Skip to main content
x

धाट, राजाराम गोपाळ

धाट, राजाभाऊ

       राजाराम गोपाळराव ऊर्फ राजाभाऊ धाट यांचा जन्म अंबेजोगाईतील केज तालुक्यात चिंचोली माळी येथे झाला. त्यांचे वडील गोपाळराव कर्तव्यनिष्ठ तहसिलदार होते. १९६२ मध्ये राजाभाऊंनी बी. एस्सी. पदवी प्राप्त केली. नंतर नोकरी करीत १९६५ मध्ये औरंगाबादच्या तत्त्कालीन मराठवाडा विद्यापीठातून (नंतरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) गणित विषयात एम. एस्सी. पदवी प्राप्त केली. त्याच वर्षी अंबेजोगाई येथील योगेश्‍वरी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले.

     काही काळ राजाभाऊ औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयात प्राध्यापकपदी कार्यरत होते. ते १९७०-७१ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. १९७२ मध्ये अंबेजोगाई येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्‍वर महाविद्यालयात त्यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकालात खोलेश्‍वर पूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित झाले.

      त्यांनी राबविलेले अनेक शैक्षणिक उपक्रम पुढे विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांमध्ये राबविले. त्यातील विद्यार्थी संसदेच्या निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण टाळून त्यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग उल्लेखनीय आहेत. सतत ११ वर्षे ‘खोलेश्‍वर’ मध्ये विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक बिनविरोध होत असे. राजाभाऊ ३३ वर्षे खोलेश्‍वर महाविद्यालयाचे प्राचार्य होते. प्राचार्यपदी काम करीत असतानाच, १९७७ मध्ये भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिव पदी त्यांची निवड झाली. राजाभाऊंच्या सचिव पदाच्या कार्यकाळात १५ प्राथमिक व १४ माध्यमिक शाळा, ३ कनिष्ठ व ३ वरीष्ठ महाविद्यालये इतका संस्थेचा विस्तार झाला. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आणि भविष्यातील आदर्श शिक्षक घडविण्यासाठी त्यांनी ‘विद्यासभा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली.

       राजाभाऊ तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, अधिसभा त्याचबरोबर विविध समित्यांचेही सदस्य होते. मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. कुपोषण अभ्यास समिती, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समिती, ‘वैद्यनाथन समिती’च्या संदर्भातील प्रशिक्षण समिती यांचे प्रमुख राजाभाऊ राहिले आहेत.

       राजाभाऊ १९८४ ते २००३ ‘दीनदयाळ शोध संशोधन’ या संस्थेचे बीड जिल्ह्याचे प्रमुख होते. राजाभाऊंनी ‘अंकुर प्रतिष्ठान व संशोधन केंद्र’ स्थापना केली. अंबेजोगाई परिसराचा आर्थिक विकास साधण्यासाठी राजाभाऊंनी १९९७ मध्ये ‘दीनदयाळ नागरी सहकारी बँके’ची स्थापना केली. आणीबाणीच्या काळात ते १९ महिने कारावासात होते. ते विविध सामाजिक व शिक्षणक्षेत्राशी संबंधित आहेत. २००४ ते २००६ या काळात ते ‘सहकार भारती’चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. अनेक वर्तमानपत्रातून राजाभाऊंनी शिक्षण, कृषी, सहकार, या विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.

    -श्रीनिवास श्रीकांत जोशी

धाट, राजाराम गोपाळ