Skip to main content
x

ढवळे, वामन रावजी

 

वामन रावजी ढवळे यांचा जन्म उरणजवळ (जि.रायगड) मुळेखंड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आधी करोळी येथे आणि नंतर राजापूर येथील विश्वनाथ विद्यालयात झाले.

शालेय जीवनातच त्यांनी ‘बालशाहीर’ या नावाने काव्यलेखनाला सुरुवात केली.

सेन्ट झेविअर्स महाविद्यालयातून ढवळे यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली.

ते स्वतः साहित्यनिर्मिती करीत असले, तरी वाङ्मय क्षेत्रातले त्यांचे चिरस्थायी स्वरूपाचे काम दोन प्रकारचे आहे. एक म्हणजे मर्मज्ञ संपादक म्हणून आणि दुसरे साहित्य संस्थेतला तळमळीचा कार्यकर्ता म्हणून.

‘लोकमान्य’ (१९३०-३३), ‘पारिजात’ (१९३४-रघुवीर सामंतांसह), ‘पखरण’ (१९३५), ज्योत्स्ना (१९३६ ते १९४१), ‘समीक्षक’ (१९४१), ‘रागिणी’ (१९४४-१९४५), ‘साहित्य’ (१९४७ ते १९५२), ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ (१९५५ ते १९६१) अशा नियतकालिकांचे समर्थपणे संपादन करताना ढवळे यांची स्वागतशील, खुली, बदलत्या वाङ्मयीन-सांस्कृतिक पर्यावरणाला सुजाणपणे सामोरे जाण्याची वृत्ती उपयोगी पडली. साहित्याच्या नव्या प्रवाहांचे महत्त्व त्यांनी जाणले आणि त्यांना उचित प्रसिद्धी देण्याची संपादकीय भूमिका त्यांनी घेतली.

अनेक ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. ‘कविवर्य तांबे-साहित्यविचार’ (१९७४), ‘एका पिढीचे आत्मकथन’ (संयुक्त संपादन) (१९७५), ‘मराठी रंगभूमी-मराठी नाटक’ (संयुक्त संपादन) (१९७१) ‘कविता फुलते अशी’ (संयुक्त संपादन) (१९७८), ‘मराठी कविता’ (१९२०-१९५०), ‘मराठी कविता-प्राचीन कालखंड’ (११५०-१८४०) अशा अनेक महत्त्वाच्या संपादित ग्रंथांबरोबर ढवळे यांची ‘रेषा’ (कविता), ‘डी.जी.तेंडुलकर चरित्रकार’, ‘खांडेकर- मित्र आणि माणूस’ ही स्वतःची पुस्तकेही प्रकाशित झाली.

विविध कारणांनी मासिकांचे विशेषांक काढण्याची प्रथा त्यांनी सुरू केली; आणि उत्तम मानपत्रांचे लेखन वेळोवेळी करून ‘मानपत्र’ या लेखनप्रकाराला प्रतिष्ठित रूप मिळवून दिले.

संपादनाखेरीज आणखी एक कार्य एखाद्या व्रतासारखे ढवळे यांनी केले, ते म्हणजे ‘मुंबई मराठी साहित्य संघा’चे कार्यवाह, कार्याध्यक्ष, संपादक (साहित्य), वाङ्मय व भाषा वर्गांचे संचालक अशा विविध रूपांत त्यांनी साहित्य संघाची धुरा ५०पेक्षा अधिक वर्षे सांभाळली.

उपक्रमशीलता हा त्यांचा आणखी एक विशेष. साहित्य क्षेत्रातील वादविवाद, संमेलनातील भाषणे इत्यादींची नोंद संपादक म्हणून ते मासिकातून आवर्जून घेत.

वाङ्मय क्षेत्रात चोखंदळ, रसज्ञ संपादक तसेच निरलस आणि निरपेक्ष कार्यकर्ता कसा असावा, याचा धडा वा.रा.ढवळे यांनी घालून दिला आहे.

साहित्य संस्कृतीच्या संवर्धनाच्या कार्याचा वसा घेऊन तो जन्मभर निष्ठेने पाळणारे वामन रावजी ढवळे यांचे नाव संपादन आणि संस्थात्मक कार्यात सुपरिचित आहे.

- मंदाकिनी भारद्वाज

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].