Skip to main content
x

धर्माधिकारी, नानासाहेब विष्णुपंत

  युष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाज प्रबोधन आणि व्यसनमुक्तीच्या कार्याला वाहून घेणाऱ्या नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म कोकण भूमीतील रेवदंडा येथे झाला. त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव शेंडे होते. त्यांच्या भूतकाळातील आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामणी शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करीत. त्या काळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने ‘धर्माधिकारी’ ही पदवी दिली. तेव्हापासून हे घराणे धर्माधिकारी हे आडनाव लावू लागले आणि या नावाला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले. या कामाला चारशे वर्षांची परंपरा आहे.

नानासाहेबांचे वडील विष्णुपंत हेच नानांचे आध्यात्मिक गुरू आणि प्रेरणास्थान होते. नानासाहेबांनी १९४५ साली, वयाच्या तेविसाव्या वर्षी वडिलांच्या प्रेरणेने ‘श्री समर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समिती’ची रेवदंडा येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर स्थापना केली आणि आपल्या कार्याचा शुभारंभ केला. केवळ सात श्री सदस्यांनी प्रारंभ झालेल्या या कार्याची व्याप्ती आता लाखो श्री सदस्यांपर्यंत पोहोचली आहे.

धर्माचरणाविषयी ते प्रामुख्याने अज्ञान, अंधश्रद्धा, भेदाभेद,व्यसनासक्ती, स्त्रियांवरील अत्याचार, दुष्ट प्रवृत्तींचे उच्चाटन या विषयांवर बोलत. आधुनिक काळाच्या संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. अध्यात्माचे धडे देतानाच नानांनी शेकडो खेडी, आदिवासी पाडे यांची भ्रमंती केली आणि लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे हजारो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले. नानांच्या प्रेरणेने आता गावोगावी वाड्या-रस्त्यांवर ‘बैठका’ होत आहेत. या बैठकांची संख्या काही हजारांच्या घरात पोहोचली. बैठक म्हणजे तीन तासांचा शिस्तबद्ध सत्संग. या एका बैठकीत सुमारे २०० नाम-साधक सहभागी होतात. मनाचे श्लोक, दासबोधाचा, मंगलाचरणाचा एक समास आणि त्यानंतर गेल्या बैठकीत झालेल्या समासाच्या पुढील समास व  निरूपण असा त्या बैठकीतील सत्संगाचा एक क्रम असतो. आळीपाळीने, क्रमाक्रमाने एकेका साधकाने दासबोधातील एकेक समास वाचन करायचे, असे या बैठकीचे स्वरूप सामूहिक सहभागाचे आहे. या बैठकीत सामाजिक एकता व समरसता आपोआप निर्माण होते. जातपात, उच्चनीच, श्रीमंत-गरीब असे सारे भेद नामभक्तीच्या भावावस्थेतच विरून जातात. ‘कोणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे॥’ या उदात्त व्यापक विचारांचा संस्कार रुजविला जातो.

नानांनी साधकांना अंधश्रद्धाळू, कर्मकांडी वा पलायनवादी बनवलेले नाही, तर प्राप्त कर्म ईशकर्म समजून करण्याचा श्रद्धाभाव जागवला आहे. आजसुद्धा मराठीबरोबरच हिंदी, उडिया, तमिळ, बंगाली या भाषांतून निरूपण केले जाते. सुरुवातीला महिला व पुरुषांच्याच बैठका होत असत. मात्र, बालवयापासूनच संस्कार व्हावेत या दृष्टिकोनातून बालोपासना सुरू करण्यात आली.

नानांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते एवढे लाखो साधक, अनुयायी मिळाल्यावरही ‘बाबा’, ‘महंत’, ‘महाराज’, ‘बुवा’ न होता ‘नाना’च राहिले; त्यांनी मठ स्थापून मालमत्ता कधीच जमा केली नाही. नानांनी गेली चौसष्ट वर्षे अव्याहतपणे चालवलेल्या अशा या डोळस भक्तिकार्यामुळेच महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ गौरव घोषित केला; पण तो स्वीकारण्यापूर्वीच नानासाहेब अनंतात विलीन झाले. त्यांचे चिरंजीव दत्तात्रेय ऊर्फ अप्पासाहेब आणि नातू सचिन हे  त्यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्याची धुरा तेवढ्याच निष्ठेने, तळमळीने व जोमाने पुढे चालवीत आहेत.

नानासाहेबांना १९९३ मध्ये जिल्हा परिषदेतर्फे ‘रायगडमित्र’ पुरस्कार, १९९९ मध्ये पुण्यातील समर्थ व्यासपीठातर्फे ‘शिवसमर्थ’ आणि ‘समर्थ रामदास स्वामी भूषण’ पुरस्कार, १९९७ मध्ये ‘महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक’ पुरस्कार, २००३ मध्ये ‘शिवराज प्रतिष्ठान’ पुरस्कार, तसेच २००५ साली त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘डी.लिट.’ ही पदवी प्रदान करण्यात आली. २००२ मध्ये हिरवळ प्रतिष्ठानचा ‘समाजभूषण’ पुरस्कार मिळाला. २००८ साली जाहीर झालेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्वीकारण्यास नानासाहेब हयात नव्हते, त्यामुळे हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव अप्पासाहेबांनी स्वीकारला. या सोहळ्याला ४० लाखांहून अधिक लोक जमा झाले. या गर्दीच्या उच्चांकाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉडर्स’मध्ये घेण्यात आली.

   — विद्याधर ताठे

धर्माधिकारी, नानासाहेब विष्णुपंत