एन. रघुनाथन
एन. रघुनाथन यांचा जन्म नवी दिल्लीत झाला. त्यांचे वडील एका केंद्रीय कार्यालयात लघुलेखक (स्टेनो) होते. दिल्लीच्या सेंट स्टिफन्स महाविद्यालयामधून त्यांनी १९५७मध्ये प्राचीन इतिहास विषयात प्रथम श्रेणीत एम.ए. पदवी मिळवली. महाविद्यालयात अल्पकाळ अधिव्याख्याता म्हणून काम करताना ते १९५९ मध्ये आय.ए.एस. परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रात प्रशासनिक सेवेत दाखल झाले. त्यांनी ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती येथे व मंत्रालयात काम केेले. केंद्रीय कार्यालयात अन्न, नागरी पुरवठा, संरक्षण, नियोजन विभागात काम करून, व्यापक अनुभव घेऊन १९९३-९४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यसचिव पद त्यांनी यथार्थपणे भूषविले.
१९९३ सालच्या अभूतपूर्व घटनांनी रघुनाथन यांच्या गुणवत्तेची अतिशय सखोल, तितकीच व्यापक परीक्षा घेतली. कारण ज्या दिवशी त्यांनी कार्यभार स्वीकारला, त्याच दिवशी दुपारी १-२० वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत मुंबई एका पाठोपाठ झालेल्या बारा स्फोटांच्या मालिकेने हादरून गेली. २६० माणसे मृत्युमुखी, ७१३ जखमी व सुमारे ५० कोटीच्या मालमत्तेची हानी झाली.
धैर्य व प्रसंगावधान राखून रघुनाथन यांनी ताबडतोब वरिष्ठ पोलीस व वरिष्ठ लष्करी अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांना तत्काळ अचूक आदेश दिले. सर्वत्र नाकेबंदी, वाहने तपासणे, टेलिफोन व वीज सेवा पूर्ववत आणणे, मोक्यांच्या जागी गस्त घालणे, स्फोट झालेल्या रक्तरंजित जागा धुऊन साफ करणे, इत्यादी विविध कामे त्यांनी युद्धपातळीवर करवून घेतली. आठवडाभर रघुनाथन स्वत: रोज अठरा तास काम करून राज्यातील एकूण परिस्थितीवर बारीक नजर ठेवून होते.
त्यानंतर दुसरा असाच कसोटीचा क्षण लातूरच्या भूकंपाच्या वेळी आला. ३० सप्टेंबर १९९३ रोजी सकाळी चार वाजता लातूर व आसपासच्या भागांत ६.४ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यात लातूर जिल्हा व उमरगा तालुक्यातील ६७ गावे भूकंपाच्या तडाख्यात सापडली. जवळजवळ दहा हजार मृत्यू, सोळा हजार जखमी झाले व तीस हजार घरे पडली, अशी या भूकंपाची तीव्रता होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूकंप होण्याचा हा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील पहिला प्रसंग होता.
रघुनाथन यांना या दुर्घटनेची सूचना पोलीस बिनतारी यंत्रणेवर सकाळी ६-०० वाजता मिळताच ते कार्यालयात पोहोचले, मंत्रालयाजवळच्या निवासातील सर्व सचिवांना त्यांनी तत्काळ बोलावून, (नियंत्रण कक्ष) (कंट्रोल रूम) ची स्थापना करून तेथे सचिव दर्जाचे अधिकारी २४ तास कार्यरत ठेवले आणि भूकंपग्रस्तांना लवकरात लवकर मदत पोहोचेल अशी व्यवस्था केली. यात प्रमुख कंपन्या, स्वयंसेवी संस्था, जवळची राज्य सरकारे यांच्याकडून, लष्कराकडून साहाय्य घेतले. लातूर, किल्लारी, उस्मानाबाद, उमरगा, सोलापूर येथे थेट दूरध्वनी (डायरेक्ट टेलिफोन, हॉटलाइन) सेवा उपलब्ध केली.
तंबूसाठी बांबू, पाले, डॉक्टरांची पथके, औषधे, धान्य, बेकरी उत्पादने, कपडेलत्ते, दूध इत्यादी आवश्यक वस्तू गोळा करवून त्यांची तत्परतेने रवानगी केली गेली. महत्त्वाचे म्हणजे रक्तपुरवठ्यासाठी रक्तपेढीची व्यवस्था केली आणि अध्येमध्ये कुठेही गैरवापर, गडबड न होता ही मदत भूकंपग्रस्तांपर्यंत पोहोचली. तेथे उत्तम वितरण व्यवस्था केली. अनेक औद्योगिक संस्थाही मदतीला धावून आल्या. मंत्रालयातील २४ तास कार्यरत नियंत्रण कक्षासाठी उपाहारगृहही जवळजवळ २४ तास काम करीत असे. प्रस्तुत मदतकार्यात जागतिक बँकेनेही योगदान दिले आणि योग्य विनियोग होतो आहे यावर लक्ष ठेवले. कसलेले प्रशासक एन. रघुनाथन यांच्यावर विलंबाचा डाग लागला नाही हे नमूद केले पाहिजे.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाचा ठराव वास्तविक १९८० मध्येच झाला होता. परंतु त्या चळवळीने नोव्हेंबर १९९३ मध्ये उसळी मारून उग्र रूप धारण केले. मुख्यमंत्री शरद पवार यांनी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून, जवळजवळ संमती मिळवली आणि १४जानेवारी१९९४ रोजी या बाबतचा अध्यादेश जारी करून या ज्वलंत प्रश्नास पूर्णविराम दिला. मुख्य सचिव या नात्याने रघुनाथन यांनी कायदा व सुव्यवस्था चिघळू न देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. स्काउट व गाइडच्या अनुदानाचा प्रश्न समोर आला तेव्हा त्या संस्थेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. केंद्रीय लोकसेवा आयोगासमोर त्यांची मुलाखत झाली होती. तेव्हा आयोगाच्या अध्यक्षांनी रघुनाथन यांच्या शालेय जीवनातील समाजकार्याविषयी विचारले व त्यांचा स्काउटमध्ये सहभाग होता हे ऐकून त्याचे नियम विचारले. त्यांनी दिलेल्या अचूक उत्तराने अध्यक्षांचे समाधान झाले. आय.ए.एस.साठीची मुलाखत पंधरा मिनिटांतच संपली आणि रघुनाथन ती परीक्षा उत्तीर्ण झाले. शालेय जीवनात स्काउटच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली आणि प्रशासक या नात्याने ती अखंडपणे चालू ठेवली.
रघुनाथन यांनी मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविलेच, त्याचप्रमाणे पंजाबी, गुजराती व तामीळमध्येही ते सहज वार्तालाप करू शकत. त्यांची स्मरणशक्ती जबरदस्त असून संस्कृत व पुरातत्त्व हे त्यांचे आवडीचे विषय होते. ज्योतिषशास्त्रावर त्यांचा विश्वास व त्याचा अभ्यास असला तरी त्यांनी प्रशासनाच्या कामात कोणताही अडथळा येऊ दिली नाही. विवेकी असल्याने कोणत्या कर्तव्याला प्राथमिकता द्यावी याचा ते निर्णय घेत. परदेशप्रवासाच्या संधीवर पाणी सोडून ते कर्करोगग्रस्त वडिलांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणी हजर राहिले.
आपल्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रात योग्य रेशन -पुरवठ्याची पद्धत राबवली. राज्य लॉटरी सुरू करण्याचे श्रेय त्यांनाच आहे. शेतकर्याकडील कापूस वाजवी भावात खरेदी करण्याची यशवंतराव मोहिते यांची कल्पना कार्यान्वित करण्यात त्यांनी मोठा हातभार लावला आणि अशी योजना महाराष्ट्रात तालुका पातळीपर्यंत राबविण्याचा धाडसी निर्णय घेतला. शासनातर्फे केंब्रिज येथे जाऊन त्यांनी पदव्युत्तर पदवी संपादन केली.
रघुनाथ आपल्या निर्णयावर ठाम असत. कोणतेही प्रलोभन त्यांना विचलित करू शकले नाही. सेवानिवृत्तीनंतर मुदतवाढ न स्वीकारण्याचा निर्णय हे याचे ज्वलंत उदाहरण. आदर्श प्रशासक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून एन.रघुनाथन यांचा निर्देश करावा लागेल. आस्थापूर्ण कार्यशैली व तत्परतेने वागणारा हा प्रशासक देशाच्या राजधानीत जन्मला आणि आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत शिल्पकाराची भूमिका यशस्वीपणे पार पाडून त्याच राज्याच्या ‘मुंबई’ या राजधानीत निधन पावला.
- वसंत फातर्पेकर