार जन्माला येतात. कधी ते विनाशकारी बनतात, कधी त्याच आवर्तात अडकून पडतात (दार उघड ना ग आई, ज्वालेत उभी ती). यावर धारप लिहितात, ‘आणि मग या अशुभाच्या विरोधात मंगलशक्ती उभ्या ठाकतात.’ शुभा-शुभाच्या संघर्षाचे मायाजाल ते विणतात. ते म्हणतात, ‘धनाला ऋण बाजू असते तशीच शुभाला कृष्ण असते.’ पण धारप नेहमीच मांगल्याचा जय होताना दाखवतात.

कधी जागवलेल्या अघोरी शक्ती (‘बशीभर दूध’, ‘बलात्कारित जनीचा सूड’, ‘चल रानात सजणा’), अघोरी जबरदस्तीला अमानवी शक्तीचे उत्तर, कधी अपराधी मनानेच स्वतःला दिलेल्या शिक्षा (‘प्रायश्चित्त’, ‘सोबत’, ‘पानगळ’), श्रद्धेचे महत्त्व आणि परिणाम ‘श्रद्धा’ या कथेमधून व ‘देवाज्ञा’ या कादंबरीतून मृत्यूचा दाहक स्पर्श झालेल्या लोकांचे अनुभव आणि शक्ती ते रंगवतात.

धारप साक्षात दृश्यचित्रात्मक प्रसंग उभे करतातच. पण गंध, नाद, वेग, आणि स्पर्श ह्यांच्या अतितरल संवेदनेपासून अति तीव्रतेची खोल जाणीव घडवतात. तरीही त्यांचे खरे सामर्थ्य हे आहे की, अमानवी, असंभवनीय वाटणार्‍या घटनाही पूर्णतः खर्‍या वाटतात. कारण त्या वातावरणाची निर्मिती तसूतसूने, वीटवीट रचत वास्तूची चिरेबंदी घडण ते करतात. बारीक-बारीक तपशिलांनी जाळे विणतात आणि भयाची विविध रूपे दाखवतात.

नोकरी करणारे, सर्वसाधारण मध्यमवर्गीय, त्यांचा कोमट दिनक्रम, मध्यम शहरं, गावं, बसचा प्रवास असे सगळे सुरळीत चालू असतानाच भीतीने चुरगळून टाकणारे अनुभव अकल्पितपणे पुढे ठाकतात. वाचक त्यामुळे अधिक दचकतो. कधी अनपेक्षित कलाटणी येते (दुहेरी घार). अशा तर्‍हेच्या कथा-कादंबर्‍यांतूनही ते काही ठोस संस्मरणीय विधाने करतात.

त्यांनी गूढ कादंबर्‍या आणि कथासंग्रह मिळून सुमारे शंभर पुस्तकांची निर्मिती केली. ‘समर्थकथा’ लिहून ते वाचकांच्या गळ्यातले ताईत बनले. पण पुढे त्यांनी ‘समर्थकथा’ लिहिणे थांबवले. जयदेव आणि कृष्णचंद्र हे त्यांचे आणखी दोन नायक! याशिवाय ‘चंद्रविलास’, ‘नवदैवत’, ‘मृत्युद्वार’ अशा कादंबर्‍यांत त्यांनी नवनवे प्रयोग केले. अखेरच्या दिवसापर्यंत धारप लिहीत होते. २००८च्या दिवाळी अंकासाठीचे लेखन पूर्ण करून मगच त्यांनी चिरविश्रांती घेतली.

- प्रा. मीना गुर्जर

धारप, नारायण गोपाळ