Skip to main content
x

गबाले, राम नारायण

राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथून पदवी प्राप्त केल्यावर राम नारायण गबाले यांनी मा. विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्स या संस्थेमधून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मा.  विनायक यांच्या मृत्यूनंतर ते प्रभात फिल्म कंपनीत यशवंत पेठकर यांच्या हाताखाली दिग्दर्शन करू लागले. त्या वेळेस १९४७ मध्ये राम गबाले यांना वंदे मातरम्या चित्रपटाच्या   स्वतंत्र दिग्दर्शनाची संधी मिळाली. या चित्रपटात पु.ल. देशपांडे व सुनीताबाई नायक-नायिकेच्या भूमिकेत होते. नंतर त्यांनी मंगल पिक्चर्सच्या मोठी माणसंया चित्रपटाचे दिग्दर्शन केले. पुढे मंगल पिक्चर्सच्याच देव पावला’ (१९५०) व जोहार मायबाप जोहार’ (१९५०) या दोन अत्यंत यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.

यानंतर अनेक चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन करून राम गबाले यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. त्यांचे दूधभात’ (१९५२), ‘जशास तसे’ (१९५२), ‘घरधनीदेवबाप्पा’ (१९५३), ‘पोस्टातली मुलगी’ (१९५४), ‘छोटा जवान’ (१९६३), ‘जिव्हाळा’(१९६८) असे अनेक चित्रपट गाजले व त्यासाठी राम गबाले यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

गबाले यांची मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्द प्रदीर्घ होती. त्यांनी देशभक्तीपर, समाजहिताच्या विषयावर २६हून अधिक मराठी व हिंदी चित्रपट बनवले. छोटा जवानया चित्रपटाला उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचे राष्ट्रीय स्तरावरील रजतकमलपारितोषिक मिळाले.

राम गबाले यांनी शेर शिवाजी’(१९८७) सारखे दहाहून अधिक बालचित्रपट बनवले. १००हून अधिक अनुबोधपट, १५ दूरदर्शनपट, मालिका, जाहिरातपट या सर्वांशी ते दिग्दर्शन व लेखक या नात्याने निगडित होते. गबाले यांनी रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांना गांधीया चित्रपटाच्या दिग्दर्शनात साहाय्य केले होते. पु.ल. देशपांडे यांच्या बटाट्याची चाळच्या निर्मितीत त्यांचा सहभाग होता. तसेच मुंबई व दिल्ली दूरदर्शनसाठी त्यांनी अनेक मालिकांची निर्मिती केली.

गबाले यांची फिल्म्स डिव्हिजनच्या संचालकपदी राष्ट्रीय स्तरावर नियुक्ती झाली होती. तसेच त्यांनी फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्यपदही भूषवले होते. गोरेगाव येथील चित्रनगरी उभारण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालकपदी, तसेच राजकमल स्टुडिओच्या व्यवस्थापकपदीही काम केले होते.

काळे गोरेया राम गबाले यांच्या लघुपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर जलदीपला व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरवले गेले. शतायू केसरीया त्यांच्या लघुपटाला विशेष पुरस्कार मिळाला, तर फूल और कलियाला (१९६१) पंतप्रधानांचे सुवर्णपदक मिळाले. त्यांना १९९९ मध्ये सोलापूरच्या श्रीराम पुजारी फाऊंडेशनचा पु.ल. देशपांडे - बहुरूपीपुरस्कार मिळाला. याशिवाय व्ही. शांताराम’, ‘गदिमा’, ‘नानासाहेब सरपोतदारयांच्या नावाचे पुरस्कारही त्यांना मिळाले. महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कारानेही राम गबाले यांना सन्मानित करण्यात आले होते. वार्धक्याने राम गबाले यांचे पुण्यात निधन झाले.

       - द.भा. सामंत

गबाले, राम नारायण