Skip to main content
x

धायबर, केशव

     केशव धायबर यांचा जन्म कोल्हापूरपासून जवळच असलेल्या कुरुकली या लहान खेड्यात झाला. त्यांच्या जन्मानंतर काही महिन्यातच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना ‘वाईट पायगुणाचा’ ठरवून त्यांच्या आईने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्यांच्या मूळ आईचे नाव रखमाबाई डेळेकर होते. बडोद्याच्या सरदार घराण्यातल्या स्त्रीने त्यांचा सांभाळ केला. ज्या सरदार घराण्याने केशवरावांचा सांभाळ केला, त्यांचे आडनाव धायबर होते, म्हणून त्यांचे नाव ‘केशवराव धायबर’. केशवरावांनी त्या काळानुसार व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत शिक्षण घेतले. इंग्रजी शिक्षण घरातच सुरू केले.

     वयाच्या सतराव्या वर्षीच ‘मा’नी त्यांचे लग्न लावून दिले आणि सहा महिन्यातच त्या वारल्या. सांभाळलेला मुलगा म्हणून ‘मा’च्या वारसदारांनी केशवरावांची अवहेलना सुरू केली. त्यामुळे नेसत्या वस्त्रानिशी त्यांनी घर सोडले आणि त्यांच्या पत्नीच्या - म्हणजे भाऊसाहेब बोधे यांच्या घरी राहू लागले. पुढे दीड वर्षातच त्यांच्या पत्नीचे - लक्ष्मीचे निधन झाले. त्यानंतर धायबर सैन्यात सी.के. लान्सरमध्ये दाखल झाले. चार वर्ष सैन्यात नोकरी केल्यानंतर ते कोल्हापूरला परत आले. शाहू महाराजांच्या ओळखीने त्यांना अबकारी अधीक्षकाची नोकरी मिळाली.

      १९१५ साली शाहू महाराजांनी विनायक घोरपडे यांच्या बहिणीबरोबर केशवराव धायबर यांचे दुसरे लग्न लावून दिले आणि ते कोल्हापूरला स्थायिक झाले. या काळात थिएटरमध्ये जाऊन ते चित्रपट पाहू लागले. बाबूराव पेंटर यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि बाबूरावांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते काम करू लागले आणि प्रख्यात नट गणपत जोशी यांची नाटकेही पाहू लागले. त्यांच्या सहजसुंदर अभिनयाचा धायबरांवर प्रभाव पडला आणि तेही अभिनय करण्याचा प्रयत्न करू लागले.

      महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या ‘सैरंध्री’ या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू झाली. या चित्रपटात केशव धायबर यांना अर्जुनची म्हणजे बृहन्नडेची भूमिका मिळाली. ही भूमिका करत असतानाच धायबर कॅमेऱ्याचे तंत्र आत्मसात करत होते. फिल्म डेव्हलपिंग, प्रिंटिंग, एडिटिंग अशी तंत्रेही त्यांनी कष्टपूर्वक आत्मसात केली. १९२० साली ‘सैरंध्री’ चित्रपट पुण्यात आर्यन चित्रपटगृहात दाखल झाला.

      पुढे महाराष्ट्र फिल्म कंपनीचे ‘वत्सलाहरण’, ‘सावकारी पाश’ (१९२५), ‘मायाबाजार’ (१९२५), ‘सिंहगड’ (१९३३),  ‘कृष्णावतार’, ‘सावित्री’ (१९३६), ‘भक्त दामजी मार्कंडेय’ (१९३७), असे चित्रपट काढले. डेव्हलपिंग, प्रिंटिंग व एडिटींग खात्यात धायबर स्वतंत्रपणे काम करू लागले. त्यानंतर धायबर यांनी ‘नेताजी पालकर’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. पुढे १ जून १९२९ रोजी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली, त्या चार भागीदारांपैकी एक भागीदार होते केशवराव धायबर. त्यांनी ‘राणीसाहेब’, ‘गोपाळकृष्ण’ या चित्रपटात भूमिका केल्या. ‘चंद्रसेना’ चित्रपटाची जुळवाजुळव सुरू झाली आणि धायबरांनी कॅमेरा हाती घेतला. त्यानंतरच्या ‘जुलूम’ या चित्रपटाचे केशव धायबर यांनी दिग्दर्शन केले.

     प्रभात फिल्म कंपनीने ‘अयोध्येचा राजा’ (१९३२), ‘अग्निकंकण’ (१९३२), ‘मायामच्छींद्र’ (१९३२) असे चित्रपट काढले. ‘अमृतमंथन’ (१९३४) चित्रपटाच्या निर्मितीपर्यंत प्रथम श्रेणीचे कॅमेरामन म्हणून धायबर यांचा बोलबाला झाला होता. पुढे त्यांनी प्रभात फिल्म कंपनी सोडली आणि दादासाहेब तोरणे यांचा सरस्वती स्टुडिओ चालवण्यास घेतला आणि जयश्री फिल्म कंपनी स्थापना करून मो.ग. रांगणेकरांच्या कथेवर आधारित ‘नंदकुमार’ या चित्रपटाची निर्मिती केली.

     नंतर मिनर्व्हा मुव्हीटोनने केशवराव धायबरांना एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली. चित्रपट होता ‘अकरावा अवतार’ (१९३९). बडोद्याचे महाराज प्रतापसिंगराव गायकवाड यांच्या राज्यारोहण समारंभाचा चित्रपट त्यांनी केला. पुढे सहा वर्षे सोहराब मोदींच्या मिनर्व्हा मुव्हीटोनमध्ये त्यांनी काम केले. या काळात केशवराव धायबर यांनी ‘उलटी गंगा’ आणि ‘रथदास’ या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि १९४४ साली प्रभात कंपनीतूनच दामलेमामांचे बोलावणे आल्यावर ते मिनर्व्हा मुव्हीटोन सोडून पुन्हा प्रभातमध्ये दाखल झाले. दरम्यान मे १९४० मध्ये प्रभातच्या अभिनेत्री नलिनी तर्खड यांच्याशी ते विवाहबद्ध झाले.

      दामलेमामांच्या निधनानंतर पुन्हा प्रभात कंपनी सोडून बाबूराव पै यांच्या फेमस पिक्चर्समध्ये केशवराव धायबर दाखल झाले. महाराष्ट्र सरकारतर्फे ‘श्रीकृष्ण का कल्याण कार्य’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, गुजराती भाषेतील ‘परिवार नियोजन’ आणि ‘महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र’ हे लघुपट (डॉक्युमेंटरीज) त्यांनी बनवले.

- स्नेहा अवसरीकर

धायबर, केशव