Skip to main content
x

गडकर, जयश्री गोविंद

       यश्रीच्या अभिनयाची तुलना करायचीच झाली, तर ती लताच्या गाण्याशीच करावी लागेल. संगीत क्षेत्रात लताचे जे श्रेष्ठत्व आहे, ते श्रेष्ठत्व जयश्री गडकरने अभिनय क्षेत्रात संपादन केले आहे’ असे मत दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांनी जयश्री गडकर यांच्याविषयी व्यक्त केले होते.

      कारवार जिल्ह्यातील सदाशिवगड तालुक्यातील कणसगिरी या गावी जयश्री गडकर यांचा जन्म झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षीच त्या मुंबईत आल्या. मुंबईत खेतवाडीतल्या महानगरपालिकेच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढे गिरगावच्या राममोहन हायस्कूलमधून त्यांनी शालान्त परीक्षा दिली. शिक्षणाची आवड असूनही त्यांना फार शिक्षण घेता आले नाही. मात्र लहानपणापासून त्यांना गाण्याची आवड होती. ताल-सुरांचे उपजत ज्ञान होते आणि गळाही गोड होता. त्यामुळे मास्टर नवरंग यांच्याकडे त्या गाणे शिकल्या.

      जयश्री गडकर यांनी १९५० - १९५४ या काळात हौशी रंगभूमीवर कामे केली. याच काळात त्या शास्त्रीय नृत्यही शिकल्या. जयश्री गडकर यांनी सुरुवातीच्या काळात राजकमल कलामंदिरात नोकरी केली.

     याच काळात व्ही. शांताराम यांना आपल्या ‘झनक झनक पायल बाजे’ (१९५५) या चित्रपटासाठी एका समूहनृत्यात सहनर्तिका हव्या होत्या. संध्या या चित्रपटाची नायिका होत्या. व्ही. शांतारामसारखे दिग्दर्शक आणि सप्तरंगी हिंदी चित्रपट या आकर्षणामुळे त्यांनी या चित्रपटात समूहनृत्यातून आपली नृत्यकला सादर केली. या नृत्याने त्यांना ‘दिसतं तसं नसतं’ या चित्रपटात एका नृत्यासाठी काम मिळाले. मात्र केवळ नृत्य करण्याइतकी भूमिका करायची नाही, असे त्यांनी या चित्रपटानंतर ठरवले. यानंतर ‘गाठ पडली ठका ठका’ या चित्रपटात नायिका म्हणून त्यांना प्रथमच भूमिका मिळाली. २१ मार्च १९५६ या दिवशी त्या नायिका म्हणून पडद्यावर आल्या, याच दिवशी योगायोगाने त्यांनी वयाची १६ वर्षे पूर्ण केली. १९५७ साली फिल्मिस्तानच्या ‘आई मला क्षमा कर’ आणि ‘पहिलं प्रेम’ या चित्रपटातून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. फिल्मिस्तानचा पहिला चित्रपट होता ‘आलिया भोगासी’. या चित्रपटात जयश्री गडकर यांनी राजा गोसावींबरोबर प्रमुख भूमिका केली आणि नंतरच्या कारकिर्दीत राजा गोसावींबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांतून नायिकेच्या भूमिका केल्या, त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

     यानंतर ‘चेतना चित्र’चा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘सांगत्ये ऐका’ (१९५९) या चित्रपटात जयश्री गडकर यांनी तमासगिरिणीची भूमिका रंगवली. हा चित्रपट मराठीतला सर्वात जास्त चालणारा चित्रपट ठरला. त्यातल्या ‘बुगडी माझी सांडली गं...’ या लावणी नृत्याने जयश्री गडकर यांना मराठी चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून कायमचे स्थान मिळाले. चित्रपट रसिकांना ही लावणी अजूनही भुरळ घालते. पुण्यात विजयानंद चित्रपटगृहात हा चित्रपट सलग १३२ आठवडे चालला. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला. १९५९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अनंत माने. याच चित्रपटातल्या भूमिकेने जयश्रीबाईंना ‘रसरंग फाळके पुरस्कार’ मिळवून दिला. त्यानंतर जयश्री गडकर यांनी जवळपास पन्नास वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवले. तमाशापटांबरोबरच अनेक कौटुंबिक, भावनाप्रधान, विनोदी, ऐतिहासिक चित्रपटांतूनही त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. एक चतुरस्र कलाकार म्हणून त्यांनी मराठी चित्रपटात आपला अमीट ठसा उमटवला.

     दरम्यानच्या काळात त्यांनी ‘एक अरमान मेरा’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला. अभिनेते अशोककुमार यांच्याबरोबर नायिकेची भूमिका असलेला ‘प्रायव्हेट सेक्रेटरी’ हा त्यांचा चित्रपट रसिकांच्या आजही लक्षात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत धार्मिक, पौराणिक चित्रपटात त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या. तसेच ‘सारंगा’ चित्रपटातील ‘सारंगा तेरी याद में...’ हे गाणेही रसिकांच्या स्मरणात आहे.

     मराठीत या काळात त्यांनी ‘सवाल माझा ऐका’, ‘साधी माणसं’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘घरकूल’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘पाटलाची सून’, ‘अवघाची संसार’, ‘मोहित्यांची मंजुळा’ इ. महत्त्वाच्या चित्रपटांतून प्रमुख भूमिका केल्या. उपजत साधेपणा, सौंदर्य, नृत्यकुशलता, अभिनयातील सहजता यांमुळे या सर्व भूमिका एकापेक्षा एक सरस ठरल्या. चित्रपट क्षेत्रातल्या त्यांच्या लोकप्रियतेबरोबर याच चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले. १९६१ साली प्रदर्शित झालेल्या ‘मानिनी’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वप्रथम ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला. पं. महादेवशास्त्री यांची कथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद आणि पटकथा व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिले होते. जयश्री गडकर यांनी यापूर्वी चित्रपटातून विशेषत: तमासगिरिणीच्या भूमिका केल्या होत्या. त्या नृत्यकुशल अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या; ‘मानिनी’तल्या सोज्ज्वळ, सात्त्विक, स्वाभिमानी ब्राह्मणकन्येची भूमिका जयश्री निभावेल का?’ असा प्रश्‍न त्या काळात चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांना पडला होता. मात्र या भूमिकेतही आपल्या सात्त्विक सौंदर्याने, मृदू व्यक्तिमत्त्वाने, अभिनयकौशल्याने जयश्री गडकर यांनी अभिनय क्षेत्रातील आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले. १९६४ साली ‘सवाल माझा ऐका’, १९६५ साली ‘साधी माणसं’, १९६६ साली ‘पवनाकाठचा धोंडी’ या चित्रपटांसाठी सलग राष्ट्रीय पुरस्कार मिळवून त्यांनी ‘हॅट्ट्रीक’ साधली.

     महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवातही ‘साधी माणसं’, ‘पाटलाची सून’,  ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘घर गंगेच्या काठी’ या चित्रपटातील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवले. ‘घरकूल’ चित्रपटासाठी १९७१ साली ‘विशेष अभिनेत्री’चा पुरस्कार देऊन राज्य सरकारने त्यांच्या समर्थ अभिनयाची, एकूण चित्रपट कारकिर्दीची वेगळी दखलही घेतली.

     साधारण १९५० ते १९६० या कृष्णधवल चित्रपटाच्या काळात जयश्रीबाईंनी भालजी पेंढारकर, राजा परांजपे, अनंत माने, दिनकर द. पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजा ठाकूर, गजानन जागीरदार, वसंत पेंटर यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांकडे काम केले. प्रत्येकाची वेगळी दिग्दर्शनशैली त्यांनी अनुभवली. त्यांनी राजा गोसावी, सूर्यकांत, चंद्रकांत, अरुण सरनाईक या सहकलाकारांबरोबर केलेल्या भूमिका विशेष गाजल्या.

     व्यक्तिरेखेच्या मागणीनुसार शिकत राहणे, परिश्रम घेत राहणे हा त्यांचा स्थायिभाव होता. भालजी पेंढारकरांच्या ‘साधी माणसं’ या चित्रपटासाठी त्यांनी लोहाराचा भाता चालवण्याचे तंत्र अवगत केले आणि मगच त्या कॅमेऱ्यासमोर गेल्या. भाता चालवतानाचे ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे..’ हे गाणे अजरामर ठरले.

     आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी २५० चित्रपटांतून भूमिका केल्या. स्त्रीचा स्वाभिमान, स्त्रीचा सूड, स्त्रीची माया-ममता अशा सगळ्या भावभावनांना त्यांनी पडद्यावर संवेदनशीलपणे जिवंत केले. याचबरोबर चित्रपट क्षेत्राशी निगडित असणाऱ्या ध्वनी, संकलन, चित्रीकरण, प्रकाशयोजना या तांत्रिक बाबीही त्या शिकत गेल्या. हिंदी, गुजराती, मारवाडी, पंजाबी, भोजपुरी, कन्नड, तेलगू या भाषांतील चित्रपटांतूनही त्यांनी अभिनय केला. शहरी तसेच ग्रामीण, मराठमोळ्या मराठी बोलीभाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते.

     ‘जगन्नाथाचा रथ’ या चित्रपटाचे नायक बाळ धुरी यांच्याशी १९७५ साली त्यांनी विवाह केला. राजू या मुलाच्या जन्मानंतरही त्यांनी चित्रपटातून भूमिका केल्या. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या दूरदर्शन मालिकेत या पतिपत्नींनी दशरथ-कौशल्येची भूमिका केली.

     मराठी चित्रपटातल्या भूमिका करत असतानाच जयश्री गडकर यांनी अण्णासाहेब घाडगे यांच्या ‘सासर-माहेर’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. चित्रपट यशस्वी झाला आणि दिग्दर्शिका होण्याचे त्यांचे स्वप्नही साकार झाले. त्यानंतर १९९६ साली त्या चित्रपट निर्मिती क्षेत्रातही उतरल्या. निर्मिती, कथा-दिग्दर्शन-अभिनय अशा भूमिका उत्तम सांभाळून त्यांनी चित्रपट बनवला ‘अशी असावी सासू’.

     मराठी चित्रपटसृष्टीतल्या या चौफेर प्रदीर्घ कारकिर्दीची दखल घेऊन ३० एप्रिल २००३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ दिला. त्यापूर्वीही १९९८ साली ‘गदिमा पुरस्कार’, २००१ मध्ये ‘झी अल्फा गौरव पुरस्कार’, २००४ साली जनकवी पी. सावळाराम स्मरणार्थ ‘गंगाजमुना पुरस्कार’, २००५ मध्ये ‘समाजदर्पण’, सिने अँड टीव्ही आर्टिेस्टतर्फे दिला जाणारा ‘सीण्टा’ पुरस्कार यासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार, सन्मान त्यांना लाभले. ‘नक्षत्रलेणं - सुवर्णनायिका जयश्री गडकर’ हे त्यांच्या पन्नास वर्षातल्या चित्रपट वाटचालीचा प्रवास अधोरेखित करणारे पुस्तक ‘जयश्री गडकर प्रतिष्ठान’तर्फे २००९ साली प्रकाशित झाले आहे. जयश्री गडकर या अभिनेत्रीचे मुंबई येथे निधन झाले.

     - स्नेहा अवसरीकर

गडकर, जयश्री गोविंद