Skip to main content
x

धोंड, प्रल्हाद अनंत

              लरंगात सागराची निसर्गचित्रे रंगवणारे चित्रकार आणि सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे विभागप्रमुख व संचालक म्हणून समृद्ध व्यक्तिमत्त्व लाभलेल्या प्रल्हाद अनंत धोंड यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण मालवणात झाले. तिथे असताना पेडणेकर मास्तरांचे संस्कार आणि फर्नांडिस मास्तरांचे कलाकौशल्य त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले. पुढे मुंबईचे वातावरण अनुकूल ठरेल म्हणून त्यांनी राममोहन विद्यालयामध्ये प्रवेश घेतला. प्रथमपासून नाटक व क्रिकेटचा छंद असलेल्या धोंड यांनी तिथे अनेक सांस्कृतिक उपक्रमांमधून भाग घेतला.

              धोंड यांची चित्रकलेची आवड ओळखून त्यांच्या काकांनी त्यांना शालेय शिक्षणानंतर, १९३० मध्ये, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यास प्रवृत्त केले. जे.जे.मधील रावबहादूर धुरंधर, ग्लॅडस्टन सॉलोमन, अनंत आत्माराम भोसुले या शिक्षकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला.

              त्यांनी १९३४ साली पदविका, १९३५ साली शिक्षक प्रशिक्षण विभागाची पदविका प्राप्त केली आणि १९३७ साली आर्टमास्टरची परीक्षा देऊन आपले कलाशिक्षण पूर्ण केले. जे.जे. मध्ये शिकत असताना, सन १९३२ मध्ये मुंबई सरकारने बचत योजनेच्या शिफारशींसाठी टॉमस कमिटी नियुक्त केली. या टॉमस कमिटीने सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट बंद करण्याचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा त्या विरोधातली चळवळ उभारण्यात ग्लॅडस्टन सॉलोमन यांच्या सोबतच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून धोंड व धोपेश्‍वरकर हे अग्रेसर होते. त्या चळवळीमुळे स्कूल ऑफ आर्ट तरले. कला-शिक्षकाचा पेशा पत्करायचा म्हणून पदविका पूर्ण केल्यानंतर मिळणारी दोन वर्षांची म्युरलची शिष्यवृत्ती त्यांनी नाकारली आणि शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून पुण्याच्या शिवाजी मिलिटरी शाळेत नोकरी पत्करली. याच दरम्यान त्यांचा विवाह बेळगाव येथील हिरा गवाणकर यांच्याशी झाला. त्यांची १९३८ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या शिक्षक प्रशिक्षण विभागप्रमुखपदी  नेमणूक झाली. पुढे १९५८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांची सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या अधिष्ठातापदी निवड झाली. त्या पदावर त्यांनी सहा वर्षे काम केले. व्ही.एन. आडारकर संचालक पदावरून निवृत्त झाल्यावर धोंड यांनी संचालक म्हणूनही काम पाहिले.

              विलक्षण स्मरणशक्ती आणि रंजक किस्से सांगून गप्पांची मैफल रंगवण्याची हातोटी ही धोंड यांच्या व्यक्तिमत्त्वाची खासियत होती. धोंड यांनी जे.जे.मधील कारकिर्दीत कलानिर्मितीला पोषक वातावरण निर्माण केले. त्यांच्या तोंडून बॉम्बे स्कूलच्या परंपरेतील चित्रकारांचे किस्से ऐकले की, आपणही असे काहीतरी करावे अशी इतरांना प्रेरणा मिळत असे. ‘रापण’ या आत्मवृत्तातून सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचा पन्नास वर्षांचा इतिहास त्यांनी उलगडून दाखवला आहे. जे.जे.चा हा मौखिक इतिहास संभाजी कदम यांनी शब्दांकन केल्यामुळे पुस्तकाच्या रूपात टिकून राहिला. रावबहादूर धुरंधर यांच्या ‘कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या आत्मकथनाप्रमाणेच ‘रापण’लाही कलेच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. खाजगी गप्पांची मैफल रंगवण्यासोबतच त्यांचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी व रंजक असे व त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच प्रेरणाही मिळे.

              धोंड यांच्या निसर्गचित्रांना ‘समुद्रचित्रे’ अथवा ‘सीस्केप्स’ म्हणून संबोधले जाते. संथपणे फेसाळणाऱ्या, तर कधी उफाळणाऱ्या , खवळलेल्या लाटा, नारळाच्या उंच झाडांची सळसळ, पावसाने चिंब भरलेले ढग आणि कोळ्यांची मासे पकडण्याची लगबग अशा सर्व गोष्टींनी धोंड यांच्या निसर्गचित्रांत सागरकिनारे जिवंत होतात. महाराष्ट्रातले आणि गोव्यातले जवळपास सर्व किनारे, तसेच केरळमधील काही किनारे, रंगाने ओथंबलेल्या कुंचल्याच्या फटकार्‍यांमधून त्यांनी जिवंत केले आहेत. रंगांची तीव्रता, जलरंगांचा प्रवाहीपणा, बारीकसारीक तपशील भरत न बसता रंगांच्या फटकाऱ्यांनी  सूचित होणारे वस्तूंचे आकार ही त्यांच्या समुद्रचित्रांची वैशिष्ट्ये आहेत. विशिष्ट मूड आणि वातावरणनिर्मिती यांमुळे धोंड यांची शैली लक्षात राहते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने मुंबईत व इतर ठिकाणी झाली व त्यांची चित्रे देश-विदेशांत अनेकांच्या संग्रही आहेत.

              वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी केरळला भेट देऊन तेथील किनारे त्यांनी चित्रांच्या माध्यमातून जिवंत केले. ही त्यांची शेवटची चित्रमालिका ठरली.

सुधाकर लवाटे

संदर्भ
संदर्भः धोंड, प्रल्हाद अनंत; ‘रापण’; मौज प्रकाशन, मुंबई; १९७९.
धोंड, प्रल्हाद अनंत