Skip to main content
x

धडफळे, मोहन गोविंद

     ट्टीचे शिक्षक व वक्ते, प्रस्थापित परंपरांच्या मूलगामी अर्थाचा सातत्याने धांडोळा घेणारा एक व्यासंगी विद्वान असा नावलौकिक मिळवलेले वाग्वैद्य मोहन गोविंद धडफळे हे प्राच्यविद्येच्या आधुनिक पिढीतील एक महत्त्वाचे नाव. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील इंग्रज अमदानीत रेल्वेमध्ये नोकरीला होते. तीन बहिणी व एक भाऊ अशी चार भांवडे असणाऱ्या धडफळे यांचे शालेय शिक्षण पुण्यामध्ये सुरुवातीला रमणबाग व नंतर मॉडर्न हायस्कूल या शाळांमध्ये झाले. अनुक्रमे १९५९ व १९६१ या वर्षात ते संस्कृत व पाली विषय घेऊन बी.ए. व एम.ए. परीक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. पुढे १९७७ मध्ये ‘Synonymic  Collocations in the Tipitaka: A Study’त्रिपिटकातील समानार्थक प्रयोग: एक अध्ययन या मध्ययुगीन भारतीय भाषाशास्त्राशी संबंधित विषयावर संस्कृत, प्राकृत भाषा व भाषाशास्त्राचे प्रख्यात विद्वान प्रा. वाग्वैद्य अ.मा. घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

     १९६१ ते १९९७ या कालावधीत त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात संस्कृत व पाली भाषांचे पूर्ण वेळ अध्यापन केले. याच काळात त्यांनी पुणे विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथेदेखील अतिथी— प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. ते पुणे विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांचे पीएच.डी.साठीचे मान्यताप्राप्त मार्गदर्शक होते.

     अध्यापनकार्यासोबत त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळली. १९८६ ते १९९२ या कालावधीत ते डेक्कन शिक्षण संस्थेच्या सचिवपदी होते. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या दहा वर्षांत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदाचा अतिरिक्त भारदेखील त्यांच्याकडे होता. १९९६ ते १९९९ दरम्यान टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला आणि ललित कला विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९९ ते २००२ तसेच २००६ ते २००८ या कालावधीत ते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद सचिव होते. १९९५ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचे ते स्थापनेपासून कार्याध्यक्ष आहेत. आपल्या संशोधन कारकीर्दीत त्यांनी पाली व संस्कृत यांसोबत प्राकृत, कन्नड व अवेस्ता या भाषांवरदेखील प्रभुत्व मिळविले. युरो-भारतीय भाषाशास्त्र, आर्य-भारतीय भाषाशास्त्र व द्रविडी भाषाशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय. त्यातूनही विशेषत्वाने दक्षिण-पूर्व आशियाई अध्ययन हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याच्या विषय.

     आपल्या कारकिर्दीत त्यांनी अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद व त्यासारख्या अन्य प्रतिष्ठित परिषदांमध्ये पाली-बौद्ध तिथी अध्ययन, द्रविडी भाषाशास्त्र, दक्षिण-पूर्व आशियाई अध्ययन तसेच वेद व अवेस्ता या विषयांच्या सत्राध्यक्षतेची धुरा अनेक वेळा सांभाळली. मुंबई विद्यापीठाची विल्सन फिलॉलॉजिकल लेक्चर्स, शिक्षण प्रसारक मंडळींची कौशिक व्याख्यानमाला, रत्नागिरीची कालिदास स्मृतिव्याख्यानमाला, स्वामी केवलानंद व्याख्यानमाला, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, एच.डी. वेलणकर स्मृती व्याख्यानमाला इत्यादी प्रसिद्ध व्याख्यानमालांमध्ये व्याख्याने देण्याचा मान त्यांना मिळाला. अमेरिकेतील शिकागो व मिशिगन विद्यापीठ येथे त्यांनी व्याख्याने दिली. तसेच इटलीतील तुरिन, फिनलंडमधील हेलसिंकी, जपानमधील क्योतो तसेच रुमेनियामधील बुखारेस्ट येथील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी निबंधवाचन केले.

     त्यांच्या संशोधनपर लेखनामध्ये  Some Aspects of (Buddhist) Literary Criticism (१९७५), Synonymic Collocations in the Tipitaka: A Study (१९८०), Indo-Italica (२००९), Sanskrit Language and its Grammer (२००९) या इंग्रजी व पाली बौद्ध संत साहित्य (२००४), साहित्य सावित्री (२००९), बौद्ध धर्म भाष्यकार : धर्मानंद कोसंबी (२०१०) या मराठी ग्रंथांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त त्यांनी प्रा. वा. शि. आपटे स्मृतिग्रंथ (१९७८) तसेच टिळक महाविद्यालय ऑफ एज्युकेशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या मानवी स्मृती (१९९३) या ग्रंथाच्या संपादनाचे महत्त्वपूर्ण काम केले. ग्रंथास पारितोषिक प्राप्त झाले.

     इंग्लिश व मराठी यांसोबत धडफळे यांनी अभिजात संस्कृत व पाली या भाषांतून स्वतंत्र ललित साहित्याची निर्मिती केली. यामध्ये त्यांची सरस्वतीसदनम्, वाजिराजमत्ताङ्गिनीयम् व अनसूयाशारद्वतम् (२०१०) ही तीन संस्कृत नाटके, तसेच धम्मानंदचरिया, गन्धियह्वचरियागाथायो या पाली पद्यरचना आणि उत्तरमारचरितम् या पाली नाटकाचा समावेश होतो. त्यांनी भगवद्ज्जुकम् या कवी बोधायन लिखित पारंपरिक संस्कृत प्रहसनाचे सरल संस्कृतमध्ये आधुनिक रूपांतर केले. त्यांच्या या अभिनव नाट्यकृतीला महाराष्ट्र शासनाच्या संस्कृत नाट्यस्पर्धेत पाच बक्षिसे मिळाली. त्यांनी फिल्म इन्स्टिट्यूटनिर्मित व के.बी. जॉन दिग्दर्शित पुन्वउत्थान या पहिल्या-वहिल्या पाली चित्रपटाचे संहितालेखन केले. एन.डी. कुलकर्णी यांच्या अष्टावक्रगीता, गंगाधर महांबरे यांच्या भावगीतकार ज्ञानेश्वर, डॉ. गं.ना. जोगळेकर यांच्या मराठीचे भाषाज्ञान व दिगंबर रणपिसे यांच्या महापरिनिर्वाणसूत्र या ग्रंथांना त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या. याच्या जोडीला इंग्लिश, मराठी व संस्कृत भाषांमधून विविध विषयांवरील शंभराहून अधिक संशोधनपर व ललित लेख त्यांच्या नावावर जमा आहेत.

     शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल प्रा. धडफळे यांना देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षण संस्थेचा ऋग्वेद पुरस्कार, पर्शिअन टीचर्स असोसिएशनचा दानिशमंद मुमताज-ई-फारसी पुरस्कार व इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीजचा ‘मंजुश्री पुरस्कार’, दिवंगत वाग्वैद्य ‘जयश्री गुणे पुरस्कार’ इत्यादी पुरस्कार मिळाले. बंगळुरू येथे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा महाभारत विषयक संशोधन यासाठी विशेष सत्कार झाला. गोवा राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्तेही त्यांचा गौरव करण्यात आला.

     संशोधन विषयांचे वैविध्य, त्यांची व्याप्ती व लेखनातील झपाटा ही प्रा.धडफळे यांच्या संशोधनाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणता येतील. शास्त्रीय विषयांचे ललित्यपूर्ण व मनोरंजक सादरीकरण हा त्यांच्या लेखनशैलीचा स्थायीभाव म्हणावा लागेल. विविध भाषा,त्यांतील शब्दरूपे, त्यांच्या अर्थच्छटा व त्यांचे परस्परसंबंध यांविषयीचे त्यांचे विचार मूलगामी व नाविन्यपूर्ण आहेत. विविध परंपरा, पारंपरिक संकेत व तात्त्विक मतप्रवाह यांचा मागोवा घेण्यात त्यांचे संशोधन गुंतलेले दिसते. संपर्कात आलेल्या महनीय व्यक्तींविषयीचा पुरेपूर आदर व त्यांच्याशी असलेले भावनिक नातेसंबंध त्यांच्या चरित्रात्मक लेखनातून प्रकट झाले आहेत. प्रा.धडफळे यांच्या संस्कृत व पाली रचना, त्या भाषांवरील त्यांची हुकमत व त्यांनी कमावलेली अभिजात भाषाशैली यांचा प्रत्यय देणाऱ्या आहेत.

    — डॉ. महेश देवकर

धडफळे, मोहन गोविंद