Skip to main content
x

गणेशपुरे, हर्षा रमेश

         र्षा रमेश गणेशपुरे यांचा जन्म मूर्तिजापूर येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण सातव्या वर्गापर्यंत झालेले आहे. पुढील शिक्षण त्या घेऊ शकल्या नाहीत. त्यांचे लग्न १६ मे १९९१ रोजी रमेश गणेशपुरे यांच्याशी झाले. गणेशपुरे यांची शेती अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा येथे आहे. त्यांच्याकडे एकूण ४ एकर शेतजमीन आहे. ज्वारी, तूर, कपाशी, मूग इत्यादी पारंपरिक पिके घेऊन काहीच उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचा जीव मेटाकुटीस आला होता. त्यांना दोन मुले व एक मुलगी असा परिवार असल्यामुळे निव्वळ शेती करणे परवडत नव्हते. शेवटी त्यांनी पंचायत समितीमध्ये जाऊन तालुका कृषी अधिकारी अनिल बोंडे यांना आपली हकिकत सांगितली आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन २००२मध्ये आपल्या १० गुंठे जमिनीवर फूलशेतीची लागवड करण्याचे धारिष्ट्य दाखवले. त्यांनी १० गुंठ्यांपासून सुरुवात करून जवळपास ४ एकर जमिनीत फूलशेतीची लागवड केली. फूलशेतीमध्ये एक एकर ग्लॅडीओलस, एक एकर लीली, अर्धा एकर झेंडू, अर्धा एकर गुलाब, अर्धा एकर गॅलार्डिया अशी फुलांची निवड केली.

त्यांच्या शेतामध्ये कूपनलिका व एक विहीर होती. त्यामुळे पाणी देऊन फूलशेती जगवणे त्यांना शक्य झाले. त्यांनी इतर शेतकऱ्यांना फूलशेती फायदेशीर होऊ शकते हे दाखवून दिले. हर्षा यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून जवळपासच्या १० ते १२ शेतकऱ्यांनी फूलशेतीचा व्यवसाय सुरू केला आणि त्या सर्व कुटुंबांनी फूलशेतीमध्ये नफा कमावला. हर्षा यांना २००९-२०१०मध्ये भारत कृषक समाजातर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री कृषी वाहिनीने २०१०मध्ये त्यांचा सन्मान केला. त्यांना महाराष्ट्र पत्रकार व संपादक यांच्यातर्फे नवरत्न पुरस्कार दिला गेला. त्यांची अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी नियोजन समितीवर सदस्य म्हणून नेमणूक केली. त्या सध्या जिजामाता महिला बचत गटाच्या अध्यक्षा म्हणूनही काम करत आहेत.

हर्षा गणेशपुरे यांनी फूलपिकाच्या अर्थशास्त्राचाही अभ्यास केला आहे. फूलपिकांमधून मिळणारा आर्थिक नफाही त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. दोन एकर लिली लावली तर खर्च वजा जाता दरमहा तेरा हजार रु. मिळू शकतात. तसेच गॅलार्डिया फूलशेतीमुळे दररोज जर चाळीस किलो फुले विकली, तर नऊ हजार रुपयांचा फायदा मिळू शकतो आणि ग्लॅडिओलस फुलाचे दांडे जर दररोज ५०० विकले गेले, तर त्यांना खर्च वजा जाता ३०,००० रुपये नफा मिळालेला आहे. अशा प्रकारे एका शेतकरी महिलेने फूलशेती फायदेशीर होऊ शकते हे दाखवून दिले.

- प्रा. पद्माकर दत्तात्रय वांगीकर

गणेशपुरे, हर्षा रमेश