Skip to main content
x

धिरणीकर, राम व्यंकटेश

स्वामी राम

    पल्या ‘रामतरंग माता’, ‘स्मृती कुंज’,’Expermiments with Faith’ दृष्टियोग’, ‘गीताशक्ती’, ‘कल्पवृक्ष’ अशा आध्यात्मिक, योगिक अतींद्रिय अनुभवांवरील ग्रंथांमुळे भारतातच नव्हे, तर अमेरिका-युरोपमध्ये विख्यात असलेले संत श्री स्वामी राम यांचा जन्म विदर्भातील तेल्हारा या गावी ज्येष्ठ शुद्ध दशमी या तिथीला, पहाटे ४ वाजता झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. घरातील वातावरण धार्मिक असल्याने लहानपणापासूनच रामला भक्ती, अध्यात्म, साधना यांचे वेड होते. ‘धु्रव आख्यान’, ‘व्यंकटेश स्तोत्र’ या पोथ्यांचे नित्यनेमाने वाचन, गुरुचरित्राचे पारायण आणि रामनामाचा जप हा त्याचा आवडता छंद होता. त्यांचे अकोला येथे शिक्षण झाले. ते १९२० साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. अकोला, कानपूर, मुंबई येथील कापड गिरण्यांमध्ये त्यांनी काही वर्षे नोकरी केली; पण ईश्वराच्या ओढीमुळे त्यांना नोकरीत फारसा रस वाटत नव्हता. धरसोड सुरू होती. ते असेच एकदा नोकरीच्या शोधार्थ ग्वाल्हेरला गेले. तेथे त्यांनी तीन दिवसांत गुरुचरित्राचे पारायण केले. पारायणानंतर ब्राह्मण-फकीर यांना भोजन देता आले नाही अशा चिंताग्रस्त अवस्थेत ते जयाजी पार्कमध्ये बसले असता, एक दाढीवाला, तेजस्वी साधू येऊन त्यांना भेटला. त्याला द्यायला जवळ काहीच नसल्याने त्यांनी अंगावरचा कोट काढून दिला व हा नवा कोट विकून आपण भोजन करावे अशी प्रार्थना केली. ‘‘तू पुढे साधनेने इडा-पिंगला नाड्यांवर प्रभुत्व मिळवशील व आध्यात्मिक वैभवात राहशील,’’ असा आशीर्वाद देऊन साधू निघून गेला. ही घटना रामच्या जीवनाला नवे वळण देणारी ठरली. त्यांना एक नवी दिशा, एक नवा जोम प्राप्त झाला. त्यांनी अत्यंत गंभीरपणे साधनेला प्रारंभ केला. दिल्लीहून हरिद्वार पायी भ्रमंती करीत, गंगापार करून चामुंडा जंगलात त्यांनी एकांतवासात तपश्चर्या केली.

      पुढे गढमुक्तेश्वर इथे गायत्री पुरश्चरण करून ते अनुप शहराजवळील मांडण्याश्रमातले हटयोगी स्वामी योगानंद यांना भेटले. तेथे योगासनाचा सूक्ष्म अभ्यास करून १९३० मध्ये त्यांनी ‘सचित्र योगासन’ हे पुस्तक प्रकाशित केले. आता त्यांना ओंकार-साधना अधिक आवडू लागली व त्यांनी सहा आठवडे सकाळी, उगवत्या सूर्याकडे पाहत त्राटक साधना केली. इथे त्यांना लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ वाचण्यास मिळाले व गीतेचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांनी ‘गीतापाठ’ पुस्तक लिहिले. अयोध्येत त्यांनी मणिपर्वतावर मोठ्या आवाजात ओंकार जप केला. इथे त्यांना गायत्रीचे दिव्य-दर्शन झाले. पुढे सिमला, श्रीनगर अशी साधनेची, तपश्चर्येची नवी ठिकाणे शोधून त्यांनी एकांत साधना केली. १९३३-३४ मध्ये त्यांना स्वत:चा आश्रम स्थापन करण्याची इच्छा झाली व काश्मीरमध्ये निशांत बाग येथे त्यांनी ‘गोपीतीर्थ’ नावाचा पहिला आश्रम स्थापन केला. 

      हिमालयात बर्फ पडण्यास प्रारंभ झाल्यावर हिवाळ्यात त्यांनी आश्रम सोडून पुणे, मुंबई, नागपूर, जबलपूर, बेळगाव, धारवाड याप्रमाणे दक्षिण भारतात भ्रमंती करीत व योगप्रचार करीत पुढे गंगा नदीचा विरह होऊ नये म्हणून  त्यांनी गंगेकाठी ‘रामकुंज’ आश्रम बांधला. त्यांच्या आर्थर नावाच्या शिष्याने हा आश्रम त्यांना बांधून दिला. या आश्रमात ते १९६२ ते १९७२ अशी दहा वर्षे राहिले.

       या दरम्यान अमेेरिका-युरोपात त्यांचा शिष्यवर्ग खूप वाढला व त्यांच्या आग्रहाने स्वामी रामांचे वरचेवर विदेश दौरे, व्याख्याने, ध्यानशिबिरे सुरू झाली. १९६४ ते १९७२ दरम्यान ते सहा वेळा अमेरिकेत जाऊन आले होते. या देशात त्यांना अनेक शिष्य मिळाले. उच्चविद्याविभूषित ‘ट्रेडवेल’ नावाची महिला त्यांपैकी प्रमुख होती. ती स्वामींबरोबर भारतात आली आणि योगविद्येत पारंगत झाली. १८ एप्रिल १९७२ रोजी ते ट्रेडवेलसमवेत अमेरिकेला गेले असता, त्या दौऱ्यातील प्रचंड व्यस्ततेमुळे व तब्येतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना खोकल्याची व्याधी झाली. छातीत दुखायला लागले. डॉक्टरांनी तपासून औषध दिले; पण हीच आपल्या जीवनाची सांगता आहे हे लक्षात घेऊन स्वामी राम यांनी ट्रेडवेल व शिष्यांसमोर योगक्रियेने समाधी घेतली. त्यांचे पार्थिव अमेरिकेतून हरिद्वारला आणून त्यावर गंगेकाठी अंतिम संस्कार केले गेले.

विद्याधर ताठे

धिरणीकर, राम व्यंकटेश